Showing posts with label साहित्य रसास्वाद. Show all posts
Showing posts with label साहित्य रसास्वाद. Show all posts

Tuesday, November 15, 2016

हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ

भालचंद्र नेमाडे यांचे गाजलेले एक अतिशय प्रभावी पुस्तक वाचनात आले. हिंदू.

आपली जगण्याची, धर्माकडे बघण्याची व्याख्या बदलून टाकण्याचे सामर्थ्य असणारे, अतिशय महत्वाचे पुस्तक. विशेषतः आजच्या पिढीला निदान मनातली गुंतागुंत कुठेतरी शब्दबद्ध केल्याचे समाधान देणारे, कुठलाही अभिनिवेश न बाळगता नेमके वर्मावर बोट ठेवणारे, हिंदू धर्मातल्या अनेक फोल समजुती, रुढी, परंपरा  यांचे विच्छेदन करणारे आणि थेट भिडणारे पुस्तक !     

कोसला वाचल्यानंतर नेमाडें बद्दल एक ’थोर’ आदर मनात भरुन राहीला होता. इतकी आरस्पानी भाषा, जणू समोर घडतंय असं चित्रदर्शी वर्णन, रेशमाच्या लडींप्रमाणे एकातून एक उलगडत जाणार्‍या घटना व प्रसंग, आणि कुठल्याही पानावरुन पुस्तक वाचायला सुरु केलं तरी लागत जाणारी संगती...

हिंदू ही कुणा एका खंडेरावाची – एकेकाळच्या तालेवार पाटील घराण्यातल्या मुलाची कथा आहे. 

नदीच्या प्रवाहाप्रमाणे खालीवर वाहत कथा पुढे जाते. काळाची चौकटीची फारशी पर्वा न करता तो त्याला आलेले घरचे-दारचे अनुभव अतिशय ओघवत्या, ग्रामिण बोलीत सांगत जातो...त्यात काही स्वगतं असतात, काही आयाबायांचे पारंपारीक उद्गार असतात आणि काही उप कथानकं...कथेला पुढे नेणारी. या विस्कळीत तुकड्य़ा तुकड्यांच्या जोडणीतूनच पूर्ण कथानक आकाराला येते.

र्यांच्या आगमनाने सिंधुतीरावर एक नवीन संस्कृती उदयास आली. अनेक शतकांपूर्वी विकसित झालेल्या या हिंदू संस्कृतीने जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करीत संपूर्ण भारतीय उपखंडात आपली पाळेमुळे रुजवली. तिने सतत प्रवाही राहून वेगवेगळ्या सामाजिक स्तरांना आपलंसं करुन घेतलं व नवनवीन संकल्पनांचा अंगीकार केला. मूळ तत्व तेच राहीले तरी नवीन विचारांचा स्वीकार केल्याने तिला एक बहुआयामी, दाट -समृद्ध पोत मिळाला ज्याचा परिणाम सामाजिक प्रथा व व्यक्तीगत नाते संबंधांवर होत राहीला.

आजही या संस्कृतीचा सार्वत्रिक परिणाम, तिच्या जमेच्या व दुबळ्या बाजूंसकट आपल्यावर होत असतो.

आपण समाजात राहतांना सतत बर्‍या वाईटाला पारखत, ’अपग्रेड’ होण्याची लढाई लढत असतो.  ही 

समृद्ध करणारी लढाई हा ’हिंदू’ चा गाभा आहे. ही कादंबरी जीवनातील भव्यता आणि अनेकविधता 

एखाद्या महाकाव्याच्या धर्तीवर साकारते. वाचनाचा अतिशय आनंद देणारे हे पुस्तक तुम्हाला 

स्वतःचाच नव्याने धांडोळा घ्यायला उद्युक्त करते.

समाजात वावरताना धार्मिकता’ अनेक अंगांनी सामोरी येते. स्त्रिया धार्मिक असतातपुरूष धार्मिक असतातलहान मुले-मुलीही धार्मिक असतात. श्रद्धा फक्त गरीब आणि ग्रामीण भागातल्याच लोकांच्या असतात असे नाही. नावाजलेल्या संस्थेत शिकलेल्या आणि सामाजिक परिवर्तनाच्या कामात रमणा-या लोकांच्याही श्रद्धा असतात.  श्रद्धाच नाही तर देव भोळेपण . काही पुराणातील देवांना भजतात तर काही ऐतिहासिक माणसांना देवासमान मानतात. काहींनी माणसांना जिवंतपणीच देवत्व बहाल केलेले असते. प्रत्येकाची देवता वेगळीप्रत्येकाचे श्रद्धास्थान वेगळे आणि प्रत्येकाची आपल्याकडून असणारी अपेक्षाही वेगळीच! 
काहींची धार्मिकता सहिष्णू असतेतर अनेकांची आक्रमककाहींची सौम्य असतेतर काहींची धगधगतीकाहींची भयातून आलेली असते तर काहींची समजण्यातून. शिवाय व्यक्तीची धार्मिकता आणि सामूहिक धार्मिकता यांतही एक सूक्ष्म पण सतत जाणवणारा भेद असतो.
हिंदू हा धर्म नाही ती एक जीवन शैली आहे; असे संघ वारंवार सांगत असतो. हिंदू धर्माला कर्मकांडांचे, स्पृष्यास्पृष्यतेचे लांछन नेहमीच लागलेले आहे. गुंतागुंतीचा , अनेक ताणतणाव व वाद- प्रतिवाद असणारा विषय म्हणाजे धर्म व धार्मिकता. 
हिंदू या सर्व पैलूंवर झक्क प्रकाश टाकत पुढे पुढे जाते.

कादंबरीची सुरुवात होते ती खंडेराव या पाकिस्तानात हडप्पा- मोहेंजोदारो अथवा तत्सम संस्कृतीच्या उत्खनन - अभ्यासासाठी आलेल्या आर्किऑलोजिस्ट च्या स्वगताने. तो मूळचा खान्देशातील मोरगाव या आडगावच्या पाटलाचा मुलगा. शिकलेला, शहरात राहून सुधारलेला व घरच्या मोठ्या गोतावळ्याचा लाडका.
सगळ्यांच्या आशा अपेक्षा याच्या भोवती. अडाणी स्त्रिया, बहिणी व आई- आजी यांच्यात मोठा झालेला खंडेराव. बहिणींना दिली जाणारी दुय्यम वागणूक, माहेरी आलेल्या आत्याची घालमेल, बहिणीकडे कायमच आश्रयाला आलेली याची मावशी व तिची मुलगी, आजी –आईचे झगडे, सासुरवाशिणी, गावकरी, शेती, पाणी- दुष्काळ........
---आयुष्याशीच असे झटके घेत आयुष्य पुढे जात राहतं.
याची त्रिवेणी आत्या लहानपणीच देवाला वाहिलेली. मूल जगत नाही म्हणून नवस बोललेला. ती कुठेतरी अफगाणिस्तानात असल्याचा खंडूला पत्ता लागतो. तिचा शोध घेत घेत तो पाकिस्तानातील अनेक हिंदू मंदिरं व महानुभावी आश्रम पालथे घालतो. ती काही भेटत नाही. जोगीण होण्यापूर्वीचा तिचा सुंदर कोवळा चेहेरा त्याच्या डोळ्यासमोर येत राहतो.
स्त्रिया या भावनिक असतात तशाच खमक्याही. प्रथा, परंपरा पुढे नेण्यात, किंबहुना धर्म जगविण्यात मुख्य सहभाग हा स्त्रियांचाच असतो. हिंदू मधेही आपल्याला अशा अनेक खमक्या, पक्क्या स्त्रिया भेटतात. स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधणार्‍या, कृती करणार्‍या व त्याच्या परिणामांना सामोरं जाणार्‍या!          
कादंबरीला एक साच्याची अशी बांधीव कहाणी नाहीती कधी खंडेरावाच्या मनातील स्वगतं, तर कधी निवेदनात्मक रुपात पुढे जाते. घटनांना काळाची चौकट नाही...आठवणी कशा ओघवत्या येतात...तसा काहीसा आकृतीबंध आहे.
पण कादंबरी वाचतांना प्रत्येक क्षणी आतून आतून जोडल्या गेल्याची जाणीव होत राहते.  अरे! हे तर आपल्या आजूबाजूला घडलेलं...किंवा आपल्याच बाबतीत घडलेलं आहे...असं वाटत राहतं. भारतात राहतांना हिंदू धर्म असा तुमच्या अंगावर चहुबाजूंनी येतच असतो.....तुम्ही त्यातून अलिप्त राहूच शकत नाही. रक्ताच्या थेंबाथेंबात, मनाच्या जडण घडणीत, सवयींमधे, विचारांत, समोरच्या व्यक्तीच्या विचारांत......तो आपल्या सोबत असतोच...अविभाज्यपणे.
नेमाडे एक विशाल असा काळाचा , संस्कृतीचा व भौगोलीक पट आपल्यासमोर उघडतात. ते इस्लामिक, बुद्धिस्ट, जैन, वारकरी, महानुभावी, शहरी, ग्रामीण, पाकिस्तानी, सीख, स्त्रीवादी, पितृसत्ताक, धार्मिक, ज्ञान, शेतीवर आधारीत संस्कृती...अशा विविध अंगांना स्पर्श करीत पुढे जातात. त्यांचा पुरातत्ववाद हा जीवनातील सर्व पैलू जसे जाती, व्यक्ती, जागा व घटना यांचा सुरेख मेळ घालत भारतीय उपखंडातील प्राचीन संस्कृतींचे पापुद्रे उलगडत जातो.            
खंडेराव विट्ठल हा आपल्या दहा हजार वर्षे जुन्या असलेल्या शेतीच्या परंपरेचा पाईक आहे. तो आपल्या आजूबाजूच्या विश्वाला आपल्या ’देशी’ वास्तव- भानाने जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. या सर्व गोष्टी-घटना जाणून घेता घेता त्याच्या डोक्यात जी गुंतागुंत निर्माण होते, तिचा तो त्याच्या परीने अन्वयार्थ काढतो आणि ही ’अडगळच’ त्याला बहुसांस्कृतिक अशा बाह्य जगाशी कनेक्ट व्हायला सहायभूत ठरते.    
तुम्ही धार्मिक असा अथवा नसा...किंवा आस्तिक असा अथवा नास्तिक... मोठी सेलेब्रिटी असा अथवा सामान्य गृहिणी, स्कॉलर विद्यार्थी असा अथवा मंदिरातला सेवेकरी.......हिंदुत्वाची ही घट्ट वीण तुमच्या भोवती पीळ पाडत जातेच.
लेखक कुठेही काय वाईट अथवा चांगले...काय चूक काय बरोबर....असा निकाल देतच नाही...तो फक्त हिंदुत्वाचे अनेकानेक विलोभनीय पैलू आपल्यासमोर मांडत जातो.....रंगीत, कॅलिडोस्कोपिक......आणि बेरंग झालेले, निर्दय, दुःखी..सुद्धा.

तुम्ही काय घ्यायचे, त्यातून काय अन्वय साधायचा व त्याचा आपले आयुष्य अधिक समृद्ध व अर्थपूर्ण होण्यासाठी कसा वापर करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न!

Tuesday, August 25, 2015

ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम



कविता महाजन यांचे ठकी आणि....हे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. मराठीतील प्रवाह बदलेली आणि धाडसी कादंबरी - तीही एका लेखिकेने लिहीलेली असे नुसते तिचे वर्णन करुन तिला न्याय दिल्या सारखे आणि तिची दखल घेतल्या सारखे होणार नाही म्हणून ही सविस्तर समीक्षा.
खरे तर ह्या पुस्तकाचा दोन- तीन अंगांनी विचार करायला हवा. एक म्हणजे, तिचा फॉर्मॅट अथवा आकृती बंध. ही नक्की एक कादंबरी आहे, आत्मचरित्र आहे की निवेदनात्मक काल्पनिका आहे याच भोवर्‍यात वाचकाला खिळवून ठेवण्याचे काम पहिली शंभर-दिडशे पानं करते. दुसरे म्हणजे तिचा गाभा किंवा कथासूत्र आणि तिसरे म्हणजे लेखिकेची खिळवून ठेवणारी कथनाची हातोटी व पकड!
या कादंबरीची (सोयी साठी म्हणूया – कादंबरी!) नायिका- पद्मजा सप्रे- एक गाजलेली चरित्र अभिनेत्री . तिने प्रामुख्याने आईच्या भूमिका केलेल्या आहेत. पण तिचे व्यक्तिमत्त्व तिने केलेल्या भूमिकांच्या विरुद्ध आहे...म्हणजे सोज्वळ- सात्विक असे मुळीच नाही. ती एक धडाडीचे निर्णय घेणारी, मदिरा आणि (मदिराक्ष?) यांत बुडालेली स्वैरिणी आहे. तिच्या व्यक्तित्वाचे, तिच्या आजूबाजूला वावरणार्‍या माणसांचे आणि घटनांचे वर्णन आणि परिचय करुन देण्यातच पहिली दिडेकशे पाने संपतात. त्या भागाच्या शेवटी ती आत्मचरित्र लिहीण्याचा निर्णय घेते..व पुस्तकातच एक स्वतंत्र आत्मचरित्र – ’कळसूत्र’ नावाचे पुस्तक (मुखपृष्ठ- मलपृष्ठा सहित – एंबेडेड!) सुरु होते.    
त्यात पुन्हा तिचे लहानपण, आईचा अबोल, स्वार्थी स्वभाव व बाहेरख्याली वृत्ती व त्यामुळे हिच्यावर (न) घडलेले संस्कार याचे (पुनरुक्त) वर्णन येते. लहानपणची गरीबी, वडिलांच्या मृत्यूनांतर झालेले हाल, आईबद्दल तिला वाटणारा राग व द्वेष, तिचे मित्र - प्रियकर, तिच्या मोलकरणी, अभिनेत्रींमधील स्पर्धा- हेवेदावे, तिची असफल लग्ने, नाटक- सिनेमाचे अधांतरी विश्व, तिने बापाशिवाय मुलीला - अनाहिताला- जन्म देण्याचा घेतलेला निर्णय , दारु व पैसा, तिचे घारे –हिरवे डोळे व असामान्य रुप - त्यामुळे मिळालेले बरे वाईट अनुभव....यांचा धांडोळा घेत आत्मचरित्र संपते....
नंतर तिसरा भाग सुरु होतो- आत्मचरित्रा नंतर.-
हे थोडेसे एपिलॉग सारखे -  म्हणता येईल. त्यात तिच्या घसरत्या कारकीर्दीचा लेखाजोखा मांडलेला आहे. शिकून वकील झालेली अनाहिता- तिचे दिल्लीला जाणे- पद्मजाचे एकाकीपण, कुणी सरदेशमुख नावाच्या उद्योगपतीचा....आधी आत्मचरित्रात न आलेला उल्लेख-  - तिने त्यांचा उल्लेख पुस्तकात केला असेल की काय या भीतीने  – अगदी हार्ट ॲटॅक येईपर्यंत- व्यथित झालेला सरदेशमुख...
लेखिकेला तिचे प्रियकर कमी वाटले की काय नकळे, पण पुन्हा दोन तीन पात्रं आणली आहेत. डॉ. अरविंद - चांगला प्रथितयश, उच्चभ्रू डॉक्टर, घरदार- बायको असणारा..... हिच्या प्रेमात आकंठ - पण जपून जपून वागणारा......... तिला सत्तर लाखाची गुलाबाच्या आकाराची पर्स देणारा श्रीमंत  डॉकटर..आणि स्त्रियांना असं गोडी गुलाबीने, भावनिक आवाहन करुनच वश करावं लागतं अशी त्याची कारणीमिमांसा देणारा...डॉ. अरविंद   ...त्याची बायको ललीता...साधी , घरेलू, सेवाभावी!
तिला मदत करण्यास सदैव तत्पर असणारा दिग्विजय, अर्णव....आणि असे बरेच....
मग तिची झालेली विकलांग अवस्था, अल्झायमर ने स्मृतीभ्रंश झालेली पद्मजा, तिचे शून्य- संदर्भरहित विश्व, डॉ गायत्रीची लाभलेली साथ....ओसरलेले सौंदर्य व दुरावलेले चाहते.....

अशा वाटा वळणांनी कादंबरी अचानक एका अनपेक्षित , धक्कादायक वळणावर येऊन ठाकते.
वाचकाने कल्पनाही केली नसेल असे सत्य – सामोरं येतं. आपला कादंबरीचा वाचनाचा ॲगलच बदलून जातो. आधी बिनधास्त वाटणारी पद्मजा एकदम एकाकी , बिचारी होऊन जाते. पुन्हा पहिल्या पासून पुस्तक वाचून निसटलेले दुवे ह्या नवीन दृष्टिकोनातून तपासावेसे वाटतात. किंबहुना पुन्हा पुस्तक वाचून एका नव्या दृष्टीने तिच्या आयुष्यातील घटनांची आपण संगति लावतो...हे ह्या कादंबरीचे फार मोठे यश आहे असे मला वाटते.    
ते सांगून रसभंग करण्याचा मानस नाही.
या सगळ्या चढ उतारांत, नायिकेला कुठेही उदात्तता देण्याचा आणि ’करेक्ट’ ठरविण्याचा अट्टाहास दिसत नाही हे मात्र निश्चित उल्लेखनीय आहे. पण या प्रकारच्या कल्पनिका-कादंबरीला आवश्यक असणारी सलग, प्रवाही भाषाशैली, शारीर गोष्टींची धाडसी  मांडणी व सहज उल्लेख, एका नटीच्या जीवन चरित्रात अपरिहार्य असणारी अनैतिकता- तिचे केलेले संयत पण परिणाम साधेल व वातावरणनिर्मीती होईल असे वर्णन -  हे या पुस्तकाचे प्लस पॉईंट्स.
तसेच ह्या विषयाचा आवाका पेलणारी लेखिकेची पुस्तकावरील एक अदृश्य मजबूत पकड मात्र जागोजागी जाणवत राहते; जी विषयाला आणि कथावस्तूला इकडेतिकडे फटकू देत नाही. यामुळे कादंबरी मोठी असूनही तिच्यात एकजिनसी बांधीवपणा आलेला आहे.
एक वेगळा प्रयत्न आणि पारंपारीक कल्पनांना छेद देत एका लेखिकेने धीटपणे मांडलेला एका अभिनेत्रीच्या आयुष्याचा प्रवास व तिच्या समांतर जीवनकथेची न लागणारी संगती अनुभवण्या साठी  म्हणून हे पुस्तक वाचायला हवे.

Tuesday, April 29, 2008

शाळा - मिलींद बोकील

नुकतंच मिलिंद बोकील यांचं 'शाळा' पुस्तक वाचलं...काय सुरेख वर्णन आहे! त्यांच्या भाषेत सांगायचं तर...सरस!

नववीतील काही मुलं,जी एका जणाच्या शाळेच्या वाटेवर असलेल्या बांधकाम सुरू असलेल्या अर्धवट इमारतीत जमून येणार्‍या जाणार्‍यांची छेड काढत असतात, त्यांचे संवाद, भाषा, भिती....
शिरोडकर ला भेटायसाठी त्याने टाकलेली पावलं...तिचं बारकाईने केलेलं वर्णन...
घरची कडक शिस्त, आणि 'सु‍र्‍या' चे भानगडबाज, बेफ़िकीर विश्व यात चाललेली त्याची ओढाताण..त्यातून 'शिरोड्कर' विषयी वाटणारे प्रेम-आकर्षण....खूप तरलतेने, प्रवाहीपणे, मार्दवाने लिहीले आहे.


१२ ते १५ या पौगंडावस्थेतिल मुलांचे विश्व, त्यांचे भावनिक चढ उतार, त्यांची भाषा, समजूती...अतिशय सुरेख रितीने चित्रीत केले आहे.

"मी थोड्यावेळ तसाच सुममध्ये बसून राहीलो....सुममध्ये बसलं की मुलींना कुणी पाहतंय हे कळत नाही...".....अशी भारी वाक्यं...

खरंच शाळेत गेलेल्या प्रत्येकाने वाचायला हवे असे पुस्तक आहे. म्हणजे बरंच नॉस्टॅलजिक व्हायला होतं! खूप साधर्म्य स्थळे आढळतात.
विशेषतः कॅंप चे वर्णन तर अगदी सरस उतरले आहे. आणि भाषेचा फ़्लो तर किती उत्तम! कुठे म्हणून अडखळायला होत नाही.


आता मिलींद बोकील यांना 'शिरोडकर' च्या बाजूने पुस्तक लिहा अशी विनंती करायला हवी.

Wednesday, April 09, 2008

जी ए - प्रतिभेचे दुसरे नाव

आत्ता जी एं चं "हिरवे रावे" पुन्हा एकदा वाचलं. किती अप्रतिम शब्दकळा, किती पॉवर आहे त्यांच्या लेखनात हे पुन्हा एकदा पटलं...स्वतःलाच!

छोटीशीच वाक्यं...पण सारा संदर्भ सामावलेला...अतिशय अर्थगर्भ, पूर्ण!

मला सगळ्यात आवडते ती कथा म्हणजे "बाधा"...मन सुन्न करणारा अनुभव...विषण्णता अशी दाटत जाते मनभर...

फक्त जाणीवेच्या अलवार पातळीवर असणारी प्रेमाची एक अबोध, हुरहुरती भावना मनाशी जपणारी त्यातली रमा, तिचे भाबडे विश्व, मनातून कधी ओठांवरही न आलेल्या तिच्या इच्छा, मनाची अनाकलनीय आंदोलनं आणि त्यातून तिचा डोहाच्या खोल पात्रात निसटत गेलेला प्रवास..
सगळेच विलक्षण सामर्थ्याने, सुंदरतेने पाकळी पाकळी विस्तारावी तसे फुलवत नेणारे जी एंचे लेखन...अहा!

साहित्यातले नोबेल मिळावे अशा त्यांच्या कथा आहेत... इतकी सजग, तरल अनुभूती असणारा आणि वाचकांनाही स्वतः बरोबर ती देणारा लेखक ..विरळा आणि म्हणूनच श्रेष्ठही.

त्यांच्या प्रतिभेला त्रिवार कुर्निसात!