Friday, August 05, 2022

मथुरा गमन

 

आज गोकुळात गडबड उडाली होती..  गोपिका कुजबुजत होत्याजाणार म्हणतात! कृष्ण जाणार?

 गोकुळ सोडून? खरेच?

पण मग ? माता यशोदा आणि त्याचे सवंगडी आणि गायी? आणि आणि राधा..? तिचे काय?

सगळे नुसते प्रश्न.  घाबरवणारे, धास्तावणारे. व्याकुळ करणारे.

पण..आपण  थांबवू ना त्याला.  असा कसा जाऊ शकतो तो? आपल्या सर्वांना सोडून?

अगं..पण तो? तो  तर सूर्याचा कवडसा, तो तर चंद्र्किरण!  त्याला कसं थांबविणार आपण?

आणि राधा?

ती  सुदूर यमुनाकिनारी भान विसरुन एकटीच झाडाखाली बसली होती.

व्याकुळ, क्लांत पण तरीही आश्वस्त! मनोमन त्याचे जाणे समजून घेतलेली.

 

तिच्यासाठी तो परका नव्हताच !  तिच्या श्वासा-मनाचा भागच नव्हता का तो?

तो कुठे जाणार तिला सोडून? तिच्या अस्तित्वाचाच तर तो एक हिस्सा! तिच्या असण्याचाच तो पुरावा. तिचीच दुसरी प्रतिमा. 

छे! उगीचच बावरल्या सगळ्या . ती किंचित हासली.

त्याच्या आणि तिच्या अतूट भावबंधाची तिला पुन्हा एकवार खात्री पटली होती.

No comments: