Friday, September 28, 2007

अंतीम युद्ध- भाग ७

विरीता विचारमग्न अवस्थेत बसून होती. मानवी स्वभाव हा सर्वाधिक अभ्यासाचा आणि गुंतागुंतीचा विषय आहे हे तिचे जुनेच मत होते. "इतका काळ लोटला, इतक्या पिढ्या उलटल्या, तरिही, आपण त्याच त्या चुका पुनः पुनः करत राहतो.
जुन्या पिढीला कालबाह्य ठरवून, स्वतःला अधिक सक्षम,हुशार ठरवत आपण आपलं घोडं दामटत राहतो..आणि चुकत जातो. .अगदी र्‍हासाची, सर्वनाशाची वेळ आली तरी!" तिला वाटले.
तिच्या या तत्वज्ञानात्मक चिंतनाला कारणही तसेच होते.

केवलने नुकतेच "चीरनिद्रा" या विषया वर तिचे बौद्धिक घेतले होते. अनेक दिवस, अनेक वर्षे...झोपून रहायचे. शांत....फ़क्त श्वासोश्वास चालू म्हणून जिवंत म्हणायचे. बाहेरच्या घडामोडींशी अनभिज्ञ! आधी प्रोग्रॅम करुन झोपेची मुदत ठरवून ठेवायची. काळ जणू गोठवून ठेवायचा...आपल्यापुरता.

"कुठे जाणार आहोत आपण एक दिवस कोण जाणे..." ती हतबुद्ध होऊन उद्गारली. "पण पर्याय शोधण्यापलिकडे आपल्या हातात आहे तरी काय! तेच तर करत आलोय वर्षानुवर्षे.." तिला वाटले.


तिकडे केवल त्याच्या स्वतंत्र अभ्यासिकेत इंटेलिवर्क वर माहिती मिळविण्यात, ती तपासून पाहाण्यात गुंग झाला होता.
तो ज्या दिशेने विचार करीत होता त्या विषयाचा मूळ गाभाच तर तो होता. "रिव्हर्सल ऑफ़ कार्बन सायकल!...त्याला लागणारी प्रचंड उर्जा, प्रस्तावित गुंतागुंतीच्या साखळी प्रक्रियेतून निर्माण होणारी उष्णता, लागणारे तंत्रज्ञान,
त्याचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव...आणि त्याचे सुदीर्घ फायदे!"

No comments: