Thursday, April 11, 2024

राधा

 "कोण आहे गं तिकडे ? दिवसाचे ३ प्रहर उलटून गेले, तरी या महाली आगमन झाले नाही अजून. विसरली कि काय स्वारी ? आम्हाला कळत का नाही ? या महाली येऊन म्हणायचे, रुक्मीणी, तू आमची पट्टराणी. तूझा मान मोठा, आणि त्या महाली जाऊन म्हणायचे, तू सत्य माझी भामा, सत्यभामा." रुक्मीणीचा नूसता संताप झाला होता. आज स्वारी या महाली येणार होती म्हणून तिने सर्व सिद्धता करुन ठेवली होती.

घृतपूर, मोदक, क्षिरी भोजनासाठी, संगीतजलसे मनोरंजनासाठी, पुष्पशय्या सर्व काही होते. स्वारी आता त्या महाली, जायचेच विसरायला हवी, अशी मनिषा होती तिला.
दिवसाचे प्रहर उलटू लागल्यावर, तिची बेचैनी वाढतच चालली. त्या महालातून काही निरोपही येत नव्हता.
स्वारींचे खास दूत तर नजरेसही पडत नव्हते. पण दासीला, त्या महाली पाठवायचे काही तिला पटत नव्हते.
पण शेवटी तिने धीर केलाच. दासीस कसले तरी निमित्त काढून तिने सत्यभामेच्या महाली पाठवलेच.
ती परत येईस्तो मात्र तिला प्रत्येक क्षण युगागुगासारखा वाटला. काय मेलं ते रमायचे, त्या ठिकाणी, असे मनाशी म्हणत राहिली.
तेवढ्यात तिला सज्ज्यातून दासी लगबगीने येताना दिसली. तिचा चिंताक्रांत चेहरा, तर तिला दूरूनही दिसला. "सांग झणी. काय करत्येय स्वारी, त्या महाली ? "
"महाराणी, क्षमा असावी. महाराज त्या महाली नाहीत. " दासी धापा टाकत म्हणाली.
"चांडाळणी, मग स्वारींच्या महाली नाही का जायचेस ? स्वारींचे सर्व क्षेमकुशल तर असेल ना ?"
रुक्मीणीला धीर धरवेना. तिने लगोलग मेणा मागवला व श्रीकृष्णमहाराजांच्या महाली निघाली.
****
"नारायण, नारायण" तिला प्रवेशद्वारीच नारदमुनी दिसले.
"वंदन करते, मुनीवर. स्वारींचे सर्व क्षेमकुशल आहे ना ?" तिने अधीरतेने विचारले.
"रुक्मीणी तूला माहित कसे नाही. महाराज आज अस्वस्थ आहेत." नारदमुनी उत्तरले.
"काय झालं स्वारींना ? त्या महाली तर काही झाले नाही ना ?" रुक्मीणीने विचारले.
नारदमुनी किंचीत हसले व म्हणाले, " आता नेमके कशाने ते माहीत नाही, पण महाराजांना असह्य मस्तकशूळ उठला आहे."
"उन्हातान्हाचे फ़िरणे झाले असेल. तिथे कुणी आहे का, काळजी करणारं ? निदान मला तरी निरोप पाठवायचा. छे मला पाहूदे आधी स्वारींना" असे म्हणत रुक्मीणी लगबगीने अंतपूरात गेली.
श्रीकृष्ण महाराज शय्येवर पहुडले होते. चेहरा अगदी म्लान होता. राजवैद्य चितांग्रस्त बसले होते.
"महाराज, काय झाले ? मस्तकशूळ कशाने बरं उठला असेल. राजवैद्यानी काही लेप नाही का लावला ? " रुक्मीणी विचारती झाली.
" अगं हो. आज तूझ्या महाली यायला निघालो आणि हा मस्तकशूळ उठला बघ. कशानेच बरे वाटत नाही. " श्रीकृष्ण उत्तरले.
" राजवैद्य, अहो कुठलीही मात्रा नाही का चालत ? असा कसा मस्तकशूळ उठला असेल हो ?" तिने राजवैद्यांना विचारले.
"महाराणी माझ्या संग्रहातल्या सर्व औषधी वापरून बघितल्या. अजून उतार पडत नाही." राजवैद्य हताश होऊन म्हणाले.
"अहो, मग काही दिव्यौषधी आणायला हवी का ? चहूदिशेने स्वार का नाही पाठवले,
अगदी हिमाचलात जरी काही औषधी असेल, तर .." रुक्मीणीला काहि सूचेनाच.
"महाराणी, एक उपचार आहे. परंतु..." राजवैद्य हळूच म्हणाले.
"अहो मग सांगा ना. द्रव्याची चिंता नका करू. तिन्हीलोकांत कुठेही औषधी उपलब्ध असली तरी, सांगा. " रुक्मीणी म्हणाली.
"महाराणी, त्यासाठी दूर नको जायला. महाराजांवर प्रेम करणार्या स्त्रीच्या पायातळीची माती घेऊन त्याचा लेप महाराजंच्या भाळावर लावल्यास, त्यांना आराम पडेल" राजवैद्य म्हणाले.
"हे काय ? असा काही उपाय असतो का ?" रुक्मीणीला पटले नव्हतेच.
"महाराणी, ग्रंथात नाही हे पण आमच्या गुरुवर्यांनी हे सांगितले होते. आता बाकि सगळेच उपाय थकल्यावर....." राजवैद्य म्हणाले.
"काहीतरीच काय. कुठली स्त्री यासाठी तयार होईल ? यापेक्षा मोठे पातक ते काय असणार आहे. आपल्या पायतळीची माती महारांज्याच्या भाळी ? सात जन्म नरकात खितपत पडेल ना ती स्त्री ! आणखी काही उपाय शोधा. नारदमुनी सर्वज्ञ आहेत. त्यांना नाही का विचारले ? " रुक्मीणी म्हणाली.
" रुक्मीणी, नारदमुनी त्याच कार्यासाठी गेले आहेत." श्रीकृष्ण महाराज उत्तरले.
*********
अजूनही राधेला यमुनातीरी बासुरीचे मंजुळ स्वर ऐकू येतात. अजूनही तिचा पाय, यमूनातीराहून निघता निघत नाही. घरातील भरलेले हंडे ओतून टाकून ती उगाचच, एकटीच परत यमूनेवर जाते.
आता वयोमानाप्रमाणे ती थकलीय. हंड्याचा भार तिला सोसत नाही. पण कुठलीतरी अनामिक ओढ तिला आजही यमूनातीरी नेते.
वेळूच्या बनातून बासरीचे सूर, तिला आजही ऐकू येतात. गायीगुरांच्या घोळक्यातील गुराख्याचे एखादे पोर, तिला कृष्णाची आठवण करुन देते. कधीकधी तर तिथे कुणीच नसताना, तो तिथे आहे, असे तिला भासत राहते. अगदी अंधार पडल्यावर, ती नाईलाजाने निघते.
आजही ती अशीच, उन्ह कलताना यमूनेवर आलेली आहे.आजही ती अशीच स्वत:ला हरवून कदंबातळी टेकलेली आहे. हंडा तसाच पायाकडे कलंडलेला आहे.
आता ती मातीचे घडे आणतच नाही. ते फ़ोडायला आता कुणीही नाही, तरिही..
"नारायण, नारायण, राधा गौळण ना गं तू ? " अचानक तिच्या कानावर नारदमुनींचे शब्द पडले.
"हो मीच ती, पण आपण कोण ? आणि मला ओळखता कसे ? " राधेने विचारले.
"म्हणजे महाराजांनी वर्णन केले होते, तशीच आहेस तू. आणि तू यावेळी इथे असशील असेही म्हणाले होते" नारदमुनी म्हणाले.
राधाला काहीच समजले नाही.
"अगं तूझ्या कृष्णाने पाठवले आहे मला. विसरली तर नाहीस ना त्याला ?" ते पुढे म्हणाले.
" कृष्णाने ? माझ्या कृष्णाने पाठवलेय. कसा आहे तो ? आता मोठा महाराज झालाय म्हणे. तोच विसरला असेल आम्हाला." राधा म्हणाली.
"नाही बरं विसरले. सदोदीत इथल्या सवंगड्यांच्या, गौळणीच्या आठवणी काढत असतात. परत इथे येऊन सर्वांना भेटावे, असे वाटत असते, त्यांना." नारदमुनी म्हणाले.
"पण सवड मिळत नसेल. हो ना ? दोन दोन बायका केल्यात म्हणे. तूम्हाला सांगते, लहानपणी इतक्या खोड्या काढायचा ना आमच्या. बाराजणी होतो, पण रोज रोज आम्हाला त्रास द्यायला. कधीकधी खोड्या अश्या काढायचा, कि पोरं म्हणून दुर्लक्ष करणे कठीण व्हायचे. पण त्याचे ते रुप बघितले, तो पावा ऐकला कि आम्ही सर्व विसरायचो. तरी आमच्यापैकी काही म्हणायच्या देखील, याला खाष्ट बायको मिळू दे म्हणून." राधा हसत म्हणाली.
"राधे, आज तूझ्याकडे खास मागणी करण्यासाठी आलोय, " असे म्हणत, नारदमुनींनी सर्व कथन केले.
*****
महाराज अजून म्लान चेहयांने शय्येवर पहुडले होते. रुक्मीणी त्यांच्या भाळावर शीतजलात भिजवलेल्या वस्त्राने हळुवार मर्दन करत होती.
प्रतिहारी तितक्यात नारदमुनी आल्याची वार्ता घेऊन आला.
"नारायण, नारायण" नारदमुनी म्हणाले, "महाराज आपले औषध आणले आहे बरं"
त्यांनी एक पुरचुंडी राजवैद्यांच्या पुढे धरली. श्रीकृष्णाने ती त्यांच्या हातातून ओढून घेतली आणि स्वत:च्या भाळावर लावली. क्षणार्धात त्यांचा मस्तकशूळ दूर झाला.
रुक्मीणीच्या चेहर्यावरचे भाव बघून, महाराज म्हणाले, "राधेची पायधूळ आहे ही. बघ क्षणात माझा मस्तकशूळ दूर झाला. "
रुक्मीणी फ़णकार्याने म्हणाली, "आधी खरा होता का ते सांगा. असा कधी कुणाच्या पायधूळीने कुणाचा मस्तकशूळ बरा होतो का ? आणि मला खात्री आहे, कि नारदमुनीनी तिला सत्य सांगितलेच नसेल. महाराजांवर जीव असणारी, कुणीही स्त्री असे पातक करणार नाही."
"महाराणी, राधेला सर्व सत्य कथून, तिच्या संमतीनेच तर ही माती मी आणली आहे." नारदमुनी म्हणाले.
"मग काय म्हणाली राधा ?" श्रीकृष्णाने अधीरतेने विचारले.
"राधा म्हणाली, माझ्या कृष्णासाठी सात जन्म काय, यापुढचे सर्वच जन्म मी नरकवास भोगायला तयार आहे." नारदमुनी म्हणाले.
श्रीकृष्णाच्या डोळ्य़ांच्या कडा ओलावल्या.
खजील झालेली रुक्मीणी म्हणाली, "बरं बरं, आम्हाला कळतात बरं अशी नाटकं. आता यावे आमच्या महाली, त्वरीत, मी सिद्धतेला निघतेच."
रुक्मीणी गेल्यावर, नारदमुनी म्हणाले, "महाराज खरे प्रेम आहे राधेचे आपल्यावर."
"म्हणजे माझा कयास खरा ठरला तर." श्रीकृष्ण म्हणाले.
"नाही महाराज." नारदमुनी म्हणाले.
"म्हणजे काय ? राधेने नकार दिला का ? हि माती तिच्या पायतळीची नाही का ?"श्रीकृष्णाने विचारले.
" नाही राधेने ही माती त्वरीत दिली. पण देताना म्हणाली, त्या कृष्णाला सांगा, माझ्या प्रेमाची अशी परिक्षा बघू नकोस. खरे प्रेम करायला, स्त्रीचा जन्मच घ्यावा लागतो. त्याला किंचीतही मस्तकशूळ उठावा आणि मी जिवंत असावे, हे कालत्रयी शक्य नाही." नारदमुनी म्हणाले.

Friday, February 09, 2024

प्रेम


पुरे झाले चंद्र-सूर्य, पुरे झाल्या तारा,

पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा राहा,
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा.

शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,
जास्तीत-जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं

शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस,
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं!


कवी - कुसुमाग्रज