सगळे ग्रूप म्यूट करून पाहिले
नोटिफीकेशन बार क्लियर केले
मेसेजेसना उत्तरं दिली
सगळं अनिवार्य म्हणून स्वीकारलं
पण
ही रुखरुख का जात नाही ?
पसारा करून पाहिला
पसारा आवरून पाहिला
स्वतःच्याच अवतीभोवती रेंगाळून पाहिलं
विचार करता करता सगळे दात कोरून झाले..
पण
ही रुखरुख का जात नाही ?
धुवायला दिलेल्या कपड्याच्या खिशात
जशी विसरावी महत्त्वाची चिठ्ठी
तसं काहीतरी विसरलंय
काळ खूप खेळून जातो म्हणतात-
उद्या त्या चिठ्ठीतली अक्षरं बदलतील
मलाच ओळखू येणार नाहीत
आवेग ओसरला की गोष्टींचे अर्थ बदलतात
असं काहीतरी होऊन
बिनमहत्त्वाची वाटू नये ती गोष्ट सापडल्यावर.
नाहीतर वाटेल-इतकी बिनमहत्त्वाची अस्वस्थता
कधीच भोगली नव्हती याआधी.
आणि हे जाणवून अजून अस्वस्थ वाटायला लागेल
मग त्या अस्वस्थतेवरची एखादी नवी कविता
पुन्हा एखाद्या कपड्याच्या खिशात ठेवली गेली तर ?
काळ खूप खेळून जातो म्हणतात..
ही रुखरुख का जात नाही ?
No comments:
Post a Comment