Saturday, September 29, 2007

अंतीम युद्ध - पुढचा भाग

पेच मोठा होता.. उत्तरे सहज नव्हती.
केवल ने निदांशी संपर्क साधला तेव्हा ते काही आकडेमोड करण्यात व्यस्त होते.
"सर, माझ्याकडे काही महत्वाची निरीक्षणे आहेत, काही निष्कर्षही आहेत. मला तातडीने आपला कायम स्वरूपी सभासद करुन घ्या. हे फार आवश्यक आहे, निकडीचंही आहे....वेळ ही फार कमी आहे आपल्याकडे , सर" त्याने आग्रही सुरात प्रतिपादले.
त्याच्या स्वरातील सच्चाई व कळकळ निदांना जाणवली असावी. तसेही ते अंतर्मनाची ग्वाही अधिक महत्वाची मानणार्‍यांपैकी होतेच. तरीही त्यांनी त्यांच्या जवळील छोट्या उपकरणाद्वारे केवल च्या रिक्वेस्ट ची ऑनेस्टी व ट्रस्ट तपासून बघीतली.
ती पुरेशी आढळताच त्यांनी लगेच ऑनलाईन सूचना देवून, त्याला उर्वरीत राईट्स देण्याची व्यवस्था केली.

दृष्य बदल :
"मिशन अर्थ" च्या छोटेखानी मिटींग रुम मध्ये अतिशय गोपनीय व फक्त अती विशिष्ट सभासदांची बैठक चालू होती.
निदां च्या विशेष विनंतीला मान देउन आज डॉ लेकशॉ उपस्थित होते.
"पण हे फार अवघड आहे, केवल, अशक्य कोटीतलंच म्हणता येईल असं..." डॉ लेकशॉंच्या स्वरात अविश्वास होता.
"पण आपण त्याची शक्याशक्यता पडताळून पहायला काय हरकत आहे? मला तरी तो एकमेव पर्याय दिसतो आहे. आपल्या नैतीकतेच्या आग्रहाशी, वैश्विक आणि पार्थिव भूमिकेशी सुसंगत असणारा एकमेव पर्याय!

केवल समर्थनार्थ उदगारला. "ही फक्त एक संकल्पना आहे. प्राथमिक स्वरुपात. आत्ता आपल्याकडे उपलब्ध असलेले रिसोर्सेस, उर्जा आणि तंत्रज्ञान, जे की आपण नॅनो स्पिटीकल वर जाण्यासठी वापरणार आहोत, तेच वापरुन, जर, कार्बन सायकल उलटी करण्याची प्रक्रिया सुरु करता आली..."

केवल च्या या प्रस्तावावर सारेच एकदम स्तब्ध झाले. त्याच्या शक्याशक्यतेची पडताळणी तेथे असणारे सारेच मनातल्या मनात करत होते.
"हे एक अंतीम युद्ध आहे...निकराचा प्रतिवाद...मानवाच्या लोप पावत जाणार्‍या संवेदनशीलतेचा अखेरचा यत्न.. याचे यशापयश कुणा एकाची मक्तेदारी नसेल. आपल्याला जगातील श्रेष्ठ शास्त्रज्ञांची मते आजमावी लागतील, अनेकांचे सल्ले घ्यावे लागतील, आणि त्यानुसार,.. ठरवावे लागेल.."
निदांनी संयत पणे सभेची सूत्रे हाती घेतली. "केवल, हीच कल्पना गेले कित्येक दिवस माझ्याही मनात घोळते आहे, पण मला ती फारशी अनुकूल वाटत नाही." त्यांनी प्रांजळपणे कबूल केले.

2 comments:

HAREKRISHNAJI said...

It's becoming more and more interesting

मन कस्तुरी रे.. said...

Thank you, Harekrishnaji for being so sensible.

Ashwini