Monday, August 27, 2007

अंतीम युद्ध - अध्याय २- भाग ४

"केवल, वुईल पिक यू अप इन सेवन मिनिट्स" निलो चा मेसेज आला तेव्हा केवल अगदी तयारच होता. त्याने एट्रियम च्या स्वयंचलित दरवाज्यात आपले कार्ड स्वाईप केले आणि तो निलो च्या गाडीची वाट पाहू लागला.
काही सेकंदातच तिची लालचुटुक कार झर्रकन आत आली आणि केवल आत शिरला. वडुरा स्टेशनच्या गेट्रियमचा पासवर्ड एंटर करताच गाडी आपोआप उपलब्ध असलेल्या पार्किंग स्लॉट वर गेली आणि केवल-निलोफर ने सकाळी ७:०७ ची फ़्लॅशफास्ट पकडली.
त्यांना दहा वाजेपर्यंत मुंबई कोस्ट ला कुठल्याही परिस्थितीत पोहोचायला हवे होते.
-संघटनेची मिटींग होती!

केवल ला त्याच्या पहिल्यावहिल्या संघटनेच्या बैठकी बद्दल फारच उत्सुकता होती. निलो तर नुसती उत्साहाने सळसळत होती. "केवल, आज पुन्हा निदां ना बघायला -ऐकायला मिळणार. मला इतका आनंद होतोय म्हणून सांगू! ही इज सो डायनॅमिक एन चार्मिंग." ती जातांना त्याला म्हणालीदेखिल.

समुद्राच्या तळाची तयार केलेल्या विशेष विवरात- 'निती डोम' मध्ये ही खास सभा होती. विशाल पायर्‍या पायर्‍यांच्या स्टेडियम सारखी रचना असलेले हे सभागृह वैशिष्ट्यपूर्ण होते. त्यात ध्वनिक्षेपकाची गरज लागत नसे. तसेच समुद्राच्या तळाची असलेला निळा प्रकाश पुनः परावर्तित करून त्याद्वारे उत्तम प्रकाश योजना साधली गेली होती.
या बैठकीत संघटनेची उद्दिष्टे, त्यांची अंमलबजावणी, त्यातील अडथळे यांवर चर्चा केली जाणार होती.
अर्थात 'मिशन अर्थ' च्या सर्वच बैठकी अत्यंत गोपनीय पण मोकळ्या वातावरणात होत. कुणालाही आपले म्हणणे मांडण्याची संधी असे आणि प्रत्येकाचे मत विचारात घेतले जाई.

फ़्लॅश फास्ट ने त्यंना बरोबर पावणे दहा ला मुंबई कोस्ट ला सोडले. तिथून बर्‍याच आडवळणांनी त्यांनी निती डोम ला उतरण्याचा किनारा गाठला.

No comments: