Tuesday, August 28, 2007

अंतीम युद्ध- भाग ५

निती डोम मध्ये प्रत्येक सीट इंटेलिवर्क ला कनेक्टेड होती. फक्त गुप्तता राखण्यासाठी आऊट गोइंग मेसेजेस बंद होते. तसेच ट्रॅकिंग करणारे सर्व सिग्नल्स प्रोहिबिट करण्यात आले होते.

केवल आणि निलो आपापल्या असाईन्ड सीट्स वर बसले. समोरच्या भव्य पांढर्‍या पडद्यावर 'वेलकम टू लाईफ' अशी अक्षरे झळकली.

थोड्याच वेळात तिथे निदांचा प्रसन्न,देखणा चेहेरा दिसू लागला. त्यांनी आपले प्रास्ताविक सुरू केले.
"मित्रांनो, तुम्हा सर्वांना इथे उपस्थित असलेले पाहून मला फार आनंद होत आहे.
आपल्या आश्रय दायिनी पृथ्वीचे, क्षमाशील अशा वसुंधरेचे वर्धन आणि रक्षण करण्याचा वसा आपल्याला उचलायचा आहे. हे आव्हान आहे - आपल्या अस्तित्वालाच असलेले आव्हान!
हे कसे पेलायचे याची उत्तरं समाजाच्या, विचारवंतांच्या पोतडीतून नाहीत तर जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनशैली तून आपल्याला शोधावी लागतिल. हे काम आपल्या नेट्वर्क चे आहे. माणसं हवीत... अशी माणसं हवीत ज्यांना काहीतरी भव्यदिव्य करायची प्रेरणा आहे, काहीतरी चांगले करायचे आहे, काही चांगले बनायचे आहे...माझा पूर्ण विश्वास आहे, अशी माणसं आहेत, सर्वत्र आहेत.
बदल हे असेच होत असतात. तुम्हाला फरक जाणवणार नाही. हा काही कुणी कुणावर मिळवावयाचा विजय नाही. हा नैतीकतेचा पूर्व लिखीत विजय असणार आहे.
माणसां माणसांची साखळी तयार करा. विश्वासाची, सहकार्याची....
कार्बन सायकल रिव्हर्सल - कठीण असली तरी अशक्य नाही. प्रयत्नांचं हे बीज मनामनांतून झिरपत जाईल.
नकळत तिचा प्रसार होत राहील. बुद्धिमान लोकांची आदर्श जीवनशैली म्हणून ती नैसर्गिक रित्याच अंगीकारली जाईल. हेच माझे स्वप्न आहे.........तुम्हा सर्वांचे सल्ले, विचार यांचं स्वागत आहे."
निदांचं मोजक्या शब्दांतलं प्रभावी भाषण ऐकून सर्वजण च काही काळ विचारात हरवून गेले.

"मला थोडं बोलायची इच्छा आहे." एक धीरगंभीर, खर्जातील आवाज घुमला. अध्यात्मिक क्षेत्रातील एक अधिकारी पुरुष,सर्व धर्मांचा ज्यांचा सखोल अभ्यास आहे आणि सात्विकतेच्या व अध्यात्मा च्या बाबतीत ज्यांचा शब्द प्रमाण मानता येईल, असे श्री पद्मनाभ बोलत होते. व्यासंगाचे, विद्वत्तेचे तेज त्यांच्या चेहेर्‍यावर झळकत होते.
"मित्रहो, माझं क्षेत्र हे तुम्हा सर्वांपेक्षा निराळं असलं तरी मानव जातीचे आणि पर्यायाने आपल्या धरतीचे रक्षण करण्याची जबाबदारी माझीही आहे असे मी मानतो.
हिंदू धर्मात, फार पूर्वीपासून 'धर्म' या संकल्पनेचा फार साकल्याने विचार झाला आहे. त्याचे पुढे अनेक अन्वयार्थ निघाले आणि ती कल्पनाच मुळी वादग्रस्त ठरली हा भाग वेगळा.
पण शास्त्रे समतोल पणाने अभ्यासली तर आदर्श जगण्याची पद्धती आपल्या पूर्वजांनी नेटकेपणाने अंगीकारली होती हे दिसून येते. आपल्या गरजा कमीत कमी ठेवणे, निसर्गातल्या सर्व गोष्टींची म्हणजे झाडे, फुले, पाणी, वारा यांची देवता म्हणून पूजा करणे यावरुन काय दिसतं?
कर्माची अपेक्षा न करता म्हणजेच निरपेक्ष पणे काम करीत राहिलं तर आपोआपच आपण एक समतोल, विचारी व्यक्ती बनण्यास प्रवृत्त होऊ. वृत्ती मधला असमतोल, लोभीपणा, स्वार्थ हेच र्‍हासाला कारणिभूत ठरतात. तेव्हा स्वतःचे व्यक्तिमत्वच अधिक स्वच्छ, परीपूर्ण आणि व्यापक बनविणे हाच मला यावर अंतीम मार्ग दिसतो.
यासाठी सर्वांनी धर्माचे आचरण करावयास हवे. अधिक डोळस पणे, आजच्या काळाला लागू होतील अशा धर्माच्या संकल्पना बदलून हा मार्ग स्वीकारायला हवा असे माझे आग्रही प्रतिपादन आहे."
पद्मनाभ यांनी आपले वक्तव्य संपविले तरी त्याचे पडसाद दीर्घ काळपर्यंत सभागृहातील प्रत्येकाच्या मनामनांतून ध्वनीत होत होते.

5 comments:

पूनम छत्रे said...

chan lihit ahes ashwini. poorN karashil ashi apexa ahe.

HAREKRISHNAJI said...

Sci fiction is running on fast track

Abhishek.Mahadik said...

written quite well.appreciative.lihit zha asas kahitari.

मन कस्तुरी रे.. said...

Thank you, Abhishek, Poonam and Harekrishnaji for your comments.

Will post the new part soon. I am bit occupied with some other work right now.

TheKing said...

Good one! Hope to read more such quality stuff from you.