एस डी.................
लख्ख चांदणं पडलेली रात्र बाहेर उमलत असते, गार हवा असते, शांत निशिगंधाच्या छड्या वार्यावर डोलत असतात
आणि “ये रात ये चांदनी फिर कहा....सुन जा दिलकी दा ss स्ता...........” हेमंत
कुमार चा मधाळ आवाज रात्रीचे थर अलगद उलगडत असतो....त्यातले काव्य सुंदर की संगीत...या
द्वंद्वात अडकता- अडकता आपण देवानंदच्या रोमॅंटिक चेहेर्याच्या पुन्हा एकदा
प्रेमात पडतो....
एस डी नावाचं गारुड आहेच तसं..... स्वर्गीय, सुमधुर आणि नायक नायिकेला अगदी
’सूट’ होणारं संगीत ही तर त्याची खासियत. देवानंद गाणं गातांना तो काही वेगळं
गातोय असं वाटतच नाही...ते गाणं असं त्याच्या अंतरंगातून उमलून आलेलं वाटतं....
शब्दांना असलेला खास बंगाली लहेजा, सुरांना दिलेली आर्त आळवणीची डूब, भावनेची
खोल खोल, आरस्पानी अभिव्यक्ती.....डोळे मिटून घ्यावेत आणि सगळं विसरुन एस डी
अनुभवत रहावा.
त्रिपुराच्या राजघराण्यात एस डी बर्मन यांचा जन्म झाला. आपल्याहून तब्बल पंधरा
वर्षांनी लहान असलेल्या मीरादेवींशी लग्न करुन त्यांनी ’नॉन रॉयल’ घराण्यातली बहू
आणल्या बद्दल घरच्यांचा रोष पत्करला होताच ज्याची परिणीती त्यांना राजघराण्याचे
वारसा हक्क नाकारण्यात झाली!
सुरुवातीला रेडिओ वर गायक म्हणून कारकीर्द सुरु केलेल्या सचिनदेव बर्मन
यांच्या गाण्यावर प्रामुख्याने बंगाली लोक संगीताचा प्रभाव होता.....शशधर
मुखर्जींच्या बोलावण्या वरुन १९४४ मधे ते नशीब आजमावायला मुंबईत दाखल झाले....पण चार
वर्षं झाली तरी म्हणावी तशी कामं व प्रसिद्धी मिळेना...निराश मनाने त्यांनी पुन्हा
कोलकत्याला परतायचाच निर्णय घेतला होता...पण त्यांना थोपविण्यात आलं...आणि १९५०
मधे नवकेतन – देव आनंदशी केलेला करार मात्र प्रसिद्धी-यशाच्या पायघड्या घालत आला....टॅक्सी
ड्रायव्हर, तेरे घर के सामने, नौ दो ग्यारह, काला पानी..पासून ते गाईड, पेइंग
गेस्ट, ज्वेल थीफ......यशाची कमान चढत गेली.
तलत चं जलते है जिसके लिए तेरी आंखोके दिये असो किंवा पिया तोसे नैना लागे रे
असो किंवा तेरे मेरे सपने अब एक रंग है असो … ........एस डी ने हिंदी चित्रपट
संगीतावर एक अमीट मुद्रा उमटवून ठेवली.
रात अकेली है........ऐकून पहा एकदा......का
..नों.. मे ...मेरे....आणि टीपेला पोहोचणारा आशाचा स्वर - जो भी चाहे कहिये......जो भी चाहे कहीये.......मग
पायर्या उतरत- घरंगळत आलेला संगीताचा तुकडा, ठेकेदार......!
ते चौथीच्या परीक्षेत असायचं तसं....
जीभ : काजू कतली :: कान : ? ( एस डी चं संगीत)
......असं उत्तर लिहीलं असतं मी!..पण हिंदी गाणी ही एक खरंच खास गोष्ट
आहे...जगातील कुठल्याही इतर भाषेच्या चित्रपटांत नसलेली.....डोळे, शब्द, लय, अभिनय
आणि संगीत...यांच्या भांडवलावर हृदयं काबीज करणारी एक अद्वितीय गोष्ट!
“अच्छा जी मै..” मधला मधुबाला चा मुद्राभिनय आठवून पहा... किती लाडीक रुसणं, हसणं आणि डोळे उघडमीट
करणं..... “रुठे तो हुजूर थे मेरी क्या खता”....म्हणत रागावलेला देव आणि त्याचा
अनुनय करणारी मधुबाला.....सगळ्या व्यावहारीकता विसरुन मन फक्त या दोघांच्या प्रेम
कहाणीत रंगून जातं.
असा निखळ आनंद आपल्याला बहाल करणारा एस डी आपल्यातून जाऊन ४० वर्षं होतील….
मनामनांवर अधिराज्य करणारं असं काहीतरी काम करुन
जे जातात त्यांनाच खरे जीवन कळले म्हणायचे……!!
2 comments:
संगीतकार एस डी बर्मन हे माझे पहिले आवडते संगीतकार आहेत. त्यांनी संगीतबद्द केलेली सर्वच्या सर्व गाणी मला खूप आवडतात. आणि अर्थातच मला आर डी बर्मनची गाणी पण तितकीच जास्त आवडतात. तेरे मेरे सपने आणि शर्मिलीतली सर्वच्या सर्व गाणी इतकी काही छान आहेत की ती ऐकल्यावर खूप उत्साह येतो मला. खूप छान पोस्ट. आवडली.
:-) RohiniTai,
Thank you for visiting my Blog and commenting....!!
Otherwise, No one turns up here!
Post a Comment