"मराठी साहित्य संमेलन सन फ़्रान्सिस्कोमध्ये"
ही बातमी आनंददायी आहेच. मायमराठी साता समुद्रापार, देशांच्या सीमा ओलांडून नवे ध्वज रोवायला जाते आहे, याहून अभिमानाची गोष्ट काय असू शकते?
आणि आता तर ब्लॉग्जच्या, ई दळणवळणाच्या माध्यमातून जग एव्हढे जवळ आले आहे की इथे राहूनही आपल्याला संमेलनात सहभागी होता येईल. किंबहुना दर वेळेचे साचेबद्ध स्वरुप बदलून नवीन आयाम काय देता येतील याचा विचार व्हावयास हवा.
मराठी सोडून बाकी कुठल्या भाषेचे संमेलन इतक्या दूरदेशी साजरे झालेले आपण ऐकले आहे का? मग हा आपला सन्माननीय अपवाद नाही का?
माराठी सारस्वतावर प्रेम करणार्या आपणा सर्वांनाच मराठीला एक नवीन पैलू देण्याची ही एक सुवर्ण संधी मानावयास हवी. भाषेची समृद्धी ही तिच्या सुपुत्रांच्या कर्तबगारीवर देखिल ठरत असते.
म्हणून वेबिनार, ई कॉन्फरंसिंग, ब्लॉगर्स झोन, वेबकास्ट, नेट्वर्किंग अशा विविध माध्यमांतून हे संमेलन आगळेवेगळे ठरेल असे प्रयत्न करावयास हवे.
एखादे संमेलन परदेशी गेले तर बिघडले कोठे?
“उत्तर धृवावर संमेलन घ्या” म्हणणे केवळ हास्यास्पद आहे. दूर राहील्याने मराठी बद्दलचे प्रेम काकणभर अधिकच असेल असा विश्वास बाळगावयास हवा.
मराठी संमेलन फक्त महाराष्ट्रातच व्हायला हवे असा काही कायदा नाही!
कृपया आपली मते नोंदवा. मुख्यतः ते अधिक लोकाभिमुख आणि हाय टेक कसं हॊईल यावर आपली मते स्वागतार्ह आहेत!
(म्हणजे कुणी ते विचारात घेतील अथवा नाही हा वेगळा प्रश्न आहे!)....पण आपण विचार करायला काय हरकत आहे?
नक्की काय हवं असतं आपल्याला आयुष्याकडून? विसावा की कार्यमग्नता? मुक्त संवाद की अंतरंगात खोलखोल उतरणं..? आनंदाची नक्की संकल्पना तरी काय असते? प्रत्येक सुखाला हुरहुरीची किनार का असते?
Friday, June 27, 2008
Tuesday, April 29, 2008
शाळा - मिलींद बोकील
नुकतंच मिलिंद बोकील यांचं 'शाळा' पुस्तक वाचलं...काय सुरेख वर्णन आहे! त्यांच्या भाषेत सांगायचं तर...सरस!
नववीतील काही मुलं,जी एका जणाच्या शाळेच्या वाटेवर असलेल्या बांधकाम सुरू असलेल्या अर्धवट इमारतीत जमून येणार्या जाणार्यांची छेड काढत असतात, त्यांचे संवाद, भाषा, भिती....
शिरोडकर ला भेटायसाठी त्याने टाकलेली पावलं...तिचं बारकाईने केलेलं वर्णन...
घरची कडक शिस्त, आणि 'सुर्या' चे भानगडबाज, बेफ़िकीर विश्व यात चाललेली त्याची ओढाताण..त्यातून 'शिरोड्कर' विषयी वाटणारे प्रेम-आकर्षण....खूप तरलतेने, प्रवाहीपणे, मार्दवाने लिहीले आहे.
१२ ते १५ या पौगंडावस्थेतिल मुलांचे विश्व, त्यांचे भावनिक चढ उतार, त्यांची भाषा, समजूती...अतिशय सुरेख रितीने चित्रीत केले आहे.
"मी थोड्यावेळ तसाच सुममध्ये बसून राहीलो....सुममध्ये बसलं की मुलींना कुणी पाहतंय हे कळत नाही...".....अशी भारी वाक्यं...
खरंच शाळेत गेलेल्या प्रत्येकाने वाचायला हवे असे पुस्तक आहे. म्हणजे बरंच नॉस्टॅलजिक व्हायला होतं! खूप साधर्म्य स्थळे आढळतात.
विशेषतः कॅंप चे वर्णन तर अगदी सरस उतरले आहे. आणि भाषेचा फ़्लो तर किती उत्तम! कुठे म्हणून अडखळायला होत नाही.
आता मिलींद बोकील यांना 'शिरोडकर' च्या बाजूने पुस्तक लिहा अशी विनंती करायला हवी.

Friday, April 18, 2008
लेखना मागची प्रेरणा
आपण का लिहीतो......
मेघनाने हा प्रश्न विचारला तिच्या खो खो च्या खेळात, तेव्हा पासून विचार करतेय... का लिहावसं वाटतं आपल्याला?
ही ऊर्मी तशी फार आधीपासूनचीच...कॉलेज च्या वार्षिकांकातले लेखन, त्याही आधी निबंध स्पर्धांमध्ये मिळवलेली बक्षिसं, गझलांची विश्लेषणं आणि मैत्रिणींना भरभरून लिहीलेली पत्रं...पावसाच्या धारांबरोबर लिहीलेल्या अनेक कविता..पण मग हातातून धागा सुटत जावा तशी हीही सुटत गेली कधीतरी...परवा परवा ब्लॉग सापडेपर्यंत...
काय असते ती ऊर्मी? मनातल्या भावना, विचार अधिकाधिक समर्पकतेने व्यक्त करता यावेत ही असोशी? की भाषेच्या लालीत्यपूर्ण अलंकारांचा साज चढविण्याचा निव्वळ अट्टाहास? की आपल्याला जे वाटते ते इतरांपर्यंत पोहोचविण्याचा खटाटोप?
काही असो...लेखन आनंद देते मात्र. निखळ. काही सुचत नसते तेव्हा थोडी हूरहूरही! कुणाचे उद्देश निरनिराळे असू शकतात, पण मला तर ते फक्त माझ्या स्वतः च्या आनंदासाठी मीच लावलले एक झाड आहे असे वाटते. आणि लेखन म्हणजे तरी काय...वाचनाचे पडलेले प्रतिबिंबच ना? खूपदा तर मला सुंदर काही वाचायला मिळालं की त्याची दाद देण्यासाठी लिहावसं वाटतं! लोक इतकं देखणं लोभावणारं कसं काय लिहू शकतात?
इतकी समृद्ध आपली मराठी, तिचे इतके झळाळते पैलू आणि तिला लाभलेले अनेक गुणवंत लेखक व कवी..किती आनंद आहे आयुष्यात!
मनातून लडी उलगडत जातात.. एकावर एक.., शब्दांचा साज लेवून कविता पुढ्यात ठाकते... निर्मीतीचा आनंद तरी याहून वेगळा काय असतो?
कुणासाठी म्हणून नसतेच ती अनिवार ऊर्मी ... ते फक्त जीवनाच्या एखाद्या भावलेल्या रंगाचे व्यक्त रुप असते...रंग कोणताही असो...दुःखाचा, आनंदाचा, उल्हासाचा...लिहून झाल्यावर मिळणार्या तृप्तीतच तिचे सार्थक असते.

Wednesday, April 09, 2008
जी ए - प्रतिभेचे दुसरे नाव
आत्ता जी एं चं "हिरवे रावे" पुन्हा एकदा वाचलं. किती अप्रतिम शब्दकळा, किती पॉवर आहे त्यांच्या लेखनात हे पुन्हा एकदा पटलं...स्वतःलाच!
छोटीशीच वाक्यं...पण सारा संदर्भ सामावलेला...अतिशय अर्थगर्भ, पूर्ण!
मला सगळ्यात आवडते ती कथा म्हणजे "बाधा"...मन सुन्न करणारा अनुभव...विषण्णता अशी दाटत जाते मनभर...
फक्त जाणीवेच्या अलवार पातळीवर असणारी प्रेमाची एक अबोध, हुरहुरती भावना मनाशी जपणारी त्यातली रमा, तिचे भाबडे विश्व, मनातून कधी ओठांवरही न आलेल्या तिच्या इच्छा, मनाची अनाकलनीय आंदोलनं आणि त्यातून तिचा डोहाच्या खोल पात्रात निसटत गेलेला प्रवास..
सगळेच विलक्षण सामर्थ्याने, सुंदरतेने पाकळी पाकळी विस्तारावी तसे फुलवत नेणारे जी एंचे लेखन...अहा!
साहित्यातले नोबेल मिळावे अशा त्यांच्या कथा आहेत... इतकी सजग, तरल अनुभूती असणारा आणि वाचकांनाही स्वतः बरोबर ती देणारा लेखक ..विरळा आणि म्हणूनच श्रेष्ठही.
त्यांच्या प्रतिभेला त्रिवार कुर्निसात!

Tuesday, January 29, 2008
चला दोस्त हो, आयुष्यावर बोलू काही.......
नक्की काय हवं असतं आपल्याला आयुष्याकडून? सुख,प्रेम,रेकग्निशन,श्रेय,मटेरिअल गोष्टी......?
पूर्वीचे ते निवांत, सुंदर रिकामे क्षण चांगले की आताचे धावपळीचे पण अनिश्चित आयुष्य चांगले....
"बैठे रहे तसव्वुर ए जाना किए हुए", म्हणत असं प्रेमावर विसंबत, रेंगाळत ,त्या अनुषंगाने येणार्या अपरिहार्य कमतरतेला स्वीकारत जगलेलं बेधुंद आयुष्य खरं की,
"गोल" च्या मागे लागून धावाधाव करीत, उसंत न घेता अविश्रांत श्रमून मोलानं मिळवलेले विसाव्याचे क्षण अधिक आनंददायी.....
आपणच आपलं ठरवायला हवं.....लॉंग टर्म उद्दिष्ट ..........
स्वच्छ सूर्यप्रकाशात, निखळ चांदण्यात, समुद्राच्या गाजेत, वार्याच्या पाव्यात.........जीवन असं वेचून घेता यायला हवं.

Tuesday, January 22, 2008
अंतीम युद्ध - अंतीम भाग
१४ एप्रिल ५१२७
सेव्ह अर्थ मिशन ची दुसरी आणि अंतीम फेज चालू झाली होती. प्रयोगाच्या सुरुवातीला पृथ्वीवर जागी आणि जिवंत असलेली सगळी माणसं आता मृत्यू पावली होती.
सगळ्या अवनीवर एक भीषण शांतता नांदत होती.
फक्त अधून मधून होणारा स्फोटांचा भयंकर कानठळ्या बसविणारा आवाज, उठणारा धुरळा, ऑटोमॅटीक रोबोट्स आणि मशीन्स च्या हालचाली, प्री प्रोग्रॅम्ड प्रोसेसेसची अंमलबजावणी...यांचेच काय ते साम्राज्य होते.
बरीच कार्बन डाय ऑक्साईड ची सिंक्स जमिनीलगत साठली होती. शक्तिशाली माईन बॉम्ब्ज द्वारे त्यांना खोल जमिनीखाली खेचून अधिकाधिक ऑक्सिजन रिलीज करण्याची योजना कार्यान्वित होत होती.
भूगर्भात CO2 ओढून घेऊन O2 चे प्रमाण वाढविण्यात येत होते.
प्राणवायू! चराचराला आपल्या अंकित करणारा एक प्रभावी, दीप्त , ओजस स्त्रोत! ..सार्या सृष्टीचा आदी,मध्य आणि अंत !.. जीवनाचा मूलाधार.
आज प्रथमच सूर्याची किरणं धुक्याचं कवच भेदून जमिनीपर्यंत पोहोचली होती. गेली अनेक दशकं धुरकट,खिन्न काळोखात असलेल्या पृथ्वीला त्या सोनसळी किरणांची फार फार अपूर्वाई होती.
नव्या प्रकाशमय युगाची जणू ती एक झलक होती.
.................
.................
हवा हलकेच स्वच्छ, नितळ होत होती. वातावरणात किंचीत उबदार ताजेपणा होता. हिमालयातल्य़ा कुशीत असलेल्या त्या निर्जन, कधीकाळी एका वाहत्या नदीचे खोरे असलेल्या प्रदेशात एक अंकुर उगवला होता. जीवनाची पहिली लसलसती निशाणी.नव्या आशेचा पहिला उन्मेष.
दोन हिरवीगार, नाजूक पानं हवेवर डोलून आपल्या अस्तित्वाची सुखद साक्ष देत होती.
दवबिंदूंचं सुद्धा ओझं व्हावं इतकी ती डहाळी अलवार होती. पण ती उगवली होती....जगली होती.........वाढत होती...हे फार अप्रूप होतं! निदांच्या द्रष्ट्या सिद्धातांना आलेले ते एक दृष्य यश होते.
६-सप्टें-५२७०
खूप गाढ, गहिर्या निद्रेतून हळूहळू जागं झाल्याप्रमाणे निलोने डोळे उघडले.
तिला स्थळकाळाचं काही भानच नव्हतं.
सगळ्या संवेदना जणू गोठून गेल्या होत्या. ...........
मन बधिर होतं. ............
सुमारे आठवडा भराच्या कालावधी नंतर ती बरीचशी ठीक झाली. तिच्या हिल्चीप च्या कमांड्स कार्यान्वित झाल्या. आणि तिला आपल्या अस्तित्वाची, इतिहासाची रोमांचीत करणारी जाणीव झाली.
..............
बाजूच्या कूपेत निद्रिस्त असलेल्या केवलकडे तिने मान उंचावून दृष्टिक्षेप टाकला. तिच्या तपकिरी डोळ्यांत स्मिताची एक लकेर उमटली. तिने हलकेच केवल ला "वेक अप" कॉल दिला.
धरतीला पुन्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी नव्या समर्थ पिढीच्या हातात सूत्रे देणे तिचे विहीत कार्य होते, तिने आवश्यक त्या सूचना आत्मविश्वासाने फ़ीड इन करायला सुरुवात केली.
ती नव्या युगाची प्रसन्न पहाट होती.
टीप: वाचकहो, तुमच्या पेशन्स बद्दल आभार. यातल्या सगळ्या तांत्रिक, साहित्यिक आणि इतर त्रुटींबद्दल मी आधीच क्षमा मागते.
ब्लॉग कसंकाय , आभार!

Monday, January 21, 2008
अंतीम युद्ध
आजवर अनेकदा तिने निदांच्या प्रयोगावर विचार केला होता.त्याचे सगळे महत्वाचे टप्पे अभ्यासले होते.
बाहेरच्या इझी चेअर वर बसून तिने तिचा अपडेटर कानाला लावला.
(अपडेटर : जगातल्या लेटेस्ट घडामोडींची बित्तंबातमी सांगणारा प्रोग्रॅमेबल फोन)
वनस्पती ज्या तंत्राद्वारे कार्बन डाय ऑक्साईड आत घेतात तेच तंत्र वापरुन निदांच्या शास्त्रज्ञ सहकार्यांनी काही CO2 सिंक्स निर्माण केली होती.
त्याच रिऍक्शन द्वारे ऑक्सिजन उत्सर्जित होणे अपेक्षित होते.
हेच मास स्केल वर करण्यासाठी बॉम्ब्स टाकून साखळी प्रक्रियेद्वारे अधिकाधिक ऑक्सिजन कसा उत्सर्जित होईल ते पाहिले गेले होते.
अशा तर्हेने काही CO2 सिंक्स हळूहळू तयार होत होती.
अचानक तिचा अपडेटर थरथरु लागला. विशिष्ट बातमी असल्यास व्हायब्रेटर मोड वर जाण्यास त्याला प्रोग्राम करण्यात आले होते.
विरीताने उत्सुकतेने त्याच्या चिमुकल्या स्क्रीन कडे बघितलं.
"ट्रेस ऑक्सिजन फाऊंड निअर एकंकागुआ पिक ऑफ ऍंन्डीज...पॉसिबिलिटी ऑफ़ मोअर सच पॉईन्ट्स प्रेडिक्टेड!"
विरीताने अधिर मनाने ती न्यूज पुनःपुन्हा वाचली.
तिचे हात भावनातिरेकाने गार पडले. हॄदय धडधडू लागले. केवलच्या आठवणीने भरून आलेले डोळे तिने निग्रहाने पुसले.

Subscribe to:
Posts (Atom)