Friday, August 19, 2022

जिंदगी गुलजार है... (गुलजार यांच्या वाढदिवसा निमित्त)

 

एक ही ख्वाब कई बार...

प्रेमात पडलं आणि मनासारखा जोडीदार मिळाला की मग सुरू होतं स्वप्नरंजन! कधी एकट्याने, तर कधी जोडीदाराबरोबर, कधी रात्री झोपेत, किंवा कधी चक्क दिवसाउजेडी ! स्वप्नांना सीमाच नसल्यामुळे आपल्या त्या वेळच्या मनस्थितीनुसार , परिस्थितीनुसार , ऐपतीनुसार प्रत्येकालाच स्वप्न पडत असतात. गुलजार साहेब हे काय रसायन आहे हे आपल्याला माहित आहेच. शालीन, तरल रोमान्स आणि त्यातही थोडा नटखटपणा ही त्यांची वैशिट्य. "किनारा" चित्रपटातलं एक ही ख्वाब देखा है कोई बार मैने हे नायकाने पाहिलेल्या त्याच्या स्वप्नाबद्दलचं गाणं गुलजारांच्या सगळ्याऽऽऽ वैशिष्ट्यांसह अवतरतं! 🥰

धृवपदाची ओळ ही इतकीच आहे. मग, त्याने अनेकदा पाहिलेल्या स्वप्नाबद्दल लगोलग नायक सांगायला लागतो आणि म्हणतो, तूने साडी में उरस ली है चाबियां मेरे घर की!! पहिल्या कडव्यातल्या पहिल्याच वाक्यात आपली विकेट जाते! ☺️काय कमाल कल्पना आहे पहा! एकाच वाक्याचे केवढे सोपे आणि तरीही गहन अर्थ आहेत! प्रेयसीकडे त्याच्या घराच्या किल्ल्या आहेत- म्हणजेच त्याच्यावरचं तिचं स्वामित्व त्याने खुशीने मान्य केलं आहे... स्वत:सकट संपूर्ण घराला त्याने तिच्या स्वाधीन केलेले आहे! बरं, तिनेही किल्ल्या नुसत्याच घेऊन पर्समध्ये नाही ठेवलेल्या... तिने उरसली है चाबियां! उरसना म्हणजे खेळणे, चेंडू जसा आपण एका हातातून दुसऱ्या हातात वर-खाली करत खेळतो, तशा ती त्याच्या घराच्या किल्ल्यांशी खेळ खेळत आहे... याचाच अर्थ, तिनेही त्याच्यावरचा आणि त्याचा घरावरचा स्वत:चा हक्क मान्य केलेला आहे, अगदी सहजगत्या! हेच तर स्वप्न प्रेमी जीव पहात असतात ना- एका घरात एकत्र राहायचं! या साध्या ओळीचा इतका multi layered अर्थ आहे महाराजा... कारण ते आहेत गुलजार! अशीच प्रत्येक ओळ वेधक आहे, सोप्या समजणाऱ्या भाषेत लिहिलेली, पण त्यातूनही खूप काही सांगणारी... याच गाण्यातल्या माझ्या आणखी एका आवडत्या ओळीबद्दल सांगते...

’...और बिस्तर से कई बार जगाया है तुझको. सहसा जेव्हा पुरुष स्वप्न बघतो, तेव्हा तो लोळत असतो आणि त्याची प्रेयसी त्याच्याजवळ येऊन, गोड बोलत, लाजत त्याला उठवते. मग तो तिलाच जवळ ओढतो, मग त्यांचे प्रणयाराधन वै वै 😛हे क्लिशे दृश्य गुलजार किती सहजतेने रिव्हर्स करतात! इथे, तो 'तिच्या आधी' उठला आहे, तो तिला खूप उशीरापर्यंत झोपायची मुभा देतोय आणि मग तिला जागं करतोय.. एकदा नाही, अनेकदा घडतंय हे त्यांच्यात! बाईने उशीरापर्यंत लोळत राहणं, म्हणजे किती भयंकर पाप समजलं जातं, अजूनही, हे माहित आहे ना? त्या पार्श्वभूमीवर, १९७६मध्ये काय कमालीचं रोमॅंटिक आणि forward आहे हे! Again, so much in so little! Salute boss.

गाण्यातलं शेवटचं कडवं म्हणजे परत एक सिक्सर आहे. तो म्हणतो, जब तुम्हारा ये ख्वाब देखा था, अपने बिस्तर पे मैं उस वक्त पडा जाग रहा था. यातली जाग रहा था हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. जे स्वप्न आपण झोपेत पाहतो, त्यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं. आपण सगळेच अतिशय रॅन्डम स्वप्न पाहतो. पण जागेपणी जी स्वप्न पाहिली जातात ना, त्यांना वास्तवाचं कोंदण असतं. त्यामुळेच, जेव्हा नायक म्हणतो, की आपल्या दोघांच्या साध्या, सोप्या पण प्रेमळ सहजीवनाचं मी स्वप्न पाहतो, जागेपणी पाहतो, आणि तेही कई बार तेव्हा तो या नात्यात किती खोलवर गुंतलेला आहे, किती committed आहे हेच दिसतं, हो ना? 💘