Thursday, September 27, 2018

पानगळ


हे निष्पर्ण तरुंचे रान
काय धाडते सांगावा
जरी दिसेना पाथेय
मार्ग लागतोच चालावा

नाही मातीची क्षिती,
पाण्याचीही नाही मिती
सर्वस्वाला त्यागून
मी झालो जोगती

उधाणलेल्या वार्‍याला
कोसळणार्‍या धारेला
तोंड देण्या सज्ज मी
वीज- वादळ - वार्‍याला

सृजनाचा आदिम ध्यास
भरुन घेईन नवा श्वास
अंगांगावर नवीन माझ्या
पानांची नाजूक आरास

उषा निशेच्या संधीकाली
आर्त गूढ माझी सावली
तुझे माझे मैत्र पहाया
उत्सुक पानोपानी लाली 

ऋतू येती आणिक जाती
काळफुलांची अक्षय गती
सुख दु:खांपरी जीवनातल्या
बहर येती, बहर जाती

No comments: