Tuesday, January 22, 2008

अंतीम युद्ध - अंतीम भाग

१४ एप्रिल ५१२७

सेव्ह अर्थ मिशन ची दुसरी आणि अंतीम फेज चालू झाली होती. प्रयोगाच्या सुरुवातीला पृथ्वीवर जागी आणि जिवंत असलेली सगळी माणसं आता मृत्यू पावली होती.
सगळ्या अवनीवर एक भीषण शांतता नांदत होती.
फक्त अधून मधून होणारा स्फोटांचा भयंकर कानठळ्या बसविणारा आवाज, उठणारा धुरळा, ऑटोमॅटीक रोबोट्स आणि मशीन्स च्या हालचाली, प्री प्रोग्रॅम्ड प्रोसेसेसची अंमलबजावणी...यांचेच काय ते साम्राज्य होते.

बरीच कार्बन डाय ऑक्साईड ची सिंक्स जमिनीलगत साठली होती. शक्तिशाली माईन बॉम्ब्ज द्वारे त्यांना खोल जमिनीखाली खेचून अधिकाधिक ऑक्सिजन रिलीज करण्याची योजना कार्यान्वित होत होती.
भूगर्भात CO2 ओढून घेऊन O2 चे प्रमाण वाढविण्यात येत होते.


प्राणवायू! चराचराला आपल्या अंकित करणारा एक प्रभावी, दीप्त , ओजस स्त्रोत! ..सार्‍या सृष्टीचा आदी,मध्य आणि अंत !.. जीवनाचा मूलाधार.


आज प्रथमच सूर्याची किरणं धुक्याचं कवच भेदून जमिनीपर्यंत पोहोचली होती. गेली अनेक दशकं धुरकट,खिन्न काळोखात असलेल्या पृथ्वीला त्या सोनसळी किरणांची फार फार अपूर्वाई होती.
नव्या प्रकाशमय युगाची जणू ती एक झलक होती.
.................


.................

हवा हलकेच स्वच्छ, नितळ होत होती. वातावरणात किंचीत उबदार ताजेपणा होता. हिमालयातल्य़ा कुशीत असलेल्या त्या निर्जन, कधीकाळी एका वाहत्या नदीचे खोरे असलेल्या प्रदेशात एक अंकुर उगवला होता. जीवनाची पहिली लसलसती निशाणी.नव्या आशेचा पहिला उन्मेष.
दोन हिरवीगार, नाजूक पानं हवेवर डोलून आपल्या अस्तित्वाची सुखद साक्ष देत होती.
दवबिंदूंचं सुद्धा ओझं व्हावं इतकी ती डहाळी अलवार होती. पण ती उगवली होती....जगली होती.........वाढत होती...हे फार अप्रूप होतं! निदांच्या द्रष्ट्या सिद्धातांना आलेले ते एक दृष्य यश होते.


६-सप्टें-५२७०

खूप गाढ, गहिर्‍या निद्रेतून हळूहळू जागं झाल्याप्रमाणे निलोने डोळे उघडले.
तिला स्थळकाळाचं काही भानच नव्हतं.
सगळ्या संवेदना जणू गोठून गेल्या होत्या. ...........
मन बधिर होतं. ............

सुमारे आठवडा भराच्या कालावधी नंतर ती बरीचशी ठीक झाली. तिच्या हिल्चीप च्या कमांड्स कार्यान्वित झाल्या. आणि तिला आपल्या अस्तित्वाची, इतिहासाची रोमांचीत करणारी जाणीव झाली.
..............

बाजूच्या कूपेत निद्रिस्त असलेल्या केवलकडे तिने मान उंचावून दृष्टिक्षेप टाकला. तिच्या तपकिरी डोळ्यांत स्मिताची एक लकेर उमटली. तिने हलकेच केवल ला "वेक अप" कॉल दिला.
धरतीला पुन्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी नव्या समर्थ पिढीच्या हातात सूत्रे देणे तिचे विहीत कार्य होते, तिने आवश्यक त्या सूचना आत्मविश्वासाने फ़ीड इन करायला सुरुवात केली.




ती नव्या युगाची प्रसन्न पहाट होती.





टीप: वाचकहो, तुमच्या पेशन्स बद्दल आभार. यातल्या सगळ्या तांत्रिक, साहित्यिक आणि इतर त्रुटींबद्दल मी आधीच क्षमा मागते.
ब्लॉग कसंकाय , आभार!

3 comments:

HAREKRISHNAJI said...

बहुत खुब. गुरु से चेला सवाई.

मन कस्तुरी रे.. said...

धन्यवाद हरेक्रिश्नाजी...तुम्ही बरीच हरभर्‍याची झाडं लावलेली दिसतात तुमच्या कडे..?

HAREKRISHNAJI said...

ते काय असते ?