Tuesday, January 29, 2008

चला दोस्त हो, आयुष्यावर बोलू काही.......

नक्की काय हवं असतं आपल्याला आयुष्याकडून? सुख,प्रेम,रेकग्निशन,श्रेय,मटेरिअल गोष्टी......?

पूर्वीचे ते निवांत, सुंदर रिकामे क्षण चांगले की आताचे धावपळीचे पण अनिश्चित आयुष्य चांगले....

"बैठे रहे तसव्वुर ए जाना किए हुए", म्हणत असं प्रेमावर विसंबत, रेंगाळत ,त्या अनुषंगाने येणार्‍या अपरिहार्य कमतरतेला स्वीकारत जगलेलं बेधुंद आयुष्य खरं की,
"गोल" च्या मागे लागून धावाधाव करीत, उसंत न घेता अविश्रांत श्रमून मोलानं मिळवलेले विसाव्याचे क्षण अधिक आनंददायी.....

आपणच आपलं ठरवायला हवं.....लॉंग टर्म उद्दिष्ट ..........

स्वच्छ सूर्यप्रकाशात, निखळ चांदण्यात, समुद्राच्या गाजेत, वार्‍याच्या पाव्यात.........जीवन असं वेचून घेता यायला हवं.

Tuesday, January 22, 2008

अंतीम युद्ध - अंतीम भाग

१४ एप्रिल ५१२७

सेव्ह अर्थ मिशन ची दुसरी आणि अंतीम फेज चालू झाली होती. प्रयोगाच्या सुरुवातीला पृथ्वीवर जागी आणि जिवंत असलेली सगळी माणसं आता मृत्यू पावली होती.
सगळ्या अवनीवर एक भीषण शांतता नांदत होती.
फक्त अधून मधून होणारा स्फोटांचा भयंकर कानठळ्या बसविणारा आवाज, उठणारा धुरळा, ऑटोमॅटीक रोबोट्स आणि मशीन्स च्या हालचाली, प्री प्रोग्रॅम्ड प्रोसेसेसची अंमलबजावणी...यांचेच काय ते साम्राज्य होते.

बरीच कार्बन डाय ऑक्साईड ची सिंक्स जमिनीलगत साठली होती. शक्तिशाली माईन बॉम्ब्ज द्वारे त्यांना खोल जमिनीखाली खेचून अधिकाधिक ऑक्सिजन रिलीज करण्याची योजना कार्यान्वित होत होती.
भूगर्भात CO2 ओढून घेऊन O2 चे प्रमाण वाढविण्यात येत होते.


प्राणवायू! चराचराला आपल्या अंकित करणारा एक प्रभावी, दीप्त , ओजस स्त्रोत! ..सार्‍या सृष्टीचा आदी,मध्य आणि अंत !.. जीवनाचा मूलाधार.


आज प्रथमच सूर्याची किरणं धुक्याचं कवच भेदून जमिनीपर्यंत पोहोचली होती. गेली अनेक दशकं धुरकट,खिन्न काळोखात असलेल्या पृथ्वीला त्या सोनसळी किरणांची फार फार अपूर्वाई होती.
नव्या प्रकाशमय युगाची जणू ती एक झलक होती.
.................


.................

हवा हलकेच स्वच्छ, नितळ होत होती. वातावरणात किंचीत उबदार ताजेपणा होता. हिमालयातल्य़ा कुशीत असलेल्या त्या निर्जन, कधीकाळी एका वाहत्या नदीचे खोरे असलेल्या प्रदेशात एक अंकुर उगवला होता. जीवनाची पहिली लसलसती निशाणी.नव्या आशेचा पहिला उन्मेष.
दोन हिरवीगार, नाजूक पानं हवेवर डोलून आपल्या अस्तित्वाची सुखद साक्ष देत होती.
दवबिंदूंचं सुद्धा ओझं व्हावं इतकी ती डहाळी अलवार होती. पण ती उगवली होती....जगली होती.........वाढत होती...हे फार अप्रूप होतं! निदांच्या द्रष्ट्या सिद्धातांना आलेले ते एक दृष्य यश होते.


६-सप्टें-५२७०

खूप गाढ, गहिर्‍या निद्रेतून हळूहळू जागं झाल्याप्रमाणे निलोने डोळे उघडले.
तिला स्थळकाळाचं काही भानच नव्हतं.
सगळ्या संवेदना जणू गोठून गेल्या होत्या. ...........
मन बधिर होतं. ............

सुमारे आठवडा भराच्या कालावधी नंतर ती बरीचशी ठीक झाली. तिच्या हिल्चीप च्या कमांड्स कार्यान्वित झाल्या. आणि तिला आपल्या अस्तित्वाची, इतिहासाची रोमांचीत करणारी जाणीव झाली.
..............

बाजूच्या कूपेत निद्रिस्त असलेल्या केवलकडे तिने मान उंचावून दृष्टिक्षेप टाकला. तिच्या तपकिरी डोळ्यांत स्मिताची एक लकेर उमटली. तिने हलकेच केवल ला "वेक अप" कॉल दिला.
धरतीला पुन्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी नव्या समर्थ पिढीच्या हातात सूत्रे देणे तिचे विहीत कार्य होते, तिने आवश्यक त्या सूचना आत्मविश्वासाने फ़ीड इन करायला सुरुवात केली.




ती नव्या युगाची प्रसन्न पहाट होती.





टीप: वाचकहो, तुमच्या पेशन्स बद्दल आभार. यातल्या सगळ्या तांत्रिक, साहित्यिक आणि इतर त्रुटींबद्दल मी आधीच क्षमा मागते.
ब्लॉग कसंकाय , आभार!

Monday, January 21, 2008

अंतीम युद्ध

आजवर अनेकदा तिने निदांच्या प्रयोगावर विचार केला होता.त्याचे सगळे महत्वाचे टप्पे अभ्यासले होते.

बाहेरच्या इझी चेअर वर बसून तिने तिचा अपडेटर कानाला लावला.
(अपडेटर : जगातल्या लेटेस्ट घडामोडींची बित्तंबातमी सांगणारा प्रोग्रॅमेबल फोन)

वनस्पती ज्या तंत्राद्वारे कार्बन डाय ऑक्साईड आत घेतात तेच तंत्र वापरुन निदांच्या शास्त्रज्ञ सहकार्‍यांनी काही CO2 सिंक्स निर्माण केली होती.
त्याच रिऍक्शन द्वारे ऑक्सिजन उत्सर्जित होणे अपेक्षित होते.

हेच मास स्केल वर करण्यासाठी बॉम्ब्स टाकून साखळी प्रक्रियेद्वारे अधिकाधिक ऑक्सिजन कसा उत्सर्जित होईल ते पाहिले गेले होते.
अशा तर्‍हेने काही CO2 सिंक्स हळूहळू तयार होत होती.

अचानक तिचा अपडेटर थरथरु लागला. विशिष्ट बातमी असल्यास व्हायब्रेटर मोड वर जाण्यास त्याला प्रोग्राम करण्यात आले होते.
विरीताने उत्सुकतेने त्याच्या चिमुकल्या स्क्रीन कडे बघितलं.

"ट्रेस ऑक्सिजन फाऊंड निअर एकंकागुआ पिक ऑफ ऍंन्डीज...पॉसिबिलिटी ऑफ़ मोअर सच पॉईन्ट्स प्रेडिक्टेड!"

विरीताने अधिर मनाने ती न्यूज पुनःपुन्हा वाचली.
तिचे हात भावनातिरेकाने गार पडले. हॄदय धडधडू लागले. केवलच्या आठवणीने भरून आलेले डोळे तिने निग्रहाने पुसले.

Wednesday, January 09, 2008

अंतीम युद्ध

टीप : कार्बन सायकल :
हवेतील कार्बन डाय ऑक्साईड वायू सोडण्याचे व पुन्हा ऍब्सॉर्ब हॊण्याचे चक्र. वाढत्या औद्योगिकिकरणामुळे व बेफ़िकिर,अनिर्बंध प्लास्टिक,पेट्रोल वापरामुळे हवेतील कार्बन डाय ऑक्साईड चे प्रमाण लक्षणीय रित्या वाढते आहे. त्यामुळे पृथ्वीला आतील उष्णता बाहेर न जाऊ देणारे एक घातक आवरण तयार होते आहे.
त्यामुळे आपली पृथ्वी हळूहळू पण निश्चित पणे तप्त होत आहे. गेल्या ५० वर्षांत पृथ्वीचे सरासरी तापमान .६ डिग्रीज ने वाढले आहे. हे असेच चालू राहिले तर एक दिवस वाढत्या तापमानामुळे पृथ्वीवरचे सारे जीवन धोक्यात येईल. म्हणून ही साखळी नियंत्रित करुन उलटी फिरविण्याची गरज आहे, जेणेकरुन, पृथ्वीवर ऑक्सिजन- ओझोन चे प्रमाण वाधेल व संतुलन होईल.
हे अर्थात आपणा सर्वांच्या सवयी, विचार आचाराच्या पद्धती, समज यांत आमूलाग्र बदल केल्यासच शक्य होणार आहे.
(पण इथे मी, ते शास्त्रज्ञांनी काही उपकरणांद्वारे व तंत्रज्ञानाद्वारे, मशीन्स ने अंमलात आणले असे दाखविले आहे.)
थोडाफार ऑक्सिजन कृत्रीम रित्या बनविणे शक्य होईलही ...पण पूर्ण साखळी च उलटी फिरविणे हे आपल्या वर्तणुकीवर अवलंबून आहे!



१० डिसें ५०३७

विरीताने क्षीण नजरेने खिडकी बाहेर बघण्याचा यत्न केला. त्या महत्वाकांक्षी प्रयोगाला आज तब्बल तीस वर्षे उलटली होती.

"म्हातारे झालो आपण आता..." ती मनाशीच उद्गारली.
ती हळूहळू चालत बाहेरच्या पोर्च मध्ये आली.

Thursday, January 03, 2008

अंतीम युद्ध

अतिशय एकाग्र चित्ताने निदांनी आपल्या जिओटेल वर सूचना फ़ीड इन करायला सुरुवात केली.
तर्काचा मापदंड लावून काढलेले निष्कर्ष आता प्रत्यक्ष पडताळले जाणार होते. हे फार अवघड काम होते.

शेकडो लोकांचा जीव पणाला लावून स्वीकारलेले हे एक आव्हान होते. कार्बन सायकल रिव्हर्सल च्या साईड इफेक्ट्स चे अनेक वेळा अभ्यासलेले सिम्युलेशन त्यांनी पुन्हा एकवार उघडले. व्हर्चुअल रिऍलिटी च्या सहाय्याने त्यांनी अनेक घटनांची चाचपणी आधीच केली होती. त्यासाठी करावयाचे प्रिव्हेंटिव्ह उपायही योजून ठेवले होते.
तरीही ते गंभीर होते.

सर्वच बाबतीत यशाची शाश्वती नव्हती.