Friday, April 18, 2008

लेखना मागची प्रेरणा

आपण का लिहीतो......
मेघनाने हा प्रश्न विचारला तिच्या खो खो च्या खेळात, तेव्हा पासून विचार करतेय... का लिहावसं वाटतं आपल्याला?
ही ऊर्मी तशी फार आधीपासूनचीच...कॉलेज च्या वार्षिकांकातले लेखन, त्याही आधी निबंध स्पर्धांमध्ये मिळवलेली बक्षिसं, गझलांची विश्लेषणं आणि मैत्रिणींना भरभरून लिहीलेली पत्रं...पावसाच्या धारांबरोबर लिहीलेल्या अनेक कविता..पण मग हातातून धागा सुटत जावा तशी हीही सुटत गेली कधीतरी...परवा परवा ब्लॉग सापडेपर्यंत...

काय असते ती ऊर्मी? मनातल्या भावना, विचार अधिकाधिक समर्पकतेने व्यक्त करता यावेत ही असोशी? की भाषेच्या लालीत्यपूर्ण अलंकारांचा साज चढविण्याचा निव्वळ अट्टाहास? की आपल्याला जे वाटते ते इतरांपर्यंत पोहोचविण्याचा खटाटोप?

काही असो...लेखन आनंद देते मात्र. निखळ. काही सुचत नसते तेव्हा थोडी हूरहूरही! कुणाचे उद्देश निरनिराळे असू शकतात, पण मला तर ते फक्त माझ्या स्वतः च्या आनंदासाठी मीच लावलले एक झाड आहे असे वाटते. आणि लेखन म्हणजे तरी काय...वाचनाचे पडलेले प्रतिबिंबच ना? खूपदा तर मला सुंदर काही वाचायला मिळालं की त्याची दाद देण्यासाठी लिहावसं वाटतं! लोक इतकं देखणं लोभावणारं कसं काय लिहू शकतात?

इतकी समृद्ध आपली मराठी, तिचे इतके झळाळते पैलू आणि तिला लाभलेले अनेक गुणवंत लेखक व कवी..किती आनंद आहे आयुष्यात!

मनातून लडी उलगडत जातात.. एकावर एक.., शब्दांचा साज लेवून कविता पुढ्यात ठाकते... निर्मीतीचा आनंद तरी याहून वेगळा काय असतो?

कुणासाठी म्हणून नसतेच ती अनिवार ऊर्मी ... ते फक्त जीवनाच्या एखाद्या भावलेल्या रंगाचे व्यक्त रुप असते...रंग कोणताही असो...दुःखाचा, आनंदाचा, उल्हासाचा...लिहून झाल्यावर मिळणार्‍या तृप्तीतच तिचे सार्थक असते.

No comments: