Wednesday, July 02, 2008

कंचनीचा महाल

तोच तो इच्छित दीपक दिसला काठाशी हासत आले
क्षितीजा पासून क्षितीजा पर्यंत आकाश कंपीत झाले
अहंते वर या ओवाळले रे मी पाचही हे प्राण माझे
भरून छातीत नेत्रांत धावले उन्मत्त उधाण माझे
ताठर नाचत होता रे माझ्या या भुवयां वरती माज
माथीचा चंद्रही बघत होता हा बुडून गेलेली सांज
तोच ती आली रे हाक त्या पोराची उभार ते हात होते
दाबून घट्ट हे अधर तरी मी समोर पहात होते
आतले कठीण्य तनूत आले रे तोच अन झाले मी काळी
कठीण पणा हा गोठून पडले दगड बनून खाली


माझ्या या महाला मधल्या प्रत्येक कमानी कमानी पुढे
वार्‍याच्या झुळूकी वरुन आत्ताच वाजत गेले रे चुडे
प्रत्येक रंगीत हातात होती रे उज्ज्वल दीपाची थाळी
प्रत्येक कपाळी शोभत होती रे मोत्यांची सुंदर जाळी
तुपाचे दीपक जाळून होता मी चांदवा धूसर केला
जेथून निघाले त्याच या भूमीचा संपूर्ण विसर केला
बाभळी वरल्या फुलांत आता मी सोसते पाऊस ऊन
आज मी आहे रे पाषाण होते मी कोमल कुसुमाहून
फुलले परंतु वाहिले नव्हते चंपक पुष्प मी ताजे
कळस लावून रितेच ठेविले मानस मंदिर माझे

खालच्या मैदानावर मी रात्रीत दुरात ऐकते टापा
ऐकते तमात एकाकी गुराच्या या भिंती जवळ धापा
कमानी कमानी मधून सारखा हुंकार देतात वारे
पाहत जातात भकास निळ्या या आकाशा मधले तारे
आतून लागते आच पण हा दगड पेटत नाही
सगळे पारखे दयेचे मायेचे कुणीच भेटत नाही
अंधार्‍या रात्रीत ती सारी नगरी तमात बुडते बाई!
मिटल्या दातांच्या ओसाड भिंती या बोलत नाहीत काही
पुनव येताच वासनामय मी दगडा मधून येते
महाला भोवती चांदण्या खालती तेच ते फेर मी घेते

कशी रे रंगवू आज मी राजसा ते चित्र पुसट लेले
पुनव रात्रीत माझे हे हिंडते मानस विस्कटलेले
दक्षिण दाराच्या बाहेर पडले अनेक शतके अशी
पाषाण मय हे अचल जिवीत सोशीत आहे मी पिशी
पडल्या शीळेला भेटला नाही रे कुणीच रंक वा राजा
मीच रे ऐकला मानव वांछेचा सुदीर्घ निःश्वास माझा
दोनच उरले मजले खालचे कुणीच नाही रे गडी
एकही कवाड नाही रे आणखी एकही नाही रे कडी
घुमतो पारवा झोंबतो गारवा वार्यात वाजते शिटी
सहस्त्र भुजंग बळाने राजसा एकच घाल रे मिठी !



समाप्त!


(ना घ देशपांडे या कविवर्यांविषयी अधिक माहिती मिळेल का?
इतके उत्कृष्ट लिखाण / काव्य करणारा कवि अंमळ दुर्लक्षित राहीला असे वाटते. कुणी यावर काही सांगू शकेल काय?)

इतकी दीर्घ कविता वाचाण्याचा पेशंन्स ठेवल्याबद्दल वाचकांचेही आभार