Wednesday, July 24, 2019

ए दिले नादान.........................

काल परवा टी व्ही वर सहज सर्फ़ींग करताना ए दिल ए नादान हे रजिया सुलतान मधलं गाणं कानावर आलं...आणि मन तिथेच थबकून राहिलं!
रझिया – बाराव्या शतकातली दिल्लीची एकमेव स्त्री साम्राज्ञी! तिच्या सिंहासनावर बसण्याने अनेक वादळे उठली, अनेक आक्षेप घेतले गेले आणि तिला असंख्य आव्हानांना सामोरे जावे लागले.
तिची वादळी कारकीर्द, तिचे हबशी गुलाम- जमालुद्दीन याकुत वरचे प्रेम, त्यावरुन तिच्या नियोजित वरासोबत – मलिक अल्तुनिया सोबत झालेले वाद, ताणतणाव, राजकारण, रक्तपात...सगळे नजरे समोर आले.
कमाल अमरोही लिखीत- दिग्दर्शित एक फारशी न गाजलेली कलाकृती!
पण जा निसार अखर यांचे लाजवाब शब्द आणि खय्याम यांच्या मधुर सुरावटींनी चित्रपटाची बाजीच पलटून गेली. सिनेमाला संगीताचे झळाळते कोंदण मिळाले!
ए दिले नादान तर अजरामर ठरले.
हेमा मालिनी चा मर्यादित अभिनय, बसका, सपाट आवाज आणि अजिबात तरल नसलेली, जड देहबोली यांनाही आपल्या लयबद्ध, मधुर सुरावटींनी उंचीवर नेऊन ठेवणारं हे अप्रतिम गीत.
संतूर च्या मधुर सुरावटींनी गाण्याची सुरुवात होते. या मधेच पॉज घेत झंकारणार्‍या संतूर च्या सुरांत एक वेगळेच सामर्थ्य आहे. वाळवंटातील न संपणार्‍या लांबचलांब रस्त्यांसारखे हे पॉजेस वाटतात. हृदयाचा खिन्नपणा, रिक्तपण अधोरेखित करणारे!
गाण्यातील एकूण वातावरणनिर्मिती व बाज या सुरुवातीच्या थांबत थांबत वाजणार्‍या संतूर च्या तुकड्यांनी साधला जातो.
रिक्ततेची व अपूर्ण प्रीतीची वेदना हृदयात खोलवर उतरत जाते. एखाद्या वाटसरुने जशी पाण्याची वाट पहावी तसे तिचे हृदय प्रेमासाठी आसुसलेले आहे. ए दिले नादान ची विराणी अशाच एका भग्न हृदयाची विराणी आहे. संतूर- सारंगीचे मधुर स्वर हे त्या प्रीतीच्या उत्कट, अव्यक्त भावनेला पूरक ठरतात.
नंतर सुरु होते तबला आणि व्हायोलिन ची साथ.. आणि लतादीदीचा स्वर्गीय आवाज..
संतूर आणि लता यांची जणू जुगलबंदी चालल्याप्रमाणे ! संतूर, व्हायोलीन आणि ढोल च्या साजात लताचा सूर मिसळतो.......अलगदपणे--- अंतरा गाताना. “कैसी उल्झन है... “ च्या वेळचे लता चे स्वर ... काळीज घायाळ करत जातात.
“एक साया सा...रुबरु क्या है....” ऐकताना खरेच असे वाटत राहते की खाली एक सावली चालतेय वाळूच्या दूर दूर पसरलेल्या मऊ वाळवंटात! नि:शब्द पणे पण लयीत!
दुसरं कडवं सुरु होतं सारंगी च्या लकेरींसोबत... त्या पात्राची आर्तता, दु:ख, व्यथा, खंत आपल्या मनाला भिडत जाते.
क्या कयामत है, क्या मुसीबत है
कह नही सकते , किसका अरमा है
जिंदगी जैसे खोयी खोयी है, हैरां हैरां है
सुरु होतो आहे शेवटाकडे नेणारा प्रवास. सगळं संपलं आहे. काय हवं आहे तेही कळत नाही.
दृष्टीक्षेपात आहे फक्त एक उजाड, वैराण वाळवंट! फक्त शेवट नजरेत येत नाही...या अंतहीन वाळवंटा सारखाच! चहूकडे एक व्याकूळ आर्तता भरुन राहिलेली
हे अतिशय सुंदर संगीतातून व्यक्त होतं..लतादी उत्कट स्वरांनी गातात...
क्या कयामत है, क्या मुसीबत है...
भळभळती जखम उरात घेऊन, जीवनातील एकसुरी संथ दु:खाला सामोरं ठेवून .एक लांब पॉज आणि मग,
ये जमीं चूप है,आसमा चूप है.....
अस्वस्थता वाढत जाते. सदाबहार, खळाळता निसर्गही हिच्या दु:खापुढे हतबल आहे. हृदयाचे ठोकेच जणू असे तबल्याचे बोल मनाचा तळ ढवळून टाकतात. कुणी हाकेला ओ द्यायला नाही, मनाची साद ऐकायला कुणी नाही अशी एकाकी, आर्त अवस्था!

हा गाण्यातील अत्युच्च बिंदू आहे. गळ्याशी आवंढा दाटतो,
काय सुंदर संगीत आहे!
मानवी भाव भावना इतक्य उत्कटतेने फक्त वाद्यांच्या सुरावटीतून व्यक्त फार कमी ठिकाणी केल्या गेलेल्या दिसतात!
खय्याम यांच्या कारकीर्दीतले हे एक उत्कृष्ट गीत! फक्त संतूर, तबला सारंगी आणि ढोल वापरुन एक सुरेख गोफ विणला जातो. अगदी कमी वाद्यं वापरुनही सुरेल ताल साधला जातो आणि त्यावर आपल्या अप्रतिम गोड आवाजाने लताबाई सोन्याचा मुलामा देतात.
त्यांचा ठेहराव, बारकावे, भरल्या गळ्यातलं अधीरेपण, आणि खोल खोल जाणवणारं रिकामपण...यांनी एक पूर्ण गाणं तयार होतं.
जा निसार अखतर यांचे शब्द, आणि हेमा मालिनी व कमाल अमरोही यांनी पडद्यावर साकारलेली एक हलती बोलती कविता.....यांनी हे गाणे चिरंतन ठरते
आपल्याला एक अप्रतिम गाणे ऐकल्याचा आनंद मिळतो.

Monday, July 01, 2019

तू अन मी.....

मी आणि तू .. मला दुसरे काही नको

डोळ्यांचीच भाषा बोलू .. शब्द सुद्धा नको


बैस असा शेजारी .. फक्त हात घे हातात

चंद्राचाच लावू दिवा .. रात्र काळी नको


ओघळू दे केसातून .. काही फुले हातावर

श्वासांनाच मोजू फक्त .. तारे बिरे नको


खेळू देत वार्‍याला .. मुक्त अवखळ बटांशी

डोळे म्हणतील ’नाही’ जरी .. मुळी त्याचं ऐकू नको


होऊ दे पहाट ...... अन मावळू दे ना चंद्र

तुझे ..माझे.. आता असे..काही ठेऊ नको