Showing posts with label विज्ञान काल्पनिका. Show all posts
Showing posts with label विज्ञान काल्पनिका. Show all posts

Friday, October 05, 2007

अंतीम युद्ध - भाग ९

दहा महिन्यांच्या अविश्रांत परिश्रमांनंतर प्रोजेक्ट ची रुपरेषा तयार झाली. सद्ध्या उपलब्ध असलेले अद्ययावत तंत्रज्ञान व उर्जा कार्बन सायकल च्या उलट प्रक्रियेस पुरेसे आहेत यावर कुणाचेच दुमत नव्हते.
फक्त त्यामुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता, स्फोट, वावटळी मानव कितपत साहू शकतील हाच मुद्दा होता. त्यासाठी चीर निद्रेचा पर्याय सुचविण्यात आला होता.
खोल समुद्राच्या तळाशी मोठी विवरं बांधून त्यात चीर निद्रे साठी झोपून जायचे...बाहेरच्या घडामोडींशी अनभिज्ञ.....

दृष्य बदल:
केवल चा चेहेरा विमनस्क होता. "पण का, आजी-आज्जो आणि आई तू सुद्धा.... सहभागी होता येणार नाही म्हणजे काय? या उपक्रमाचे आपण च तर उद्गाते आहोत...आणि आता तुम्हीच अशी कच खाल तर कसं होणार?" तो मोजून नवव्यांदा विरिता ला म्हणाला.
"नाही रे, कच खाण्याचा प्रश्नच नाही...आणि आमचा तुझ्यावर, तुझ्या सद्सद विवेक बुद्धी वर पूर्ण विश्वास आहे. पण आम्ही मात्र इथेच रहायचा निर्णय घेतला आहे. भावी पिढ्यांना उगवती ची दारे खुली करुन देतांनाच, आम्हाला मात्र या संहाराचे साक्षीदार व्हायला आवडेल. हा तरी एक अनुभवच आहे नं , केवल..
पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज काही जणांनी तरी त्याग सोसायलाच हवा, आजपर्यंतच्या आपल्या बेलगाम वागण्याचे क्षालन म्हण हवे तर. या बलीदानामुळे तुम्हाला मिळाल्याच तर काही गुड विल्स मिळोत." विरीता त्याला समजावत म्हणाली.

केवल ला काही ते फार पटलेले दिसले नाही.

वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळे प्रयत्न चालू होते. पद्मनाभ यांनी एका विश्व प्रार्थनेचे आयोजन केले होते. शिखर व त्याच्या ग्रुप ने जन जागरणाची व्यापक मोहीम आखली होती. विशेषतः लहान मुले डोळ्यापुढे ठेवून त्यांचे जागृतीचे काम चालले होते.

आधुनिक संपर्क साधनांमुळे जग अगदीच जवळ आले होते. त्यांमुळे बर्‍याच गोष्टी सुलभ झाल्या होत्या. अर्थात मानवी स्वभावाच्या अनेक कंगोर्‍यांचा प्रश्न होताच. प्रत्येकाच्या वेगळ्या शंका आणि त्यांचे निरसन करण्यानेच शिखर-विरीता थकून गेले होते.

Friday, September 28, 2007

अंतीम युद्ध- भाग ७

विरीता विचारमग्न अवस्थेत बसून होती. मानवी स्वभाव हा सर्वाधिक अभ्यासाचा आणि गुंतागुंतीचा विषय आहे हे तिचे जुनेच मत होते. "इतका काळ लोटला, इतक्या पिढ्या उलटल्या, तरिही, आपण त्याच त्या चुका पुनः पुनः करत राहतो.
जुन्या पिढीला कालबाह्य ठरवून, स्वतःला अधिक सक्षम,हुशार ठरवत आपण आपलं घोडं दामटत राहतो..आणि चुकत जातो. .अगदी र्‍हासाची, सर्वनाशाची वेळ आली तरी!" तिला वाटले.
तिच्या या तत्वज्ञानात्मक चिंतनाला कारणही तसेच होते.

केवलने नुकतेच "चीरनिद्रा" या विषया वर तिचे बौद्धिक घेतले होते. अनेक दिवस, अनेक वर्षे...झोपून रहायचे. शांत....फ़क्त श्वासोश्वास चालू म्हणून जिवंत म्हणायचे. बाहेरच्या घडामोडींशी अनभिज्ञ! आधी प्रोग्रॅम करुन झोपेची मुदत ठरवून ठेवायची. काळ जणू गोठवून ठेवायचा...आपल्यापुरता.

"कुठे जाणार आहोत आपण एक दिवस कोण जाणे..." ती हतबुद्ध होऊन उद्गारली. "पण पर्याय शोधण्यापलिकडे आपल्या हातात आहे तरी काय! तेच तर करत आलोय वर्षानुवर्षे.." तिला वाटले.


तिकडे केवल त्याच्या स्वतंत्र अभ्यासिकेत इंटेलिवर्क वर माहिती मिळविण्यात, ती तपासून पाहाण्यात गुंग झाला होता.
तो ज्या दिशेने विचार करीत होता त्या विषयाचा मूळ गाभाच तर तो होता. "रिव्हर्सल ऑफ़ कार्बन सायकल!...त्याला लागणारी प्रचंड उर्जा, प्रस्तावित गुंतागुंतीच्या साखळी प्रक्रियेतून निर्माण होणारी उष्णता, लागणारे तंत्रज्ञान,
त्याचा मानवी जीवनावर पडणारा प्रभाव...आणि त्याचे सुदीर्घ फायदे!"