Tuesday, April 01, 2014

नित्यक्रम - ३


सध्या मीना प्रभुंचं ’चिनी माती’ वाचते आहे. अफाटच सुंदर पुस्तक आहे. तसंही चीन बद्दल मला पहिलेपासूनच विलक्षण आकर्षण,ओढ आणि कुतूहल आहे. आणि मीनाताईंनी अगदी बारिक सारीक वर्णनांनी चीन आपल्या डोळ्यांपुढे साकारला आहे. चीन...भरताला जरबेत ठेवणारा आपल्यासारखाच आपला प्राचीन शेजारी...काही बाबतीत आपल्या सारखाच...लोकसंख्या, भूगोल आणि संस्कृतीच्या विपुल छायेत. पण बर्यााच बाबतीत आपल्या पेक्षा भिन्न....स्वयंशिस्त, देशप्रेम, काटेकोरपणा, स्वच्छता....किती दाखले द्यावेत! इतक्या मोठ्या भौगोलीक विस्ताराला आव्हान न मानता संधी मानून विकास करणारा, कठोर कम्युनिस्ट तत्वांची कास धरुन प्रगती करणारा एक फोकस्ड देश! मला एकदा जायचंच आहे चायना ला. कनक रजत ची नुसती धम्माल चालली आहे. मनसोक्त टीव्ही, नेट आणि गेम्स....आईसक्रीम्स (एकाला बटरस्कॉच व एकाला चॉकलेट.....आपापली वगळून दुसर्‍या कुठल्याही फ्लेवर ला हात लावणार नाहीत...अगदी व्रतस्थ असल्यासारखी ! द्वाड कार्टी! एकाला चायनीज प्रिय आणि एकाला पिझा, बर्गर. एकाला बटाट्याची रस्सा भाजी तर एकाला काचर्‍या. एकाला साबुदाणा खिचडी आणि एकाला थालिपीठ.....घर म्हणजे काय हॉटेल आहे का? ऑर्डर द्यायला? आणि मी कोण? वेटर? मला वाटतं मी कोण हा आदी प्रश्न अगदी सहजतेने सुटला आहे माझ्या बाबतीत!

No comments: