Friday, August 24, 2007

अंतीम युद्ध - अध्याय २- भाग ३

५/एप्रिल/५००७

आकाश भर पसरलेल्या काळ्या कार्बन च्या धुरातून उगवत्या सूर्याची फ़िकट छाया दिसली तशी विरिता उठून बसली.
"सकाळ पासून डोकं अगदी धरलं आहे. अगदी यंत्रवत रुटीन चालू आहे आपलं ...." ती मनाशीच म्हणाली.
"आंद्रेशा, अगं आवर तुझं. आज तुला पूर्वीच्या आशिया खंडावर ट्युटोरिअल आहे नं? मग, कल्टीकॅप ला ड्रायव्हर्स फ़ीड करून ठेव, आयत्या वेळी मग सर्च करत बसतेस.
आणि तुझे को-ऑर्डिनेट्स पण फ़ीड कर, नाहीतर नेहमी प्रमाणे तुला लोकेट करत राहतील टिचर्स जिओटेल वर. " तिने आंद्रेशाला सूचनांचा भडिमार केला.

"आणि मला माझ्या या डोकेदुखीवर पण उपाय शोधायलाच हवा लवकर..तसही ब‍र्‍याच दिवसांत आवर्तिनीशी बोललेच नाहीये.." विरीताने विचाराच्या नादातच तिच्या इन्फ़्रोट्रिस वरुन तिच्या कराचीच्या डॉक्टर बालमैत्रिणीला ऑनलाईन घेतले.
"हाय...विरीता..किती दिवसांनी..व्हॉट अ प्लेजर..कशी आहेस?" आवर्तिनी चा आनंद ओसंडत होता.
"अगं, काही ठीक नाही. खूप डोकं दुखतं आहे. अनीझी वाटतं आहे. मळमळतं आहे..."विरीता ने तक्रार सांगीतली. "ओह! प्लीज तुझी हिल्चिप इन्सर्ट कर पाहू." आवर्तिनी डॉक्टरच्या भूमिकेत शिरत म्हणाली.
विरीता ने आपला डावा हात टर्मिनल वर ठेवला. तिकडे आवर्तिनी चा इन्फ़ोट्रिस डायग्नोस्टिक टेस्ट्स रन करु लागला.
थोड्या वेळाने ती म्हणाली "ठीक आहे विरीता, काळजी करण्यासारखे नाही. जरा टेंशन कमी घेत जा गं. मी मेडिसीन्स फ़ीड करायला सांगते तुझ्या फ़ूड इनपुट वर्कप्लेस वर. तुझा आयडी सांग जरा."
विरीता ने आपला क्रमांक सांगितला. लगेच त्यावर आवश्यक ती औषधे ऍड करण्याची रिक्वेस्ट ट्रान्सफर झाली.

"चला झाली एकदाची सकाळची कामं.." मिसेस लेकशॉ त्यांच्या रूम मधून येत म्हणाल्या "काय गं विरीता, बरं नाही वाटत का?" तिच्या म्लान चेहेर्‍याकडे पाहून त्यांनी धास्तावुन विचारले. "झोप बघू तू. मी पाहाते. माझं पूजा-जप सगळं आवरलंच आहे आता."

"छे हो, थोडी कसकस आहे. वाटेल बरं. औषधं घेतली आहेत." विरीता उत्तरली.

तंत्रज्ञान अतिशय प्रगत असलेल्या या काळात आपले आवडते जेवण स्वतः बनविण्याचा साधा आनंद मात्र मानवाने केव्हाच गमावला होता. उपलब्ध असणार्‍या अतिशय मर्यादित रिसॉर्सेस मध्ये घाउक अन्न बनविले जाई, त्याचा द्रव अर्क काढून ते प्रत्येकाची न्युट्रीशनल गरज लक्षात घेउन त्याला फीड इन केले जाई. या सर्वांचे व्यवस्थापन कम्युन चे कर्मचारी करीत.
विरीताने स्वतःचा ब्रेकफास्ट फ़ीड इन करुन घेतला व ती इतर कामांकडे वळली.

दृष्य बदल:
डॉ लेकशॉंनी आपली काळीभोर रोल्झाना कार सफ़ाईदार पणे पोर्च मध्ये वळवली आणि ते पायर्‍या चढून वर आले. "किती हा उशिर! रात्रभर लॅब मध्ये करमतं तरी कसं तुम्हाला! तुम्ही आणि तुमचं ते 'चीर निद्रा'ड्रग..इथे आम्हालाच चीरनिद्रा लागायची वेळ आली तरी तुम्ही येणार नाहीत.." मिसेस लेकशॉ टिपीकल बायकोप्रमाणे वैतागल्या होत्या.
"अगं आमचं संशोधन आता अगदी अंतीम टप्प्यात आहे. बरेच महत्त्वाचे निष्कर्ष अपेक्षित आहेत. अशा वेळी मला प्रायमरिली तिथे असायलाच हवं की नकॊ?" ते नेहमीच्याच निरुत्तर करणार्‍या शांत आवाजात बोलले.


व्याख्या : हिल्चिप - जन्मतःच मानवाच्या शरीरात इन्सर्ट केली जाणारी इंटेलिजंट चिप. त्याद्वारे रोगाचे निदान अधिक अचूक व रिमोट्ली होऊ शकते.

Wednesday, August 22, 2007

भाग २

सिक्युरिटी चे सगळे सोपस्कार पार पाडून ते एका मोठ्या अनेक लॉबीज असलेल्या इमारतीत शिरले.
निदा स्वतः एका कम्युन मध्येच रहात होते. एका उंच टेबलमागे ते बसले होते. समोर त्यांचा अद्ययावत इन्फ़्रोट्रिस होता. त्यावरच्या 'सरफेस स्क्रीन' वर अनेक बटने लखलखत होती. इंटेलिवर्क द्वारे लॉगिन करून त्यांनी निलो व केवलला ट्रस्ट इश्यु केल्यावरच समोरचा सुडो पडदा उघडला आणि आत असलेल्या खर्‍या निदांचे त्यांना दर्शन झाले. (तो पर्यंत त्यांची खरी वाटणारी इमेज च केवल ला दिसू शकत होती). त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून केवल आणि निलो दिपल्यासारखे झाले.
"सर, मी निलोफ़र! आपल्या संघटनेची सदस्या आहे. आणि आज या माझ्या मित्राला, केवलला पण सदस्य होण्याची इच्छा आहे. प्लीज...." भारून गेल्याने निलो ला पुढे काही बोलताच आले नाही.

"हे बघ, आपल्याला केवळ संख्यात्मक नाही तर गुणात्मक काम करायचे आहे. आपल्या उद्दिष्टांनी प्रेरित होऊन, भारून गेलेल्या तरुणांची तर आपल्याला गरज आहेच, पण ते पूर्ण डेडिकेटेड आणि विश्वासू हवेत. याला तू आपली संघटना, तिची उद्दिष्टं याविषयी पूर्ण कल्पना दिली आहेस का?"
निदांचा आवाज प्रेमळ तरीही खंबीर होता. "काय करतो हा?" त्यांनी विचारले.
"मी केवल लेकशॉ, नुकतच मी माझं बेसिक ग्रॅज्युअएशन पूर्ण केलं आहे, आणि आता संरक्षण विभागात रिसर्च विंग मध्ये रुजू झालो आहे" केवल ने सांगीतले.

"लेकशॉ...म्हणजे जेनेसेसिस्ट डॉ.विधिस्तव लेकशॉंचे...?" "हो हो, मी त्यांचा नातू."..केवल स्पष्टीकरण देत म्हणाला.
निदां चा चेहेरा एकदम गंभीर झाला. त्यांच्या अथांग निळ्या डोळ्यात विषादाची एक छटा चमकून गेली. "निलो, माझी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आधीच आपल्या संघटनेला अनुयायी कमी, त्यात तू असे घरभेदी लोक आणू लागलीस तर कसे व्हायचे? मानवजातीचे कल्याण हे एकच उद्दिष्ट - मग त्यासाठी पूर्ण विश्वाची उलथापालथ का होईना - असे मानणार्‍या आपल्या संरक्षण विभागातला उगवता शास्त्रज्ञ हा आपला सभासद होऊ शकेल असे तुला वाटलेच कसे?"
ते एकदम व्यथित होऊन उदगारले. "मला माहिती आहे सर, पण केवल ची मते वेगळी आहेत. त्याला शांतता पूर्ण मार्गाने, सगळ्यांना बरोबर घेवून, संशोधन करायचे आहे...नॅनो स्पिटीकल वर मानव वंश प्रस्थापित करायला तर त्याचा पूर्ण विरोधच आहे. त्या ऐवजी इथेच राहून ही धरित्रीच पुन्हा सुजलाम सुफ़लाम कशी करता येइल, यात त्याला जास्त रस आहे.
म्हणूनच त्याला आपले सदस्यत्व हवे आहे." निलो ने आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला.

"हो, केवल? हे खरे आहे?" निदांनी केवल ला विचारले. त्यांचा स्वर साशंक होता.
"खरं सांगायचं तर, सर,मी द्विधा मनःस्थितीत आहे. माझे कुटुंबिय, स्वजन यांचा विचार केला तर 'लवकरच अस्तंगत होत असलेली प्रजाती'हा मानवजाती वरचा शिक्का कसंही करून दूर करावा असं वाटतं, पण संपूर्ण विश्वाचा, त्यातल्या वर्षानुवर्षे अव्याहत पणे चाललेल्या क्रिया प्रक्रियांचा विचार करता, हे बदलायचा आपल्याला काहीच अधिकार नाही असेही वाटते.
यातून काहीतरी सुवर्णमध्य शोधायला हवा. मानवाच्या बुद्धिमत्तेवर माझा पूर्ण विश्वास आहे फक्त त्याच्या 'ओरबाडून घेण्यार्‍या आक्रमकते' वर इलाज शोधायला हवेत. आजवरचा इतिहास पहाता, आपल्याला आपल्या चुका सापडणं काही अवघड नाही.
मला वाटतं त्यातूनच आपण काहीतरी मार्ग काढू शकू. संघटनेचा सदस्य होण्यामागे माझा असा जरा वेगळा आणि व्यापक दृष्टिकोन आहे, सर. विरोधासाठी विरोध नाही, तर काहीतरी रचनात्मक आणि उपाय सूचक विरोध महत्त्वाचा आहे."
केवल च्या स्वरात आत्मविश्वास आणि मार्दवाचं अनोखं मिश्रण होतं.

"वेल, यंग मॅन..आय ऍप्रिशिएट युअर व्ह्यू, पण तुझ्या निष्ठा मात्र दुहेरी ठेऊ नकोस. तुला काहीतरी एक स्वीकारावं लागेल." निदा म्हणाले. "फ़ॉर टाईम बिइंग, मी तुला मर्यादित सदस्यत्व देण्याची शिफ़ारस करेन.तुला आमच्या सिस्टीम्स वर लिमिटेड ऍक्सेस राहील. या काळात तुझ्या निष्ठा आणि सचोटि तपासली जाईल. मगच तू आमचा कायम सभासद होऊ शकशील. मेमरी स्टिक वर डेटा आणला असेल, तर चंद्रमेरी कडे दे, ती पुढच्या फ़ॉरमॅलिटिज पूर्ण करेल. सी यू अगेन, या अतिशय अनादि अशा तत्वांच्या लढाईत तुमचे स्वगत असो." निदांनी निरोपादाखल त्यांना एक एक छोटा ऑक्सिजन - ओझोन चा मास्क दिला.


"आय ऍम सो एक्साईटेड...केवल...तू आता आमचा एक सद्स्य आहेस." निलो बाहेर पडतांना त्याच्या गळ्यात पडत म्हणाली. केवल उत्तरादाखल नुसताच हसला. त्याच्या मनात काय होते?


क्रमशः

Tuesday, August 21, 2007

अंतीम युद्ध

"कसं काय" ब्लॉग वर यापूर्वी प्रसिद्ध झालेली ही विज्ञान काल्पनिका ! ती अपूर्ण वाटली अशी ब‍र्‍याच वाचकांची प्रतिक्रिया आल्याने, एक अभिनव प्रयोग म्हणून मी ती पुढे लिहीत आहे. अर्थात लेखिकेच्या परवानगीनेच!
कसं काय च्या लेखिकेला अर्थात प्रश्नांची उत्तरं वाचकांकडूनच अभिप्रेत होती.

मला माझ्या मर्यादांची पूर्ण जाणिव आहे, व हा एक प्रयत्न आहे.



अंतीम युद्ध - फेज २


"आ स्स्स्स्.!" आंद्रेशा ने आळोखेपिळोखे देत आळस दिला. "हा दादा म्हणजे मुलखाचा झोपाळू. कधी लवकर उठणार नाही.." त्याचे पांघरुण सारखे करीत ती बाथरूम कडे वळली.
चादरी च्या आतून केवल ने डोळे किलकिले करुन तिच्याकडे पाहिले, आणि काहीतरी आठवून तो ताडकन् उठलाच. "बापरे! मला नऊ वाजता सेंटर् ला पोहोचायचं होतं. मी कल्टीकॅप ला फीड् केलं होतं. त्याने रिमाइंड् का नाही केलं..?"
तो मनाशीच पुटपुटत तयार् होत होता. "कल्टीकॅप माझा केअर टेकर् आहे दादा, मी तुला ऍक्सेस प्रोहिबिट् केला आहे"
आंद्रेशा आतून ओरडली.
तिच्याकडे रागारागाने पहात केवल ने निलोला कॉनफ़रंस वर घेतले. त्याच्या सेल च्या छोट्या स्क्रीन वर तिची छबी झळकली. "निलो, आज निदांना भेटायचे आहे, लक्षात् आहे ना?" "बट् ऑफ कोर्स.." ती हसत् हसत् म्हणत होती.

केवल ने मग भराभर आवरले आणि कार ला डेस्टिनेशन फ़ीड करून तो निघालाच.
हायवे नं ४/अ-३ वर निलो त्याची वाटच पहात होती. "हाय केवल..!" तिने त्याची गाडी दिसताच स्वतःच्या सेलवरून इंटरप्ट दिला. पासवर्ड एंटर केल्यावर कार बरोब्बर तिच्या पुढ्यात थांबली. दरवाजे आपोआप उघडले. "केवल...तुला कधी वेळेत पोहोचता येईल का?" पुस्तक वाचत असलेल्या केवलला हलवत तिने विचारले "ओह, निलो, तू आलिस सुध्दा? मला कळलेच नाही. जुन्या भारत देशाचं इतकं
छान वर्णन आहे. लोक काय सुखि होते पूर्वी! नळाला धो धो पाणी यायचं, लोक डॉर्म मध्ये नाही तर स्वतंत्र पणे रहायचे, फळं फुलं मुबलक असायची, प्रत्येक तरुणाकडे बाईक असायची, रस्ते फ़्री असायचे... नाहीतर आता..कुठे निघायचं असेल तर तास भर आधी रोड ऍक्सेस बुक करावा लागतो..!" तो अर्धवट स्वतःशी व अर्धवट तिच्याशी बोलत होता.
"कमॉन, केवल.. वी मस्ट रश.."ती फारसे लक्ष न देता म्हणाली.

निदां कडे ते पोहोचले तेव्हा नऊ वजून गेले होते.

Thursday, June 28, 2007

अद्न्यानातलं सुख

आत्ता 'मराठी चित्रपटातील गाणी' वर ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी' वाचलं!
मलाच नवल वाटलं...गेली कित्येक वर्षं मी हे गाणं ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तुच्छता मोठी....असंच म्हणत होते....मला असं वाटायचं देखिल की भेटीत 'तुच्छता' कशी काय असू शकेल बुवा..? पण म्हटलं की असेल काही...
तर आज तो फंडा क्लिअर झाला....


आपण किती गाढ अनभिद्न्यता बाळगत असतो!

Thursday, June 07, 2007

अभिरुची

स्वयंशिस्त, नीट्नेटकेपणा आणि एकूणच 'अभिजातता' ही अनुवंशिक असते असे मला वाटू लागले आहे.
म्हणजे काही लोकांची सामान्यतः बोलण्याची स्टाईल, एकूण व्यक्तिमत्व, आवडी, प्रतिक्रिया...सारंच कसं अगदी तोलून, पारखून, 'रिच' असतं........लूज टॉक्स नाहीत, फ़ालतू हसणे नाही, बोजड अपेक्षाही नाहीत.

आणि मला हेही पटलं आहे की आपण कितीही आव आणला तरी मूळ आडातच नाही तर पोहोर्‍यात येणार कुठून?
पण जेव्हा जमेल तेव्हा, अशा उच्च अभिरुचीच्या माणसांच्या सहवासात वेळ घालवून आपले आयुष्य थोडे समृद्ध तर करता येईल!

खरंच! आयुष्य जगण्याच्याही किती तर्‍हा असू शकतात नाही?
असं चाखत चाखत, रुचीने, सवडीने जगता यायला हवं. नव्हे, ते तसं जाणिवपूर्वक जगायला हवं...पण रोजच्या लढाईत आपण ती कोवळीक कधी हरवून बसतो तेही समजत नाही.

आणि दर वेळी सुखा आनंदाच्या, खर्च- खरेदीच्या क्षणी डोकं वर काढणारी ती खास मध्यमवर्गीय अपराधीपणाची जाणिव!
मूल्यं आणि तत्वं यांच्या कोषात लपेटलेली.....


पारंपारिकतेच्या अश्या विळख्यांमधून सुटणं किती अवघड आहे.

Wednesday, June 06, 2007

बंद झाली कवाडं...मन खुलता खुलेना

मला सद्ध्या राईटर्स ब्लॉक का काहिसं म्हणतात नं.....तो आलाय असं वाटू लागलं आहे.
त्यामुळे प्रतिभेचा प्रवाह काही केल्या खुलाच होत नाहिये.
ट्युलिप ने हे अगदी छान पणे मांडलं आहे.......कशावर लिहावं ....
......
जगजित चित्रा च्या हळुवार गझला, गुलाम अलिंचा आर्त पिळवटून टाकणारा सूर आणि बरंच काय काय आवडायचं.........
आता पडणारा पाऊस, गवतावरचे दवबिंदू किंवा पानगळीनंतरच्या पाचोळ्याचा चुर चूर आवाज...काही म्हणता काहीच मनाला भावत कसं नाही?

आयुष्य असं विरामचिन्हं विरहीत, प्लेन टेक्स्ट कसं काय झालं?

ग्रेस च्या कवितांचे अर्थ, जी एंच्या निर्व्याज गाभ्याच्या खोलवर भिडणार्‍या आर्त कथा, कायम आवडणारा चित्रपट 'सिलसिला', गौरी ची मुक्त अनिर्बंध स्त्री, सारं जग पिऊ पिऊ म्हणणारी कांक्शा........मनाचे हे सवंगडी आता पिंगा घालत नाहीत भोवती.......दुसरीच कसली तरी अपरिचीत जाणिव व्यापत जाते मन आताशा....
समर्पित केल्याची, (की आवाज हरविल्याची?)

Tuesday, May 15, 2007

पाककृती - कढीगोळे

आज मी तुम्हाला एका छान पदार्थाची कृती सांगणार आहे. -कढीगोळे.

हरभरा डाळ ५-६ तास भिजत घालावी. नंतर निथळून, वाटून घ्यावी. त्यात आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, जिरेपूड, कोथिंबीर, मीठ, थोडे लाल तिखट इ घालून मिसळून घ्यावे.
जरा आंबट ताकाची कढीपत्ता, मेथ्या इ. घालून कढी करावी. तिला उकळी आली की मिश्रणाचे छोटे गोळे करून त्यात सोडावेत आणि मंद आचेवर चांगले शिजू द्यावे. गोळे सोडल्यावर लगेच ढवळू नये.
वाढतांना लाल मिरच्या तळून फ़ोडणी करावी व गरम भाकरी अगर भाताबरोबर खावे.

सूचना - कढीत बेसन जरा कमी घालावे नाहीतर नंतर फ़ार दाट होते.

प्रकार : हरभरा डाळी ऐवजी ओले हरभरे, ओले तूरीचे दाणे, मूगाची डाळ ही वापरता येईल.