Tuesday, November 15, 2016

हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ

भालचंद्र नेमाडे यांचे गाजलेले एक अतिशय प्रभावी पुस्तक वाचनात आले. हिंदू.

आपली जगण्याची, धर्माकडे बघण्याची व्याख्या बदलून टाकण्याचे सामर्थ्य असणारे, अतिशय महत्वाचे पुस्तक. विशेषतः आजच्या पिढीला निदान मनातली गुंतागुंत कुठेतरी शब्दबद्ध केल्याचे समाधान देणारे, कुठलाही अभिनिवेश न बाळगता नेमके वर्मावर बोट ठेवणारे, हिंदू धर्मातल्या अनेक फोल समजुती, रुढी, परंपरा  यांचे विच्छेदन करणारे आणि थेट भिडणारे पुस्तक !     

कोसला वाचल्यानंतर नेमाडें बद्दल एक ’थोर’ आदर मनात भरुन राहीला होता. इतकी आरस्पानी भाषा, जणू समोर घडतंय असं चित्रदर्शी वर्णन, रेशमाच्या लडींप्रमाणे एकातून एक उलगडत जाणार्‍या घटना व प्रसंग, आणि कुठल्याही पानावरुन पुस्तक वाचायला सुरु केलं तरी लागत जाणारी संगती...

हिंदू ही कुणा एका खंडेरावाची – एकेकाळच्या तालेवार पाटील घराण्यातल्या मुलाची कथा आहे. 

नदीच्या प्रवाहाप्रमाणे खालीवर वाहत कथा पुढे जाते. काळाची चौकटीची फारशी पर्वा न करता तो त्याला आलेले घरचे-दारचे अनुभव अतिशय ओघवत्या, ग्रामिण बोलीत सांगत जातो...त्यात काही स्वगतं असतात, काही आयाबायांचे पारंपारीक उद्गार असतात आणि काही उप कथानकं...कथेला पुढे नेणारी. या विस्कळीत तुकड्य़ा तुकड्यांच्या जोडणीतूनच पूर्ण कथानक आकाराला येते.

र्यांच्या आगमनाने सिंधुतीरावर एक नवीन संस्कृती उदयास आली. अनेक शतकांपूर्वी विकसित झालेल्या या हिंदू संस्कृतीने जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करीत संपूर्ण भारतीय उपखंडात आपली पाळेमुळे रुजवली. तिने सतत प्रवाही राहून वेगवेगळ्या सामाजिक स्तरांना आपलंसं करुन घेतलं व नवनवीन संकल्पनांचा अंगीकार केला. मूळ तत्व तेच राहीले तरी नवीन विचारांचा स्वीकार केल्याने तिला एक बहुआयामी, दाट -समृद्ध पोत मिळाला ज्याचा परिणाम सामाजिक प्रथा व व्यक्तीगत नाते संबंधांवर होत राहीला.

आजही या संस्कृतीचा सार्वत्रिक परिणाम, तिच्या जमेच्या व दुबळ्या बाजूंसकट आपल्यावर होत असतो.

आपण समाजात राहतांना सतत बर्‍या वाईटाला पारखत, ’अपग्रेड’ होण्याची लढाई लढत असतो.  ही 

समृद्ध करणारी लढाई हा ’हिंदू’ चा गाभा आहे. ही कादंबरी जीवनातील भव्यता आणि अनेकविधता 

एखाद्या महाकाव्याच्या धर्तीवर साकारते. वाचनाचा अतिशय आनंद देणारे हे पुस्तक तुम्हाला 

स्वतःचाच नव्याने धांडोळा घ्यायला उद्युक्त करते.

समाजात वावरताना धार्मिकता’ अनेक अंगांनी सामोरी येते. स्त्रिया धार्मिक असतातपुरूष धार्मिक असतातलहान मुले-मुलीही धार्मिक असतात. श्रद्धा फक्त गरीब आणि ग्रामीण भागातल्याच लोकांच्या असतात असे नाही. नावाजलेल्या संस्थेत शिकलेल्या आणि सामाजिक परिवर्तनाच्या कामात रमणा-या लोकांच्याही श्रद्धा असतात.  श्रद्धाच नाही तर देव भोळेपण . काही पुराणातील देवांना भजतात तर काही ऐतिहासिक माणसांना देवासमान मानतात. काहींनी माणसांना जिवंतपणीच देवत्व बहाल केलेले असते. प्रत्येकाची देवता वेगळीप्रत्येकाचे श्रद्धास्थान वेगळे आणि प्रत्येकाची आपल्याकडून असणारी अपेक्षाही वेगळीच! 
काहींची धार्मिकता सहिष्णू असतेतर अनेकांची आक्रमककाहींची सौम्य असतेतर काहींची धगधगतीकाहींची भयातून आलेली असते तर काहींची समजण्यातून. शिवाय व्यक्तीची धार्मिकता आणि सामूहिक धार्मिकता यांतही एक सूक्ष्म पण सतत जाणवणारा भेद असतो.
हिंदू हा धर्म नाही ती एक जीवन शैली आहे; असे संघ वारंवार सांगत असतो. हिंदू धर्माला कर्मकांडांचे, स्पृष्यास्पृष्यतेचे लांछन नेहमीच लागलेले आहे. गुंतागुंतीचा , अनेक ताणतणाव व वाद- प्रतिवाद असणारा विषय म्हणाजे धर्म व धार्मिकता. 
हिंदू या सर्व पैलूंवर झक्क प्रकाश टाकत पुढे पुढे जाते.

कादंबरीची सुरुवात होते ती खंडेराव या पाकिस्तानात हडप्पा- मोहेंजोदारो अथवा तत्सम संस्कृतीच्या उत्खनन - अभ्यासासाठी आलेल्या आर्किऑलोजिस्ट च्या स्वगताने. तो मूळचा खान्देशातील मोरगाव या आडगावच्या पाटलाचा मुलगा. शिकलेला, शहरात राहून सुधारलेला व घरच्या मोठ्या गोतावळ्याचा लाडका.
सगळ्यांच्या आशा अपेक्षा याच्या भोवती. अडाणी स्त्रिया, बहिणी व आई- आजी यांच्यात मोठा झालेला खंडेराव. बहिणींना दिली जाणारी दुय्यम वागणूक, माहेरी आलेल्या आत्याची घालमेल, बहिणीकडे कायमच आश्रयाला आलेली याची मावशी व तिची मुलगी, आजी –आईचे झगडे, सासुरवाशिणी, गावकरी, शेती, पाणी- दुष्काळ........
---आयुष्याशीच असे झटके घेत आयुष्य पुढे जात राहतं.
याची त्रिवेणी आत्या लहानपणीच देवाला वाहिलेली. मूल जगत नाही म्हणून नवस बोललेला. ती कुठेतरी अफगाणिस्तानात असल्याचा खंडूला पत्ता लागतो. तिचा शोध घेत घेत तो पाकिस्तानातील अनेक हिंदू मंदिरं व महानुभावी आश्रम पालथे घालतो. ती काही भेटत नाही. जोगीण होण्यापूर्वीचा तिचा सुंदर कोवळा चेहेरा त्याच्या डोळ्यासमोर येत राहतो.
स्त्रिया या भावनिक असतात तशाच खमक्याही. प्रथा, परंपरा पुढे नेण्यात, किंबहुना धर्म जगविण्यात मुख्य सहभाग हा स्त्रियांचाच असतो. हिंदू मधेही आपल्याला अशा अनेक खमक्या, पक्क्या स्त्रिया भेटतात. स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधणार्‍या, कृती करणार्‍या व त्याच्या परिणामांना सामोरं जाणार्‍या!          
कादंबरीला एक साच्याची अशी बांधीव कहाणी नाहीती कधी खंडेरावाच्या मनातील स्वगतं, तर कधी निवेदनात्मक रुपात पुढे जाते. घटनांना काळाची चौकट नाही...आठवणी कशा ओघवत्या येतात...तसा काहीसा आकृतीबंध आहे.
पण कादंबरी वाचतांना प्रत्येक क्षणी आतून आतून जोडल्या गेल्याची जाणीव होत राहते.  अरे! हे तर आपल्या आजूबाजूला घडलेलं...किंवा आपल्याच बाबतीत घडलेलं आहे...असं वाटत राहतं. भारतात राहतांना हिंदू धर्म असा तुमच्या अंगावर चहुबाजूंनी येतच असतो.....तुम्ही त्यातून अलिप्त राहूच शकत नाही. रक्ताच्या थेंबाथेंबात, मनाच्या जडण घडणीत, सवयींमधे, विचारांत, समोरच्या व्यक्तीच्या विचारांत......तो आपल्या सोबत असतोच...अविभाज्यपणे.
नेमाडे एक विशाल असा काळाचा , संस्कृतीचा व भौगोलीक पट आपल्यासमोर उघडतात. ते इस्लामिक, बुद्धिस्ट, जैन, वारकरी, महानुभावी, शहरी, ग्रामीण, पाकिस्तानी, सीख, स्त्रीवादी, पितृसत्ताक, धार्मिक, ज्ञान, शेतीवर आधारीत संस्कृती...अशा विविध अंगांना स्पर्श करीत पुढे जातात. त्यांचा पुरातत्ववाद हा जीवनातील सर्व पैलू जसे जाती, व्यक्ती, जागा व घटना यांचा सुरेख मेळ घालत भारतीय उपखंडातील प्राचीन संस्कृतींचे पापुद्रे उलगडत जातो.            
खंडेराव विट्ठल हा आपल्या दहा हजार वर्षे जुन्या असलेल्या शेतीच्या परंपरेचा पाईक आहे. तो आपल्या आजूबाजूच्या विश्वाला आपल्या ’देशी’ वास्तव- भानाने जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. या सर्व गोष्टी-घटना जाणून घेता घेता त्याच्या डोक्यात जी गुंतागुंत निर्माण होते, तिचा तो त्याच्या परीने अन्वयार्थ काढतो आणि ही ’अडगळच’ त्याला बहुसांस्कृतिक अशा बाह्य जगाशी कनेक्ट व्हायला सहायभूत ठरते.    
तुम्ही धार्मिक असा अथवा नसा...किंवा आस्तिक असा अथवा नास्तिक... मोठी सेलेब्रिटी असा अथवा सामान्य गृहिणी, स्कॉलर विद्यार्थी असा अथवा मंदिरातला सेवेकरी.......हिंदुत्वाची ही घट्ट वीण तुमच्या भोवती पीळ पाडत जातेच.
लेखक कुठेही काय वाईट अथवा चांगले...काय चूक काय बरोबर....असा निकाल देतच नाही...तो फक्त हिंदुत्वाचे अनेकानेक विलोभनीय पैलू आपल्यासमोर मांडत जातो.....रंगीत, कॅलिडोस्कोपिक......आणि बेरंग झालेले, निर्दय, दुःखी..सुद्धा.

तुम्ही काय घ्यायचे, त्यातून काय अन्वय साधायचा व त्याचा आपले आयुष्य अधिक समृद्ध व अर्थपूर्ण होण्यासाठी कसा वापर करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न!

Tuesday, August 25, 2015

ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम



कविता महाजन यांचे ठकी आणि....हे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. मराठीतील प्रवाह बदलेली आणि धाडसी कादंबरी - तीही एका लेखिकेने लिहीलेली असे नुसते तिचे वर्णन करुन तिला न्याय दिल्या सारखे आणि तिची दखल घेतल्या सारखे होणार नाही म्हणून ही सविस्तर समीक्षा.
खरे तर ह्या पुस्तकाचा दोन- तीन अंगांनी विचार करायला हवा. एक म्हणजे, तिचा फॉर्मॅट अथवा आकृती बंध. ही नक्की एक कादंबरी आहे, आत्मचरित्र आहे की निवेदनात्मक काल्पनिका आहे याच भोवर्‍यात वाचकाला खिळवून ठेवण्याचे काम पहिली शंभर-दिडशे पानं करते. दुसरे म्हणजे तिचा गाभा किंवा कथासूत्र आणि तिसरे म्हणजे लेखिकेची खिळवून ठेवणारी कथनाची हातोटी व पकड!
या कादंबरीची (सोयी साठी म्हणूया – कादंबरी!) नायिका- पद्मजा सप्रे- एक गाजलेली चरित्र अभिनेत्री . तिने प्रामुख्याने आईच्या भूमिका केलेल्या आहेत. पण तिचे व्यक्तिमत्त्व तिने केलेल्या भूमिकांच्या विरुद्ध आहे...म्हणजे सोज्वळ- सात्विक असे मुळीच नाही. ती एक धडाडीचे निर्णय घेणारी, मदिरा आणि (मदिराक्ष?) यांत बुडालेली स्वैरिणी आहे. तिच्या व्यक्तित्वाचे, तिच्या आजूबाजूला वावरणार्‍या माणसांचे आणि घटनांचे वर्णन आणि परिचय करुन देण्यातच पहिली दिडेकशे पाने संपतात. त्या भागाच्या शेवटी ती आत्मचरित्र लिहीण्याचा निर्णय घेते..व पुस्तकातच एक स्वतंत्र आत्मचरित्र – ’कळसूत्र’ नावाचे पुस्तक (मुखपृष्ठ- मलपृष्ठा सहित – एंबेडेड!) सुरु होते.    
त्यात पुन्हा तिचे लहानपण, आईचा अबोल, स्वार्थी स्वभाव व बाहेरख्याली वृत्ती व त्यामुळे हिच्यावर (न) घडलेले संस्कार याचे (पुनरुक्त) वर्णन येते. लहानपणची गरीबी, वडिलांच्या मृत्यूनांतर झालेले हाल, आईबद्दल तिला वाटणारा राग व द्वेष, तिचे मित्र - प्रियकर, तिच्या मोलकरणी, अभिनेत्रींमधील स्पर्धा- हेवेदावे, तिची असफल लग्ने, नाटक- सिनेमाचे अधांतरी विश्व, तिने बापाशिवाय मुलीला - अनाहिताला- जन्म देण्याचा घेतलेला निर्णय , दारु व पैसा, तिचे घारे –हिरवे डोळे व असामान्य रुप - त्यामुळे मिळालेले बरे वाईट अनुभव....यांचा धांडोळा घेत आत्मचरित्र संपते....
नंतर तिसरा भाग सुरु होतो- आत्मचरित्रा नंतर.-
हे थोडेसे एपिलॉग सारखे -  म्हणता येईल. त्यात तिच्या घसरत्या कारकीर्दीचा लेखाजोखा मांडलेला आहे. शिकून वकील झालेली अनाहिता- तिचे दिल्लीला जाणे- पद्मजाचे एकाकीपण, कुणी सरदेशमुख नावाच्या उद्योगपतीचा....आधी आत्मचरित्रात न आलेला उल्लेख-  - तिने त्यांचा उल्लेख पुस्तकात केला असेल की काय या भीतीने  – अगदी हार्ट ॲटॅक येईपर्यंत- व्यथित झालेला सरदेशमुख...
लेखिकेला तिचे प्रियकर कमी वाटले की काय नकळे, पण पुन्हा दोन तीन पात्रं आणली आहेत. डॉ. अरविंद - चांगला प्रथितयश, उच्चभ्रू डॉक्टर, घरदार- बायको असणारा..... हिच्या प्रेमात आकंठ - पण जपून जपून वागणारा......... तिला सत्तर लाखाची गुलाबाच्या आकाराची पर्स देणारा श्रीमंत  डॉकटर..आणि स्त्रियांना असं गोडी गुलाबीने, भावनिक आवाहन करुनच वश करावं लागतं अशी त्याची कारणीमिमांसा देणारा...डॉ. अरविंद   ...त्याची बायको ललीता...साधी , घरेलू, सेवाभावी!
तिला मदत करण्यास सदैव तत्पर असणारा दिग्विजय, अर्णव....आणि असे बरेच....
मग तिची झालेली विकलांग अवस्था, अल्झायमर ने स्मृतीभ्रंश झालेली पद्मजा, तिचे शून्य- संदर्भरहित विश्व, डॉ गायत्रीची लाभलेली साथ....ओसरलेले सौंदर्य व दुरावलेले चाहते.....

अशा वाटा वळणांनी कादंबरी अचानक एका अनपेक्षित , धक्कादायक वळणावर येऊन ठाकते.
वाचकाने कल्पनाही केली नसेल असे सत्य – सामोरं येतं. आपला कादंबरीचा वाचनाचा ॲगलच बदलून जातो. आधी बिनधास्त वाटणारी पद्मजा एकदम एकाकी , बिचारी होऊन जाते. पुन्हा पहिल्या पासून पुस्तक वाचून निसटलेले दुवे ह्या नवीन दृष्टिकोनातून तपासावेसे वाटतात. किंबहुना पुन्हा पुस्तक वाचून एका नव्या दृष्टीने तिच्या आयुष्यातील घटनांची आपण संगति लावतो...हे ह्या कादंबरीचे फार मोठे यश आहे असे मला वाटते.    
ते सांगून रसभंग करण्याचा मानस नाही.
या सगळ्या चढ उतारांत, नायिकेला कुठेही उदात्तता देण्याचा आणि ’करेक्ट’ ठरविण्याचा अट्टाहास दिसत नाही हे मात्र निश्चित उल्लेखनीय आहे. पण या प्रकारच्या कल्पनिका-कादंबरीला आवश्यक असणारी सलग, प्रवाही भाषाशैली, शारीर गोष्टींची धाडसी  मांडणी व सहज उल्लेख, एका नटीच्या जीवन चरित्रात अपरिहार्य असणारी अनैतिकता- तिचे केलेले संयत पण परिणाम साधेल व वातावरणनिर्मीती होईल असे वर्णन -  हे या पुस्तकाचे प्लस पॉईंट्स.
तसेच ह्या विषयाचा आवाका पेलणारी लेखिकेची पुस्तकावरील एक अदृश्य मजबूत पकड मात्र जागोजागी जाणवत राहते; जी विषयाला आणि कथावस्तूला इकडेतिकडे फटकू देत नाही. यामुळे कादंबरी मोठी असूनही तिच्यात एकजिनसी बांधीवपणा आलेला आहे.
एक वेगळा प्रयत्न आणि पारंपारीक कल्पनांना छेद देत एका लेखिकेने धीटपणे मांडलेला एका अभिनेत्रीच्या आयुष्याचा प्रवास व तिच्या समांतर जीवनकथेची न लागणारी संगती अनुभवण्या साठी  म्हणून हे पुस्तक वाचायला हवे.

Thursday, January 15, 2015

तुझ्यात जीव गुंतला

अमिता आणि निनाद....खूप जवळचे मित्र...कॉलेजात, ट्रेकिंग मध्ये..हसण्या-बोलण्यातले अगदी जीवश्च कंठश्च.....
कॉलेज नंतर निनाद औरंगाबादला गेला नोकरीला आणि अमिता पुण्याला ....पुढे शिकायला.
पण एकमेकांना नियमित पत्रं लिहीणे चालूच होते.  एकदा अशीच अमिता नागपूरहून पुण्याला येत असतांना मध्ये बस औरंगाबादला थांबली...निनाद ला ठाऊक होतेच की ती या बस मध्ये आहे. तो तिला भेटायला आला होता..तिला फार आनंद झाला त्याला पाहून...हाय हॅलो झाल्यावर तो म्हणे...की मला तुझ्याशी काही बोलायचे आहे...प्लीज रुमवर चल. तिने काही आढेवेढे घेतले पण निनादवरचा विश्वास इतका गाढ होता की ती त्याच्या आग्रहाला बळी पडून उतरली व रुमवर गेली. तिथे त्याने तिची काही पत्रे दाखवली ज्यावर अगदी भसाड्या अक्षरांत आय लव्ह यू असे लिहीलेले होते....प्रक्षिप्त.
ती चक्रावलीच. अमिताने असे काही लिहून पाठविल्याचा सपशेल इन्कार केला व ती परतली.
हे प्रकरण तिथेच संपले. नंतर निनाद ने तिला म्हटले की ते काहीही असले तरी मला तुझ्या कडून पॉझिटीव्ह उत्तर हवे आहे.....पण अमिता ला तसे कधीच वाटत नव्हते.....तिने नाही म्हटले....व तिच्या तर्फे त्या प्रकरणाचा पूर्ण विराम केला.
नंतर मात्र दोघांचेही मार्ग भिन्न झाले. अमिता एका उद्योग पतीशी विवाह करुन प्रतिष्ठीत घराण्याची सून बनली तर निनादनेही एका सुंदर मुलीशी लग्न करुन संसार थाटला...

२० -२१ वर्षांनी त्यांची गाठ अचानक एका मित्राकडे पडली. दोघेही थोडे अवघडले होते....
पण निनाद मात्र पुन्हा एकवार तिच्या प्रेमात पडला...त्याची जुनी आठवण पुन्हा जागी झाली...अमिताचे सदाबहार हसू, तिचा ऋजू समजूतदारपणा, वयाने जराही न बदललेलं तिचं तारुण्य आणि उलट स्थिरतेमुळे आणि अधिकाराने अधिकच खुललेलं तिचं रुप.......

निनाद ला अगदी वेडं व्हायला झालं होतं. तो तिला सारखे व्हॉटसॲप वर व फेसबुक वर मेसेजेस पठवू लागला.  . अमिता ने पहिल्यांदा त्याला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला की हे योग्य नाही. ती आता एका जबाबदार व्यक्तीची पत्नी आहे.....व तसेही तिने कधीही त्याच्यवर प्रेम केले नव्हते.  निनादही खरे तर हुशार होता, समजदार होता...पण तिच्या बाबतीत मात्र तो फार हळवा झाला होता....
अमिता ने त्याला परोपरीने समजाविण्याचा प्रयत्न केला....पण त्याचे एकच म्हणणे..की मलाही माहिती आहे की आपण आता एकत्र नाहीच येऊ शकत...पण मला फक्त तुझ्या बद्दलचे हे प्रेम व्यक्त करु दे. बाकी काही नाही...त्यामुळे मला खूप समाधान मिळते व आनंद मिळतो.
अमिता काळजीत पडली ...हे असे मेसेजेस तिच्या नवर्‍याने वाचले असते तर समस्या निर्माण झाली असती.....
अमिता मात्र त्याला कधीच प्रोत्साहन देत नव्हती....वेळोवेळी ती त्याला वस्तुस्थितीची जाणीव करुन देई...पण तो अधिकच गुंतत चालला होता.. प्रितीची ही रीतच न्यारी होती. कदाचित प्रेमाची ही ओढ त्याला स्वस्थ बसू देत नसेल. पण अमिताच्या हसर्‍या छबी, तिचे फ्रेश स्मितहास्य, तिची बांधेसूद कोवळीक त्याला वेड लावत होती हे खरे...म्हणजे आधी नसेल गुंतला इतका तो तिच्यात गुंतत चालला होता.

क्रमशः

Saturday, September 27, 2014

कंचनीचा महाल

मेहेकर येथे गावाबाहेर एक पडीक मोठा वाडा आहे. तो कंचनीचा महाल या नावाने ओळखला जातो. त्याबद्दल एक आख्यायीका आहे. कंचनी ही एक लावण्यवती आणि रूपाचा अहंकार असलेली गणिका. नदीकिनारी तिचा प्रासाद होता. घुंगरांचे श्रृंगाररसपूर्ण बोल तिथे कायम निनादत असत. अनेक सरदार- सेनापती तिच्या सौंदर्याचे दिवाणे होते. पलीकडे लोणार सरोवराच्या काठी असलेले देवीचे देऊळ . तिथे जळणारा नंदादीप ...हे सगळ्या गावाचे श्रद्धास्थान होते. एक सरदार पुत्र तिच्या प्रेमात पडला. तिने आपल्या बरोबर मंदिरात येऊन देवीचे दर्शन घ्यावे अशी त्याची आकांक्षा होती. पण कंचनी पडली आढ्यतेखोर, रुपसंपन्न कलावंतीण. तिला गाव उतरुन पलिकडे जाणे कमीपणाचे वाटले. ती वदती झाली... "मी नाही येणार तिथपर्यंत. माझ्या याच वाड्यात माडीवर माडी बांधून मी देवीचे दर्शन घेईन."... झाले........मजल्यावर मजले चढविण्यासाठी कारागिर राबू लागले आणि एके दिवशी...ती प्रदोष पूजा करायला व देवीचा दिवा पहायला वरती चढली...... कवी ना घ देशपांडे यांची नितांतसुंदर कविता..कंचनी चा महाल.....



अशीच होती रे निःशब्द मधुर ती रात्र राजसवाणी
असेच खोलात वाहत होते रे या पैनगंगेचे पाणी
सोसून गारठा चंचळ जळाच्या रुपेरी लाटांत न्हाले
आणखी अशी या पश्चिमे कडून चढून वरती आले
गारठ पदर कंपित अधर भरला कलश माथी
जमले होते रे आधीच वरती प्रदोष पूजेचे साथी
अंगाला लंपट झालेले माझे ते विरल वसन ओले
पहात होते रे वरून भाविक आतून कामूक डोळॆ
दूरच्या क्षितीजा वरती होता रे कोवळा ... क्रमश:

Monday, April 21, 2014

Heartfelt!

आज अगदी वैतागाचाच दिवस होता. सकाळी दूधवाल्याने एकदम साडेतीन लिटर दूध दिले....आज ऑफीस ला सुट्टी...त्याला सांगायचे राहीलेच. आता दही विरजून बांधा! नंतर पेस्ट संपली म्हणून कनकची आरडाओरड आणि झोप मोडली म्हणून रजत ची तार स्वरात तक्रार! अरे, काय मुलं आहेत का कोण ही! माझी मदतनीस , संध्या येणार होती दुपारी...तिच्या ’स्पेशल’ चकल्या आणि चिरोटे घेऊन तर बाईसाहेब आल्याच नाहीत....आजारी आहे म्हणे!....माझा भिशीचा प्लॅन होता गरम मटार कचोर्‍या, गरम शेव, दही-बटाटे व उसाचा रस...असा खास ’इंदोरचा’ मेनू ठेवणार होते..सराफ्यातल्या सारखा तर..... ! आता भेळ-आईस्क्रीम असा महाराष्ट्रीयन मेनूच ठेवावा लागणार बहुतेक. आणि बायका तरी काय...दागिने आणि पदार्थ आणि रिलेशन्स ...यावरच बोलतात. हिर्‍यांचे मंगळ सूत्र आणि कानातले ...मी नाही आणत म्हणे..नवराच माझा आणतो... काय काय.....त्यालाच आवड आहे! (?!) .... इतका हौशी नवरा आणि इतकी अरसिक बायको...?हॅलो...! काही लोकांचं संभाषण ऐकत होते...जर बायको काही दिवस कुठे गावाला गेली...” तर त्याचं काय...तो काय हाताने करुन खाईल काय...?” अरे!.....? हाताने करुन खाणे म्हणजे काय कमी पणा आहे? ती नाही खात ते रोज? मला असे बायकांना डॉमिनेट करणारे, कोत्या विचारांचे , कधीही कुणालाही चांगलं न म्हणणारे, सदैव स्वतःच्याच विचारात मग्न राहणारे लोक आवडत नाहीत अजिबात...... मानाचे भुकेले पण कर्तृत्वशून्य, कपबशी साधी उचलून सुद्धा न ठेवणारे, स्वयंपाक हा सर्वस्वी बायकांचाच प्रांत असे मानणारे पण टीका करण्यास पुढे असणारे, शिळं अजिबात न खाणारे, सदैव ही भाजी कशाची, काय , त्याने काय अपाय होतो, त्यात काय आहे....असा चुकीचा विचार करणारे, कुठलाही नवा पदार्थ चिवडत चिवडत संशयी वृत्तीने खाणारे, कर्मकांड करणारे, स्वप्ने पडल्यावर उठून तसे तसे कर्मकांड करणारे, भीत.......मला का अशा लोकांच्या सहवासात रहावे लागते......! देवा! कधी वाटते की मी निश्चित पणे याहून अधिक वर्थ होते ! कशा यांच्या समजुती! मुलांना काही काम सांगायला नको...मुलींनी केलेले चाले्ल. सतत सूचना, निगेटिव्हीटी, ....

Tuesday, April 01, 2014

नित्यक्रम - ३


सध्या मीना प्रभुंचं ’चिनी माती’ वाचते आहे. अफाटच सुंदर पुस्तक आहे. तसंही चीन बद्दल मला पहिलेपासूनच विलक्षण आकर्षण,ओढ आणि कुतूहल आहे. आणि मीनाताईंनी अगदी बारिक सारीक वर्णनांनी चीन आपल्या डोळ्यांपुढे साकारला आहे. चीन...भरताला जरबेत ठेवणारा आपल्यासारखाच आपला प्राचीन शेजारी...काही बाबतीत आपल्या सारखाच...लोकसंख्या, भूगोल आणि संस्कृतीच्या विपुल छायेत. पण बर्यााच बाबतीत आपल्या पेक्षा भिन्न....स्वयंशिस्त, देशप्रेम, काटेकोरपणा, स्वच्छता....किती दाखले द्यावेत! इतक्या मोठ्या भौगोलीक विस्ताराला आव्हान न मानता संधी मानून विकास करणारा, कठोर कम्युनिस्ट तत्वांची कास धरुन प्रगती करणारा एक फोकस्ड देश! मला एकदा जायचंच आहे चायना ला. कनक रजत ची नुसती धम्माल चालली आहे. मनसोक्त टीव्ही, नेट आणि गेम्स....आईसक्रीम्स (एकाला बटरस्कॉच व एकाला चॉकलेट.....आपापली वगळून दुसर्‍या कुठल्याही फ्लेवर ला हात लावणार नाहीत...अगदी व्रतस्थ असल्यासारखी ! द्वाड कार्टी! एकाला चायनीज प्रिय आणि एकाला पिझा, बर्गर. एकाला बटाट्याची रस्सा भाजी तर एकाला काचर्‍या. एकाला साबुदाणा खिचडी आणि एकाला थालिपीठ.....घर म्हणजे काय हॉटेल आहे का? ऑर्डर द्यायला? आणि मी कोण? वेटर? मला वाटतं मी कोण हा आदी प्रश्न अगदी सहजतेने सुटला आहे माझ्या बाबतीत!

Tuesday, March 25, 2014

रोजनिशी २


हं..माझा ‘नियमितपणा’ म्हणजे जर महिनाभरात एकदा असेल तर कठीण आहे...पण नसल्या पेक्षा हे बरे नाही का?  कनक - रजत च्या एक्झाम्स आटोपल्या नं आज! हुश्श...! पेपर्स तर यांचे ’भारीच’ जातात....डोकं आपलं ’हलकं’ होतं ना पण! आदिही आला परवा परत...येतांना काय काय आणलंन...मी कितीदा सांगते की नको रे ते टॉब्लेरॊन, गॅजेट्स, बेल्जियम चोकोलेट्स, पर्फ्युम्स , शांपूज, झुळझुळीत टी शर्ट्स असलं आणूस...मुलं जाम मिस्युज करतात..पण ऐकत नाहीच! आणि आल्यावर फर्माईश काय तर थालिपीठ, दही, मिरचीचं लोणचं आणि साईडला तळलेला पापड.....मुलांना नकोच हे...त्यांना बर्गर आणि पिझा! आईंना खिचडी-तूप आणि मला...सर्व! मला असं हे टिपीकल गृहिणी स्वगत इथे लिहायचंच नाही खरे तर ! माझ्यातल्या सर्जनशील, प्रातिभ ..(वगैरे वगैरे...)...स्व ला उमलवायचं आहे ना! तसे मला रंग खूप आवडतात..सगळे...प्रसन्न हिरवा, (मोरपंखी रंगाचं तर मला नाव सुद्धा खूप आवडतं) भडक लाल, सौम्य गुलाबी, झळाळता सोनेरी आणि सदाबहार जांभळा......पण होळी खेळायला मात्र आवडत नाही....रंग असे ओबडधोबड पणे माखल्यावर नाही चांगले दिसत माणसांच्या चेहेर्यारवर ..आणि विशेषतः बेभानपणे खिदळणार्याा, उन्मत्त, अनुचित तरुणाईवर... .त्याला चित्रकाराच्या कुंचल्यातून उतरणारी हळुवार भावुकताच पाहीजे....किंवा निसर्गाच्या ’डिफॉल्ट’ चित्र चौकटीची उत्कटता..फुलापानांची, डोंगर-दर्यां्ची आणि पाण्याच्या लहरी लहरींची..!