Tuesday, August 22, 2006

कधीतरी

कुणीसं, मला वाटतं कवी चंद्रशेखर गोखले यांनी बहुधा म्हटलं आहे,
खूप दिवसांच्या संततधार पावसानंतर एकदम लख्ख सोनेरी ऊन पडावं तसं आपल्या आयुष्यात प्रेम येतं.
नको म्हणता थांबत नाही, मात्र ये ये म्हटल्याने येत नाही............


कशी ही भावना ...अलवार, नाजूक, अनोळखी...
खूप हवीहवीशी...
झोकून देतांना काहीही न उरवावेसे वाटणारी..........

Thursday, August 17, 2006

कोल्हाट्याचा पोर.........१७-ऑगस्ट-०६

सद्ध्या मी किशोर शांताबाई काळे चं 'कोल्हाट्याचा पोर' हे आत्मचरित्र वाचते आहे.
आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा वातावरणात वाढून डॉक्टर झालेल्या किशोरची कहाणी चटका लावून जाते.
नाचणारी आई, तिचा हा दुर्लक्षित मुलगा, सामाजिक प्रथा आणि समजुती....
पैशाच्या मागे धावणारी, कळाहीन, क्षुद्र माणसं....सारंच मन विषण्ण करणारं!
नीती-अनीती च्या, लौकिकाच्या पांढरपेशी कल्पनांना धुडकावून पत्करलेलं उपेक्षित,दुःखी जीवन!

आपण फ़क्त उसासण्याखेरिज काय करू शकतो?

Wednesday, August 16, 2006

ashwinis-creations

पुण्यात आय.आय.टी.......

काल मी एन.सी.एल. कॅंम्पस मध्ये स्थित असलेल्या आय.आय.एस.ई.आर (आयसर) च्या उदघाटनाला गेले होते.
तिथले ते दीप्त, झळाळते विद्यार्थी, प्रोफ़ेसर्स आणि सायंटिस्ट्स पाहून मन भरून आलं...पुण्यात I.I.T. निघाल्याचा आनंदही होता.
फ़क्त हे सर्व आपल्या भारताच्या कामी यायला हवं...
भारताला प्रगतीची, समृद्धीची.....नैतिक समृद्धिची म्हणा हवं तर... क्षितीजं कवेत यायला हवीत...

Tuesday, August 08, 2006

ashwinis-creations

ashwinis-creations
खूप दिवसांपासून मला ही कविता आठवत होती, दुसरीत असतांना पाठ केलेली.....
"पावसाच्या धारा येती झरझरा, झाकळले नभ सोसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ, जागोजागी खाचांमध्ये तुडुंबले जळ"
कुणाला ही पूर्ण येत असेल तर प्लीज मला कळवा..........
या कवितेशी माझ्या लहानपणीच्या खूप आठवणि निगडित आहेत.
...
पावसाळी दिवसात त्या अधिक कातर होतात, मन मागे खेचल्या जातं...आजच्या सगळ्या सुखसोयी वृथा वाटू लागतात, आणि जुनेच ते अडी अडचणींचे, पड्त्या पावसातल्या मंद पिवळ्या बल्बचे, श्रावण सोमवारी केलेल्या केळ्याच्या शिकरणीचे, कुठलंही मोठं दडपण नसलेले ,अतिशय क्षुल्लक सुखांचे दिवस आठवून मन भरून येतं........
किंबहुना ज्या वेळी जे असतं ते न आवडणं हाही मानवी मनाला मिळालेला एक शापच म्हणायला हवा!

Tuesday, August 01, 2006

ashwinis-creations

ashwinis-creations

सद्ध्या मी मीना प्रभु यांचं 'चिनी माती' हे अप्रतिम पुस्तक वाचते आहे.
चीनचं, थोड्या अपरिचीत चीनचं अतिशय मनोहारी वर्णन आहे. लेखिका स्वतः उत्साही आणि नवे अनुभव घ्यायला उत्सुक असलेली पर्यटक आहे, त्यामुळे कुठे कंटाळवाणे होत नाही.
चीन च्या जेवणाच्या पदधती, त्यांचे विचार ,संस्कार, राहणीमान, रिवाज...सगळ सगळं त्यात उतरतं!
लेखिकेची खोल जिद्न्यासा‍, अंतरंगात शिरून जाणून घेण्याची वृत्ती आणि सर्व प्रकारच्या अनुभवांसाठी सदा सिद्ध असलेलं निखळ , ओपन मन.... या गोष्टी हे प्रवासवर्णन रंजक व्हावयास मदत करतात.
ह्या दोघी कधी थकत कश्या नाहीत, आणि त्यांना छोट्या छोट्या गोष्टींची गैरसोय अजिबातच कशी जाणवत नाही याचा विस्मय वाटल्यावाचून राहवत नाही.

पण चीनला कधी जाउ तेव्हा जाऊ...सद्ध्या तरी हे पुस्तक चीनच्या व्हर्चुअल सफ़रीचा मनमुराद आनंद देतं!