Thursday, October 04, 2007

अंतीम युद्ध - भाग ८

डॉ लेकशॉ मात्र केवल च्या प्रतिवादाने प्रभावित झालेले दिसत होते. "माझा फक्त शास्त्रिय सत्यांवर विश्वास आहे. शाबित करण्यात आलेली आणि विश्वसनीय अशी शुद्ध सत्यं!
आपल्या राष्ट्रीय संरक्षण समितीच्या सदस्यांनाही मी हेच उत्तर दिले असते. बाकी मी काही जाणत नाही. किंबहुना तो माझा प्रांत नाही असे मी मानतो. पण तरीही,थोडे माझ्या मताबाहेर जाऊन, मी संरक्षण समितीलाही यावर विचार करायला भाग पाडेन. मी आपले सर्व संशोधन आणि निष्कर्ष तुम्हाला वापरायला देऊ शकतो.. त्याबद्दल हवी ती सर्व मदत मी करायला तयार आहे.

निदांच्या चेहेर्‍यावर मंद स्मित उमटलं...

एक पाऊल पुढे पडलं होतं!



डॉ लेकशॉंच्या अथक युक्तीवादावर अखेर संयुक्त राष्ट्रांच्या संरक्षण समितीने ही मान तुकवली. मिशन नॅनो स्पिटिकल रद्द करण्यात येऊन त्याऐवजी ऑपरेशन सेव्ह अवर प्लॅनेट ची योजना कार्यन्वित झाली.

पुढचे चारपाच महीने केवल ला अजिबात उसंत नव्हती. बरेच मुद्दे विचारात घ्यायचे होते,अनेक बैठका घ्यायच्या होत्या आणि अनेकांच्या गळी ही कार्बन सायकल रिव्हर्सल ची कल्पना उतरवायची होती.

"केवल...कुठे इतका गुंतून राहीलायस? मला दिवस दिवस साधा ट्रॅकही करत नाहीस तू हल्ली. आपले हे आयुष्यही मोलाचे नाही का? पृथ्वीचे भले करण्याच्या या नादात तू सगळं जीवनच पणाला लावतो आहेस." निलोफर हिरमुसली होती.
"अगं, जगलो वाचलोच या प्रकल्पानंतर, तर मग आहोतच की, मला तू न तुला मी. पण आता हे फार महत्त्वाचं आहे, निलो. पृथ्वीचं आणि पर्यायाने संपूर्ण मानवजातीचं भवितव्य पणाला लागणार आहे. मला माहीती नाही आपल्याला हे करण्याचा अधिकार आहे किंवा नाही.
वाईटाबरोबर चांगलेही नको जळून जायला. कुणाला संधी द्यायची आणि कुणाला नाकारायची यात फार वाद होऊ शकतात. साधारणपणे अडीचशे-तीनशे वर्षे आपल्याला प्रदीर्घ झोप घ्यावी लागेल ...आणि प्रयोग यशस्वी झालाच तर मग आपल्याला उगवतीचे रक्तीम सूर्यबिंब पहायची संधी मिळू शकेल त्यानंतर.." केवल स्वप्नाळू डोळ्यांनी म्हणाला.

No comments: