Saturday, April 23, 2022

 गौरी देशपांडे -अनया

आपण बहुतेक सगळे ठरावीक प्रकारचं, ठरावीक पठडीच आयुष्य जगतो. कुटुंबाची प्रेमळ आणि भक्कम चौकट, थोडा धाक- थोडे लाड असं लहानपण. शिक्षण - अर्थार्जन -लग्न. मग वंशवृद्धी. त्या आणि बाकी संसाराच्या जबाबदाऱ्या. किराणे - भाज्या- बँका - रुपये पैसे - कामवाल्या - तब्येती - आजारपणं, एक आणि दोन. पुढचं सगळं सारखंच. आपली मुलबाळ मोठी होतात आणि आपण म्हातारे. मग फक्त भूमिकेत बदल होतात. बाकी सगळा त्याच तिकिटावर तोच खेळ. पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्षे चालूच.

ह्याचा अगदीच कंटाळा आला तर आपण पुस्तकं वाचतो, प्रवासाला जाऊन तिथे जाऊन आल्याचा पुरावा म्हणून फोटोबिटो काढतो. फारच धाडस दाखवायची हुक्की आली, तर डोंगर-दऱ्या-समुद्रकिनारे गाठतो.

बहुतेकांच आयुष्य ह्याच मार्गावरून जातं. ह्या मार्गात प्रेम-माया-जिव्हाळा-वात्सल्य वगैरे महत्त्वाचे थांबे असतात. तेही ठराविक साच्यातले. विशिष्ट प्रकारचे. आई-वडिलांनी मुलांवर करायचं प्रेम, नवरा बायकोनं एकमेकांवर करायचं प्रेम, भावा-बहिणींनी एकमेकांवर करायचं प्रेम वगैरे वगैरे. ही प्रेमं अशाच कोष्टकातल्या पद्धतीने, ह्याच व्यक्तीवर का करायचं? हा विचार आपल्या मनात येत नाही. कारण ह्या प्रेमाचे गोडवे ऐकतच आपण लहानाचे मोठे झालेले असतो.

ह्या प्रेम करण्यातली बंधनही आपल्याला उपजत कळतात. त्यामुळे आपण लोकं प्रेमातही सावध असतो. हो, समाजमान्य नसलेल्या जातकुळीतल्या एखाद्या प्रेमाची चूक आपल्याकडून घडायला नको. जीव उधळून, सर्वस्व पणाला लावून, बंधनं झुगारून निखळ प्रेमासाठी प्रेम करण्यात काय सुख मिळत, ह्याची कल्पना नसते आणि चुकीच्या प्रेमाच्या परिणामांचे चटके सोसण्याची तयारी तर अजिबात नसते. त्यामुळे आपलं 'धोपटमार्गा सोडू नको रे' आयुष्य आपल्याला नेमस्त रस्त्यावरून नेत राहतं.

पण जगात थोडीशी अशी माणसं असतात, की जी ह्या चौकटीच मानत नाहीत किंवा ह्या चौकटी त्यांच्यासाठी नसतातच. ह्या लोकांचं प्रेम 'असत'. ते हिशेब मांडून प्रेम 'करत' नाहीत. ही माणसं प्रेमासाठी काहीही पणाला लावायची तयारी ठेवतात. सर्वस्व उधळून द्यायला मागेपुढे बघत नाहीत. त्यांना त्या प्रेमाची वीज हातात घ्यायचीच असते. त्यापायी स्वतःचा कोळसा होईल, हे माहिती असलं तरीही आणि कदाचित म्हणूनच....

ही अशी माणसं आपल्याला गौरी देशपांडे ह्यांच्या पुस्तकातून भेटतात. वेगळीच असतात ती. पण गौरीही तशीच होती. अत्यंत बुद्धिमान. प्रखर, ठाम विचारांची पक्की बैठक. ते विचार तिचे स्वतःचे. दुसऱ्याला बरोबर वाटतात किंवा सगळे म्हणतात म्हणूनचे नाहीत. अतिशय मनस्वी, खूप वेगळं आयुष्य ती जगली. वाचलं, लिहिलं, आणि जाताना आपल्या 'बे एके बे' प्रकारच्या जगण्यात थोड्या ठिणग्या टाकून गेली.

इरावती कर्वे आणि दिनकरराव कर्वे ह्यांची ती मुलगी. महर्षी कर्व्यांची नात. ह्या कर्वे मंडळींच्या रक्तामध्येच मळलेली वाट न तुडवता आपल्याला खुणावणाऱ्या ताऱ्यामागे जाण्याचे गुण होते बहुधा. स्त्रीशिक्षणापासून, कुटुंब नियोजन, पुरातत्त्वशास्त्र, पर्यावरण सगळी क्षेत्र ह्या मंडळींनी गाजवली. इरावतीबाई आणि दिनकररावांच्या घरी मोकळं वातावरण होतं. एकोणीसशे चाळीसच्या दशकात जाई, आनंद आणि गौरी ही भावंड आपल्या आई- वडिलांना 'इरु' आणि 'दिनू' अशा नावाने हाक मारत असत!

गौरीने मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषांत मोजकं पण नसेवर नेमकं बोट ठेवणारं लिखाण केलं. कविता, लघुकादंबरी, कादंबरी असे अनेक साहित्यप्रकार हाताळले. 'आहे मनोहर तरी' 'अस्वस्थ दशकाची डायरी' अशी काही मराठी पुस्तकं इंग्रजीत अनुवादित केली तर 'अरेबियन नाइट्स' मराठीत अनुवादित केलं. आत्मचरित्र लिहिलं नसलं, तरी आहे हे असं आहे, कारागृहातून पत्रे, विंचुर्णीचे धडे अशा काही लेखनातून तिच्या आयुष्यातले हिंदोळे कळतात. तिची एकूण नऊ मराठी पुस्तकं आणि इतर काही लेख अशी मराठीतली साहित्यसंपदा होती.

गौरीची पुस्तकं प्रथम वाचली, तेव्हा मी काही दहावी - बारावीच्या वयात असेन. आमची वाचनाची साधना तेव्हा कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयात व्हायची. पुस्तकांचा ढीग असायचा. त्यातून जे रत्न तुमच्या हाताला लागेल ते तुमचं. लेखकानुसार वर्गीकरण वगैरे लाड नव्हते. त्यामुळे कुठल्या पुस्तकानंतर कुठलं पुस्तकं हातात येईल, ह्याला काही ताळमेळ नव्हता.

बऱ्याच कादंबऱ्या वाचायचे मी तेव्हा. दिवास्वप्न बघायचं वय होत माझं. कादंबरीतील नायिकेच्या जागी स्वतःची कल्पना करताना गुदगुल्या व्हायच्या. नायिकेचे नायकासाठी नटूनथटून तयार होणे, गरम वाफाळता चहा, खोबरं-कोथिंबीर घातलेले पोहे आणि मराठी कादंबरीकाराला झेपेल असा आणि इतकाच रोमान्स; अशा पुस्तकांनंतर गौरीच पुस्तक म्हणजे माझ्या मनातल्या प्रेमाच्या गोडच गोड कल्पनांवर पडलेला बॉम्बं होता. ह्या नायिकांच्या जागी स्वतःची नेमणूक करणं काही माझ्या मध्यमवर्गीय चौकटींना झेपण्यासारखं नव्हतं.

तेव्हा जगरहाटीशी ओळख व्हायची होती. त्यामुळे त्या पुस्तकातल्या बऱ्याच गोष्टी, गोष्टी म्हणून आवडल्या. पुस्तकात वारंवार येणारे परदेशाचे, पाश्चात्त्य साहित्य आणि संगीताचे, तिथल्या अॅलिस्टर, दिमित्री, इयन, तेरुओ अशा वेगळ्याच नावाच्या माणसांचे उल्लेख आणि एकंदरीत बिनधास वातावरण तेवढं लक्षात राहिलं. लिहिलेल्या शब्दांव्यतिरिक्त जे लिहिलं होतं, त्याची जाणीव व्हायला बरीच वर्षे जावी लागली. जगाचे थोडे टक्केटोणपे खाऊन निबर व्हावं लागलं.

गौरीची पुस्तकं नायिकाप्रधान असतात. तिच्या सगळ्या नायिका ह्या सुस्वरूप नसतात. किंवा असं म्हणूया, की त्यांना त्यांच्या रूपाची फिकीर नसते. कारण त्यांच्या आसपासच्या लोकांना त्या सुस्वरूप वाटत असतात. त्यांच्यातल्या आत्मविश्वासाचं प्रखर तेज मात्र आपल्याला त्या छापील पानांमधूनही जाणवत. बहुतेक सगळ्या नायिका उच्चशिक्षित असतात. शहर सोडून खेड्यात गेलेल्या, शेतीवाडीची आवड असणाऱ्या असतात. अपत्य नसतात किंवा हातावेगळी होऊन स्वतंत्र राहणारी असतात. जन्माला येताना आपण जसं हात-पाय-नाक-डोळे घेऊनच येतो तशा ह्या सगळ्या स्वातंत्र्य घेऊनच आलेल्या असतात. आपण जिकडेतिकडे कोणीतरी कोणालातरी स्वातंत्र्य 'दिलेलं'ऐकतो, तसं कुठल्याही प्रकारच्या पुरुष नातेवाइकाने, म्हणजे बाप, नवरा, भाऊ, मुलगा इत्यादींनी ते त्यांना 'दिलेलं' नसतं.

गौरीच्या सगळ्या नायकांची नावं कृष्णाची आहेत. वनमाळी, यदुनाथ, माधव, जनक वगैरे. नायिकांची नावेही कृष्णाच्या आयुष्याशी संबंधीत आहेत, कालिंदी, राधा, जसोदा. कृष्ण सोळा सहस्र नारींचा स्वामी होता. सगळ्यांचं समाधान करून पुन्हा आपली कर्तव्य पार पाडणारा. कोणावरही अन्याय न होऊ देणारा. गोकुळात चोरून लोणी खाणारा, गोपींच्या मेळ्यात रासक्रीडा करणारा, द्रौपदीला वस्त्र पुरवणारा आणि अर्जुनाला उपदेश करणारा पूर्ण पुरुष. ह्या जगात असे कृष्ण सापडायला कठीण किंवा अशक्यच म्हणाना!

गौरीचे नायकही कृष्णासारखेच आहेत. बायकोला समजून घेणारे. तिच्या गुणांबरोबर तिचे अवगुण ते फक्त स्वीकारत नाहीत तर त्या अवगुणांवरही मनापासून प्रेम करतात. ह्या गुणावगुणांचे मिश्रण असलेल्या आणि त्यामुळे सगळ्यांहून वेगळ्या असणाऱ्या तिच्यावर खूप खूप प्रेम करतात. नायिकेचे आपल्याला पचायला कठीण जाणारे विचार, निर्णय आनंदाने स्वीकारतात. नायिकेबद्दल मनात प्रेम, आदर, ममता असणारे, तिच्यावर जीव टाकणारे आदर्श पुरुष तिच्या लेखनात दिसतात! आपल्याला आदर्श पुरुष वाटेल असा समजूतदार जोडीदार असला, तरी नायिकेच्या मनातलं चित्र काहीसं अपूर्ण असतं. ते परिपूर्ण करण्यासाठी बऱ्याच गोष्टींमधून तिचा सखा डोकावतो. द्रौपदीचा कृष्ण कोण होता? सखा होता तो. नवरा, बॉयफ्रेंड ह्याच्या मधली जागा घेणारा!

गौरीने लिहिलेल्या गोष्टींना सुरवात आणि शेवट असा नसतो. एक रुबाबदार, श्रीमंत आणि कर्तबगार तरुण एका सुंदर, शिकलेली आणि संसाराला लायक असलेल्या तरुणीच्या प्रेमात पडतो आणि थोड्याफार अडचणी येऊन शेवट गोड होतो, ह्या ठराविक साच्यात तर ह्या गोष्टी अजिबात बसत नाहीत. ह्या गोष्टींमध्ये काय नसतं? ह्यात विवाहबाह्य, समाजमान्य नसलेले प्रेमसंबंध असतात, नायकासाठी तत्त्वांना - निष्ठांना -स्वत्वाला मुरड न घालणाऱ्या नायिका असतात.

गौरीच्या नायिका त्यांच्या भावनांप्रमाणे शरीराशीही प्रामाणिक असतात. प्रेम करण्याची आणि करून घेण्याची गरज त्या अन्न, वस्त्र निवारा ह्या गरजांच्या एवढी आणि एवढीच महत्त्वाची मानतात. काहीवेळा ती गरज, त्या समाजाच्या रूढ नात्यांच्या पलीकडे जाऊनही पूर्ण करतात. त्याबद्दल त्यांना अपराधी वाटत नाही आणि स्पष्टीकरण द्यायची गरजही. गौरीच्या नायकांना मात्र ही मोकळीक नाहीये. हे वनमाळी आणि माधवच्या गोष्टीत दिसत!'तेरुओ' मधली नायिका 'लग्न झालं असलं तरी मी माझे काही अवयव, काही क्रिया आणि काही भावना जनकला विकल्या नाहीयेत' असं म्हणते. पण नमूला मात्र 'माझ्यात आणि वनमाळीमध्ये जे घडत, ते अजून कोणात घडू नये,' असं वाटत!

गौरीच्या नायिकेला मनात खोलवर बोचणारी अशी एक अतृप्तता असते. तृप्तीची तहान वाढवणारी अतृप्तता. चटकन चिमटीत सापडणार नाही अशी. तिच्या आयुष्यात आर्थिक प्रश्न असले, तरी ते टोकाचे नसतात. वरवर पाहताना सुस्थितीतील असणारी ती अस्वस्थ मात्र असते. तिच्या संवेदनाशील मनाला काहीतरी डाचत असत. ते नक्की काय डाचतंय, हा प्रश्न आपल्याला फार त्रास देतो. कधी ती नात्यातला खरा अर्थ शोधत असते, तर कधी स्वतःच्या अस्तित्वाचा.

खूप हुशार असूनही गौरीची नायिका जगाच्या, व्यवहाराच्या पातळीवर यशस्वी नसते. तिला स्वतःच असं खास अस्तित्व नक्की असत. त्यावर लुब्ध असणारे पुरुष तिच्या अवतींभोवती असतात. पण तिला मात्र वेगळ्याच कशाचीतरी जीवघेणी आस असते. त्या उत्तराच्या मागे कितीतरी वेळा गौरीची नायिका नायकाचे अस्तित्व, त्याचा सहवास नाकारते. त्याच्या प्रेमाचे नाजूक, रेशमी, सुखकर आणि चिवट बंध तोडून टाकते. त्याच्यापासून, जगापासून लांब जाते, लपते. काहीशा नैराश्याच्या, आत्माविनाशाच्या रस्त्याला जाते असही वाटत.

मराठी साहित्याला स्त्री लेखिकांची मोठी परंपरा लाभली आहे. ताराबाई शिंदे, लक्ष्मीबाई टिळक ह्यांच्यापासून ते अगदी आजच्या कविता महाजन, मोनिका गजेंद्रगडकर ह्याच्यापर्यंत असंख्य स्त्रियांनी निरनिराळ्या पातळीवरून स्त्री आयुष्याच चित्र वाचकांपुढे उभं केलं. ह्या सगळ्या प्रभावळीत गौरीने केलेल्या लिखाणाच वेगळेपण काय आहे? त्याआधीच्या बऱ्याचशा साहित्यात स्त्रियांचे कौटुंबिक प्रश्न किंवा पुरुषी वर्चस्वामुळे निर्माण झालेले प्रश्न चर्चिले गेले होते. गौरीची पिढी ही स्वातंत्र्योत्तर पिढी होती. स्त्रियांपुढचे प्रश्न बदलले होते. संपले नव्हते. स्त्रीने शिक्षणासाठी, नोकरीसाठी घराचा उंबरठा ओलांडण्याची सवय समाजाला झाली होती. गौरीची पिढी ह्या प्रश्नांपासून पुढे आली होती. समाजाने स्त्रीकडे 'व्यक्ती' म्हणून बघावं अशा विचारांच्या प्रभावाखाली होती.

गौरीच्या लेखनात तिच्या मुक्त विचारांचं प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसतं. तिचं लेखन स्त्रीवादी असण्या पलीकडे जाऊन स्वातंत्र्यवादी, व्यक्तिवादी होतं. वेगवेगळ्या पातळीवरचं प्रेम, त्या प्रेमाची मोजावी लागणारी किंमत आणि त्या प्रेमाच्या मर्यादा ह्याबद्दलचे विचार तिच्या लेखनात दिसतात.
'एकेक पान गळावया' किंवा 'निरगाठी' मधल्या नायिका आपल्या आईपणाकडे वस्तुनिष्ठ पातळीवरून पाहू शकतात. समाज प्रत्येक आईला आपल्या मुलांबद्दल जे प्रेम, वात्सल्य वाटायलाच हवं, अशी अपेक्षा करतो, त्याबद्दल प्रश्न उभे करतात. आईपणाच्या दडपणांची आणि मुलांमुळे आयुष्यावर येणाऱ्या मर्यादांवर मोकळेपणाने भाष्य करू शकतात. मातृत्वाचे गोडवे न गाता आईपण निभावताना येणारा कंटाळा आणि मोडणारी पाठ ह्याबद्दल अपराधी वाटून घेत नाहीत.

गौरीच्या साहित्याबद्दल जी चर्चा झाली, ती मात्र तिने रंगवलेल्या देशीविदेशी प्रियकरांबद्दल आणि नायिकेच्या शरीरसंबंधांबद्दल. गौरीच्या लेखनात ह्या शरीरसंबंधांबद्दल धीट भाष्य आहे. ह्या धीटपणामुळे गौरीवर 'बंडखोर लेखिका' हा शिक्का मारला गेला. ह्या सगळ्या वर्णनातून गौरीने स्त्रियांच्या मानसिक आंदोलनांबद्दल आणि तिच्या लैंगिकतेबद्दल जे भाष्य केलं होतं, त्याकडे मात्र दुर्लक्ष झालं.

गौरी देशपांडेंनी जे साहित्य लिहिलं, त्यालाही आता बरीच वर्षे झाली. स्त्रिया आता आर्थिक, सामाजिक, वैचारिक स्वातंत्र्य काही प्रमाणात तरी गृहीत धरू लागल्या आहेत. समोर येणाऱ्या विचारांना 'का?' हा प्रश्न विचारण्याइतका आत्मविश्वास त्यांच्यात आला आहे. पण तरी गौरीच्या 'कारागृहातून पत्रे' मधल्या नायिकेने एका नात्यातून दुसऱ्या नात्यात जाण्याचं केलेलं 'जेलर बदलला, कोठडी तीच' हे वर्णन आजही तेवढंच लागू होतं. 'मुक्काम' मधली कालिंदी लग्न करताना 'होणाऱ्या नवऱ्यात चांगलं काय आहे, ह्यापेक्षा खटकण्यासारखं काही नाही' असा विचार करून त्याच्या गळ्यात माळ घालते. ह्याच विचारांनी जुळलेली कितीतरी नाती आपण आजूबाजूला पाहतोच.

गौरीच्या सगळ्या पुस्तकातून आपल्या मनात अंधुक स्वरूपात असलेले असे अनेक प्रश्न ठळक होतात. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, अनुभवांच्या वेगवेगळ्या वळणांवर हे प्रश्नही बदलत जातात आणि आपल्याला अस्वस्थ करत राहतात. कधीकधी ती पुस्तकं हातात धरायचीही भीती वाटेल, इतके त्रासदायक होतात. पण एकदा का गौरीच गारुड आपल्या मनावर झालं, की त्यातून सुटका अशी नाहीच. तो कॅलीडोस्कोप हातात धरून त्यात प्रत्येक वेळी वेगवेगळी दिसणारी जादुई नक्षी बघत राहणं इतकंच. बस....

माणसाच्या मनाला 'कोssहं' हा प्रश्न अनादी कालापासून सतावतो आहे. ' मी म्हणजे हा देह नाही. तर मग मी कोण?' अशा पद्धतीचा काहीतरी मूलभूत प्रश्न. ह्याच उत्तर नायिकेला मिळत नाही. पर्यायाने आपल्यालाही. गौरी ते उत्तर हातावर खाऊ ठेवावा, तितक्या सहजपणे आपल्यासमोर ठेवत नाही. ते ज्याने त्याने आपापल्या वकुबाप्रमाणे शोधायचं. हातात येतंय अस वाटत, तोच ते निसटतही. असा शोध घ्यायला लावणं, हेच गौरीच्या लिखाणाच सामर्थ्य.

2 comments:

आत्मबोध said...

खूप छान
याच पठडीतल्या लेखिका मेघना पेठेंचं साहित्य मला विशेषपणे आवडलेलं आहे.

मन कस्तुरी रे.. said...

:-) खरं आहे.
धन्यवाद अभिप्रायाबद्दल.