सिक्युरिटी चे सगळे सोपस्कार पार पाडून ते एका मोठ्या अनेक लॉबीज असलेल्या इमारतीत शिरले.
निदा स्वतः एका कम्युन मध्येच रहात होते. एका उंच टेबलमागे ते बसले होते. समोर त्यांचा अद्ययावत इन्फ़्रोट्रिस होता. त्यावरच्या 'सरफेस स्क्रीन' वर अनेक बटने लखलखत होती. इंटेलिवर्क द्वारे लॉगिन करून त्यांनी निलो व केवलला ट्रस्ट इश्यु केल्यावरच समोरचा सुडो पडदा उघडला आणि आत असलेल्या खर्या निदांचे त्यांना दर्शन झाले. (तो पर्यंत त्यांची खरी वाटणारी इमेज च केवल ला दिसू शकत होती). त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून केवल आणि निलो दिपल्यासारखे झाले.
"सर, मी निलोफ़र! आपल्या संघटनेची सदस्या आहे. आणि आज या माझ्या मित्राला, केवलला पण सदस्य होण्याची इच्छा आहे. प्लीज...." भारून गेल्याने निलो ला पुढे काही बोलताच आले नाही.
"हे बघ, आपल्याला केवळ संख्यात्मक नाही तर गुणात्मक काम करायचे आहे. आपल्या उद्दिष्टांनी प्रेरित होऊन, भारून गेलेल्या तरुणांची तर आपल्याला गरज आहेच, पण ते पूर्ण डेडिकेटेड आणि विश्वासू हवेत. याला तू आपली संघटना, तिची उद्दिष्टं याविषयी पूर्ण कल्पना दिली आहेस का?"
निदांचा आवाज प्रेमळ तरीही खंबीर होता. "काय करतो हा?" त्यांनी विचारले.
"मी केवल लेकशॉ, नुकतच मी माझं बेसिक ग्रॅज्युअएशन पूर्ण केलं आहे, आणि आता संरक्षण विभागात रिसर्च विंग मध्ये रुजू झालो आहे" केवल ने सांगीतले.
"लेकशॉ...म्हणजे जेनेसेसिस्ट डॉ.विधिस्तव लेकशॉंचे...?" "हो हो, मी त्यांचा नातू."..केवल स्पष्टीकरण देत म्हणाला.
निदां चा चेहेरा एकदम गंभीर झाला. त्यांच्या अथांग निळ्या डोळ्यात विषादाची एक छटा चमकून गेली. "निलो, माझी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आधीच आपल्या संघटनेला अनुयायी कमी, त्यात तू असे घरभेदी लोक आणू लागलीस तर कसे व्हायचे? मानवजातीचे कल्याण हे एकच उद्दिष्ट - मग त्यासाठी पूर्ण विश्वाची उलथापालथ का होईना - असे मानणार्या आपल्या संरक्षण विभागातला उगवता शास्त्रज्ञ हा आपला सभासद होऊ शकेल असे तुला वाटलेच कसे?"
ते एकदम व्यथित होऊन उदगारले. "मला माहिती आहे सर, पण केवल ची मते वेगळी आहेत. त्याला शांतता पूर्ण मार्गाने, सगळ्यांना बरोबर घेवून, संशोधन करायचे आहे...नॅनो स्पिटीकल वर मानव वंश प्रस्थापित करायला तर त्याचा पूर्ण विरोधच आहे. त्या ऐवजी इथेच राहून ही धरित्रीच पुन्हा सुजलाम सुफ़लाम कशी करता येइल, यात त्याला जास्त रस आहे.
म्हणूनच त्याला आपले सदस्यत्व हवे आहे." निलो ने आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला.
"हो, केवल? हे खरे आहे?" निदांनी केवल ला विचारले. त्यांचा स्वर साशंक होता.
"खरं सांगायचं तर, सर,मी द्विधा मनःस्थितीत आहे. माझे कुटुंबिय, स्वजन यांचा विचार केला तर 'लवकरच अस्तंगत होत असलेली प्रजाती'हा मानवजाती वरचा शिक्का कसंही करून दूर करावा असं वाटतं, पण संपूर्ण विश्वाचा, त्यातल्या वर्षानुवर्षे अव्याहत पणे चाललेल्या क्रिया प्रक्रियांचा विचार करता, हे बदलायचा आपल्याला काहीच अधिकार नाही असेही वाटते.
यातून काहीतरी सुवर्णमध्य शोधायला हवा. मानवाच्या बुद्धिमत्तेवर माझा पूर्ण विश्वास आहे फक्त त्याच्या 'ओरबाडून घेण्यार्या आक्रमकते' वर इलाज शोधायला हवेत. आजवरचा इतिहास पहाता, आपल्याला आपल्या चुका सापडणं काही अवघड नाही.
मला वाटतं त्यातूनच आपण काहीतरी मार्ग काढू शकू. संघटनेचा सदस्य होण्यामागे माझा असा जरा वेगळा आणि व्यापक दृष्टिकोन आहे, सर. विरोधासाठी विरोध नाही, तर काहीतरी रचनात्मक आणि उपाय सूचक विरोध महत्त्वाचा आहे."
केवल च्या स्वरात आत्मविश्वास आणि मार्दवाचं अनोखं मिश्रण होतं.
"वेल, यंग मॅन..आय ऍप्रिशिएट युअर व्ह्यू, पण तुझ्या निष्ठा मात्र दुहेरी ठेऊ नकोस. तुला काहीतरी एक स्वीकारावं लागेल." निदा म्हणाले. "फ़ॉर टाईम बिइंग, मी तुला मर्यादित सदस्यत्व देण्याची शिफ़ारस करेन.तुला आमच्या सिस्टीम्स वर लिमिटेड ऍक्सेस राहील. या काळात तुझ्या निष्ठा आणि सचोटि तपासली जाईल. मगच तू आमचा कायम सभासद होऊ शकशील. मेमरी स्टिक वर डेटा आणला असेल, तर चंद्रमेरी कडे दे, ती पुढच्या फ़ॉरमॅलिटिज पूर्ण करेल. सी यू अगेन, या अतिशय अनादि अशा तत्वांच्या लढाईत तुमचे स्वगत असो." निदांनी निरोपादाखल त्यांना एक एक छोटा ऑक्सिजन - ओझोन चा मास्क दिला.
"आय ऍम सो एक्साईटेड...केवल...तू आता आमचा एक सद्स्य आहेस." निलो बाहेर पडतांना त्याच्या गळ्यात पडत म्हणाली. केवल उत्तरादाखल नुसताच हसला. त्याच्या मनात काय होते?
क्रमशः
1 comment:
भट्टी छानच जमत चालली आहे.
Post a Comment