Tuesday, November 12, 2019

फकीर

दूरदेशीचा फकीर कोणी
वाटा अनवट चालत राही
आयुष्याचे गूढ चित्र अन
सावल्यांतुनी रेखीत जाई।।
भकास माळावरती एका
जीर्ण एकले मंदिर पाही
कोनाड्यातील पागोळीगत
उरात फडफड, काहूर काही।।
कळसावरचा अंध पिंगळा
दु:ख मुक्याने साहत राही
कानी पडते आर्त साद जी
उगम तयाचा उमगत नाही।।
माथ्यावरती सूर्य तळपतो
तप्त दाह अन लाही लाही
खुळ्या स्मृतींचा मंद गारवा
परि जिवाला शमवत राही।।
दूरदेशीचा फकीर कोणी
वाटा अनवट चालत राही….



-

Friday, August 30, 2019

ये दिल और उनकी..............


ये दिल और उनकी निगाहोंके साये.....
पर्वत, पक्षी, नद्या, झाडं, धुके.. सगळा निसर्गच प्रेमाशी संलग्न आहे. प्रेम ही सगळ्यात हवीहवीशी उत्कट भावना! आपण प्रेमाचे पडसाद भवतालच्या रम्य निसर्गात शोधत राहतो.
निसर्गा च्या सहवासात भावना अधिक उत्कट पणे व्यक्त होतात आणि आतला आवाज ऐकू येतो. मन आणि भान हरपून जाणारा निसर्गाचा विलोभनीय सहवास!

सगळ्या गाण्या-कवितांत खळखळत्या नद्या, हिरवीगार शेतं , नाजूक फुलं, पहाड- पर्वत यांची वर्णनं आढळतात.... .... प्रेम, कल्पना, सौंदर्य यांना व्यक्त करणारी. प्रेमाची प्रतीकंच जणू!
प्रेमात असलेला माणूस तर सगळ्याच गोष्टींचा संबंध प्रेमाशी अथवा प्रेमिके शी जोडतो. तो प्रेमात इतके आकंठ बुडालेले असतो की आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टी तिच्याशी जोडतो. प्रत्येक ठिकाणी तीच दिसते.
हा सुंदर निसर्ग आहे, तू मन व्यापून राहिलेली आहेस, मनभर आनंद ओसंडतो आहे......! जगायला खरंच अजून काय हवं?
कुठेतरी रमणीय पहाडीवर, हिरव्या वनराईत, झुळझुळत्या नदीच्या किनारी तुम्ही त्याच्या विचारात रममाण झाला आहात. तो सोबत असताना किंवा नसताना..........सदैव ऐकावसं वाटणारं हे गीत....लताचा स्वर्गीय आवाज ...!
तिचा आवाज आणि हा आजूबाजूचा बहारदार, हिरवागार आसमंत......जयदेव च्या संगीतावर तिचे मधुर बोल...

हं ह्म...ह्म ह्म.. हं
संतूर आणि बासरीची साथ. थोडासा मटका ताल आणि ढोलक ही. मधुर असं स्वरमंडल आपल्याला प्रेमाच्या धुंदीत नेतं.

ये दिल और उनकी निगाहोंके साये
मुझे घेर लेते वो बाहोंके साये

माझे मुठी एव्हढे हृदय काय ते उरले आहे...ते ही माझ्या ताब्यात नाही. .तर त्याच्या एकटक नजरेच्या छायेत.
न बोलता तो मला आपल्या बाहुपाशांत हलकेच लपेटून घेतो. ...
जिथे पर्वत दर्‍यांना भेटतात त्या वळणावर, जिथे धुक्याने वेढलेली हिरवाई आहे, प्रेमाच्या आवेगाने अंगावर अधिकचा शहारा आणणारी थंड झुळूक मन सुखावते आहे अशा निसर्गाच्या कुशीत संगीत तुम्हाला अलगद घेऊन जातं!

प्रेम पर्बत मधलं हे अप्रतिम गीत!
जयदेव यांनी संगीतबद्ध केलेलं. स्त्री प्रधान गीतांना संगीत देतांना जयदेव यांची प्रतिभा नेहमीच अगदी तरल, धारदार व प्रसन्न असायची आणि सुरावटी तरी किती श्रीमन्त !
गाण्याच्या सुरुवातीलाच पहाडांच्या प्रतिध्वनीचा प्रसन्न पणा आहे. पाण्याचा खळखळाट, लख्ख सूर्यप्रकाश यांनी मिळणारा निरागस आनंद यांची प्रचीती देणारा.
एकमेकांत बेमालूम पणे मिसळून गेलेल्या संतूर आणि बासरीचा अप्रतिम वापर. राग पहाडीवर आधारीत असलेलं गाणं.

पहाडोंको चंचल किरन चूमती है
हवा हर नदी का बदन चूमती है
यहा से वहा तक है चाहोंके साये
सूर्याची कोवळी किरणे पर्वत माथ्याला स्पर्श करताहेत; हवेची झुळूक नदीवरुन लहरत जाते.
मला सगळीकडे, अवती भवती आपले प्रेमच दिसते आहे. प्रेमाच्या आश्वासक छाया सर्वत्र भरुन राहिलेल्या आहेत.

लिपटते ये पेडॊंसे बादल घनेरे
ये पल पल उजाले ये पल पल अंधेरे
बहोत ठंडे ठंडे है राहोंके साये

घनदाट ढग झाडांना वेढून आहेत. ऊन सावल्यांचा लपाछपीचा खेळ चालू आहे. माझ्या पुढल्या वाटेवरचा प्रवास किती आनंददायी असेल याची ही जणू नांदीच आहे.

धडकते है दिल कितनी आजादीयोंसे
बहोत मिलते जुलते है इन वादीयोंसे
मुहब्बत की रंगीन पनाहोंके साये

या मोकळ्या, दिलखुलास दर्‍यांसारखीच आपली हृदयं पण धडधडत आहेत. निसर्गाच्या विलोभनीय दुनियेत प्रीतीने आसरा घेतला आहे. मुक्त , आनंदमयी आणि सर्वस्व असणारी तुझी माझी आश्वासक प्रीत सगळीकडे भरुन राहिली आहे.
जयदेव यांच्या उत्कट स्वरसाजाने जां निसार अख्तर यांचे काव्य खुलले आहे. कवितेचा मूळ गाभा अशा मेलोडियस संगीताने अधिकच झळाळून उठतो. यात प्रेमिकेने प्रियकराबरोबर व्यतीत केलेले प्रेमाचे क्षण आहेत. ती त्या प्रेमात इतकी हरवून गेली आहे की आजूबाजूच्या निसर्गात ती त्याचीच प्रतिबिंबे शोधते. त्याच्या सोबत घालविलेल्या क्षणांची उत्कटता, असोशी आठवत राहते. अविचल, मनभर आनंदाचा खजिना आणि अनुरागाच्या पडछाया........

लताचा अतिशय गोड स्वर, मधुर संगीत आणि उसळत्या, खळाळत्या निसर्गाचे वर्णन करणारे अप्रतिम शब्द.....
एक प्रेमगीत साकार होतं....

ये दिल और उनकी निगाहोंके साये........................

Thursday, August 08, 2019

कधी कधी मज असे वाटते......

माझ्यामधल्या ’मी’ ला काढून
निरखाव्या लोकांच्या नजरा
निर्लेप पणाने जाणून घ्यावा
खोट्या शब्दांचा अर्थ गहिरा

कोण कसे, कुणाचे काय
अनुभवाच्या उदंड राशी
प्रचीती येता नक्की पटेल
प्रत्येकाचीच खूण जराशी

मुक्त होऊनी माझातली मी
पडेल बाहेर अन उडेल जरा
तेव्हाच कळेल असतो कसा
उधाणलेला पाऊस, सोसाट्याचा वारा

आत आत लपून चालेल कसे
अंधार तळात कुठले कवडसे?
तोड साखळी , उघड दार
घे झेप आणि क्षितीजापार

Wednesday, July 24, 2019

ए दिले नादान.........................

काल परवा टी व्ही वर सहज सर्फ़ींग करताना ए दिल ए नादान हे रजिया सुलतान मधलं गाणं कानावर आलं...आणि मन तिथेच थबकून राहिलं!
रझिया – बाराव्या शतकातली दिल्लीची एकमेव स्त्री साम्राज्ञी! तिच्या सिंहासनावर बसण्याने अनेक वादळे उठली, अनेक आक्षेप घेतले गेले आणि तिला असंख्य आव्हानांना सामोरे जावे लागले.
तिची वादळी कारकीर्द, तिचे हबशी गुलाम- जमालुद्दीन याकुत वरचे प्रेम, त्यावरुन तिच्या नियोजित वरासोबत – मलिक अल्तुनिया सोबत झालेले वाद, ताणतणाव, राजकारण, रक्तपात...सगळे नजरे समोर आले.
कमाल अमरोही लिखीत- दिग्दर्शित एक फारशी न गाजलेली कलाकृती!
पण जा निसार अखर यांचे लाजवाब शब्द आणि खय्याम यांच्या मधुर सुरावटींनी चित्रपटाची बाजीच पलटून गेली. सिनेमाला संगीताचे झळाळते कोंदण मिळाले!
ए दिले नादान तर अजरामर ठरले.
हेमा मालिनी चा मर्यादित अभिनय, बसका, सपाट आवाज आणि अजिबात तरल नसलेली, जड देहबोली यांनाही आपल्या लयबद्ध, मधुर सुरावटींनी उंचीवर नेऊन ठेवणारं हे अप्रतिम गीत.
संतूर च्या मधुर सुरावटींनी गाण्याची सुरुवात होते. या मधेच पॉज घेत झंकारणार्‍या संतूर च्या सुरांत एक वेगळेच सामर्थ्य आहे. वाळवंटातील न संपणार्‍या लांबचलांब रस्त्यांसारखे हे पॉजेस वाटतात. हृदयाचा खिन्नपणा, रिक्तपण अधोरेखित करणारे!
गाण्यातील एकूण वातावरणनिर्मिती व बाज या सुरुवातीच्या थांबत थांबत वाजणार्‍या संतूर च्या तुकड्यांनी साधला जातो.
रिक्ततेची व अपूर्ण प्रीतीची वेदना हृदयात खोलवर उतरत जाते. एखाद्या वाटसरुने जशी पाण्याची वाट पहावी तसे तिचे हृदय प्रेमासाठी आसुसलेले आहे. ए दिले नादान ची विराणी अशाच एका भग्न हृदयाची विराणी आहे. संतूर- सारंगीचे मधुर स्वर हे त्या प्रीतीच्या उत्कट, अव्यक्त भावनेला पूरक ठरतात.
नंतर सुरु होते तबला आणि व्हायोलिन ची साथ.. आणि लतादीदीचा स्वर्गीय आवाज..
संतूर आणि लता यांची जणू जुगलबंदी चालल्याप्रमाणे ! संतूर, व्हायोलीन आणि ढोल च्या साजात लताचा सूर मिसळतो.......अलगदपणे--- अंतरा गाताना. “कैसी उल्झन है... “ च्या वेळचे लता चे स्वर ... काळीज घायाळ करत जातात.
“एक साया सा...रुबरु क्या है....” ऐकताना खरेच असे वाटत राहते की खाली एक सावली चालतेय वाळूच्या दूर दूर पसरलेल्या मऊ वाळवंटात! नि:शब्द पणे पण लयीत!
दुसरं कडवं सुरु होतं सारंगी च्या लकेरींसोबत... त्या पात्राची आर्तता, दु:ख, व्यथा, खंत आपल्या मनाला भिडत जाते.
क्या कयामत है, क्या मुसीबत है
कह नही सकते , किसका अरमा है
जिंदगी जैसे खोयी खोयी है, हैरां हैरां है
सुरु होतो आहे शेवटाकडे नेणारा प्रवास. सगळं संपलं आहे. काय हवं आहे तेही कळत नाही.
दृष्टीक्षेपात आहे फक्त एक उजाड, वैराण वाळवंट! फक्त शेवट नजरेत येत नाही...या अंतहीन वाळवंटा सारखाच! चहूकडे एक व्याकूळ आर्तता भरुन राहिलेली
हे अतिशय सुंदर संगीतातून व्यक्त होतं..लतादी उत्कट स्वरांनी गातात...
क्या कयामत है, क्या मुसीबत है...
भळभळती जखम उरात घेऊन, जीवनातील एकसुरी संथ दु:खाला सामोरं ठेवून .एक लांब पॉज आणि मग,
ये जमीं चूप है,आसमा चूप है.....
अस्वस्थता वाढत जाते. सदाबहार, खळाळता निसर्गही हिच्या दु:खापुढे हतबल आहे. हृदयाचे ठोकेच जणू असे तबल्याचे बोल मनाचा तळ ढवळून टाकतात. कुणी हाकेला ओ द्यायला नाही, मनाची साद ऐकायला कुणी नाही अशी एकाकी, आर्त अवस्था!

हा गाण्यातील अत्युच्च बिंदू आहे. गळ्याशी आवंढा दाटतो,
काय सुंदर संगीत आहे!
मानवी भाव भावना इतक्य उत्कटतेने फक्त वाद्यांच्या सुरावटीतून व्यक्त फार कमी ठिकाणी केल्या गेलेल्या दिसतात!
खय्याम यांच्या कारकीर्दीतले हे एक उत्कृष्ट गीत! फक्त संतूर, तबला सारंगी आणि ढोल वापरुन एक सुरेख गोफ विणला जातो. अगदी कमी वाद्यं वापरुनही सुरेल ताल साधला जातो आणि त्यावर आपल्या अप्रतिम गोड आवाजाने लताबाई सोन्याचा मुलामा देतात.
त्यांचा ठेहराव, बारकावे, भरल्या गळ्यातलं अधीरेपण, आणि खोल खोल जाणवणारं रिकामपण...यांनी एक पूर्ण गाणं तयार होतं.
जा निसार अखतर यांचे शब्द, आणि हेमा मालिनी व कमाल अमरोही यांनी पडद्यावर साकारलेली एक हलती बोलती कविता.....यांनी हे गाणे चिरंतन ठरते
आपल्याला एक अप्रतिम गाणे ऐकल्याचा आनंद मिळतो.

Monday, July 01, 2019

तू अन मी.....

मी आणि तू .. मला दुसरे काही नको

डोळ्यांचीच भाषा बोलू .. शब्द सुद्धा नको


बैस असा शेजारी .. फक्त हात घे हातात

चंद्राचाच लावू दिवा .. रात्र काळी नको


ओघळू दे केसातून .. काही फुले हातावर

श्वासांनाच मोजू फक्त .. तारे बिरे नको


खेळू देत वार्‍याला .. मुक्त अवखळ बटांशी

डोळे म्हणतील ’नाही’ जरी .. मुळी त्याचं ऐकू नको


होऊ दे पहाट ...... अन मावळू दे ना चंद्र

तुझे ..माझे.. आता असे..काही ठेऊ नको



Monday, March 18, 2019

एस डी


एस डी.................

लख्ख चांदणं पडलेली रात्र बाहेर उमलत असते, गार हवा असते,  शांत निशिगंधाच्या छड्या वार्‍यावर डोलत असतात आणि “ये रात ये चांदनी फिर कहा....सुन जा दिलकी दा ss स्ता...........” हेमंत कुमार चा मधाळ आवाज रात्रीचे थर अलगद उलगडत असतो....त्यातले काव्य सुंदर की संगीत...या द्वंद्वात अडकता- अडकता आपण देवानंदच्या रोमॅंटिक चेहेर्‍याच्या पुन्हा एकदा प्रेमात पडतो....

एस डी नावाचं गारुड आहेच तसं..... स्वर्गीय, सुमधुर आणि नायक नायिकेला अगदी ’सूट’ होणारं संगीत ही तर त्याची खासियत. देवानंद गाणं गातांना तो काही वेगळं गातोय असं वाटतच नाही...ते गाणं असं त्याच्या अंतरंगातून उमलून आलेलं वाटतं....
शब्दांना असलेला खास बंगाली लहेजा, सुरांना दिलेली आर्त आळवणीची डूब, भावनेची खोल खोल, आरस्पानी अभिव्यक्ती.....डोळे मिटून घ्यावेत आणि सगळं विसरुन एस डी अनुभवत रहावा.

त्रिपुराच्या राजघराण्यात एस डी बर्मन यांचा जन्म झाला. आपल्याहून तब्बल पंधरा वर्षांनी लहान असलेल्या मीरादेवींशी लग्न करुन त्यांनी ’नॉन रॉयल’ घराण्यातली बहू आणल्या बद्दल घरच्यांचा रोष पत्करला होताच ज्याची परिणीती त्यांना राजघराण्याचे वारसा हक्क नाकारण्यात झाली!
सुरुवातीला रेडिओ वर गायक म्हणून कारकीर्द सुरु केलेल्या सचिनदेव बर्मन यांच्या गाण्यावर प्रामुख्याने बंगाली लोक संगीताचा प्रभाव होता.....शशधर मुखर्जींच्या बोलावण्या वरुन १९४४ मधे ते नशीब आजमावायला मुंबईत दाखल झाले....पण चार वर्षं झाली तरी म्हणावी तशी कामं व प्रसिद्धी मिळेना...निराश मनाने त्यांनी पुन्हा कोलकत्याला परतायचाच निर्णय घेतला होता...पण त्यांना थोपविण्यात आलं...आणि १९५० मधे नवकेतन – देव आनंदशी केलेला करार मात्र प्रसिद्धी-यशाच्या पायघड्या घालत आला....टॅक्सी ड्रायव्हर, तेरे घर के सामने, नौ दो ग्यारह, काला पानी..पासून ते गाईड, पेइंग गेस्ट, ज्वेल थीफ......यशाची कमान चढत गेली.

तलत चं जलते है जिसके लिए तेरी आंखोके दिये असो किंवा पिया तोसे नैना लागे रे असो किंवा तेरे मेरे सपने अब एक रंग है असो   ........एस डी ने हिंदी चित्रपट संगीतावर एक अमीट मुद्रा उमटवून ठेवली. 
रात अकेली है........ऐकून पहा एकदा......का ..नों.. मे ...मेरे....आणि टीपेला पोहोचणारा आशाचा स्वर - जो भी चाहे कहिये......जो भी चाहे कहीये.......मग पायर्‍या उतरत- घरंगळत आलेला संगीताचा तुकडा, ठेकेदार......!

ते चौथीच्या परीक्षेत असायचं तसं.... जीभ : काजू कतली :: कान : ? ( एस डी चं संगीत) ......असं उत्तर लिहीलं असतं मी!..पण हिंदी गाणी ही एक खरंच खास गोष्ट आहे...जगातील कुठल्याही इतर भाषेच्या चित्रपटांत नसलेली.....डोळे, शब्द, लय, अभिनय आणि संगीत...यांच्या भांडवलावर हृदयं काबीज करणारी एक अद्वितीय गोष्ट!

“अच्छा जी मै..” मधला मधुबाला चा मुद्राभिनय आठवून पहा...  किती लाडीक रुसणं, हसणं आणि डोळे उघडमीट करणं..... “रुठे तो हुजूर थे मेरी क्या खता”....म्हणत रागावलेला देव आणि त्याचा अनुनय करणारी मधुबाला.....सगळ्या व्यावहारीकता विसरुन मन फक्त या दोघांच्या प्रेम कहाणीत रंगून जातं.
असा निखळ आनंद आपल्याला बहाल करणारा एस डी आपल्यातून जाऊन ४० वर्षं होतील….
मनामनांवर अधिराज्य करणारं असं काहीतरी काम करुन जे जातात त्यांनाच खरे जीवन कळले म्हणायचे……!!