Monday, April 21, 2014

Heartfelt!

आज अगदी वैतागाचाच दिवस होता. सकाळी दूधवाल्याने एकदम साडेतीन लिटर दूध दिले....आज ऑफीस ला सुट्टी...त्याला सांगायचे राहीलेच. आता दही विरजून बांधा! नंतर पेस्ट संपली म्हणून कनकची आरडाओरड आणि झोप मोडली म्हणून रजत ची तार स्वरात तक्रार! अरे, काय मुलं आहेत का कोण ही! माझी मदतनीस , संध्या येणार होती दुपारी...तिच्या ’स्पेशल’ चकल्या आणि चिरोटे घेऊन तर बाईसाहेब आल्याच नाहीत....आजारी आहे म्हणे!....माझा भिशीचा प्लॅन होता गरम मटार कचोर्‍या, गरम शेव, दही-बटाटे व उसाचा रस...असा खास ’इंदोरचा’ मेनू ठेवणार होते..सराफ्यातल्या सारखा तर..... ! आता भेळ-आईस्क्रीम असा महाराष्ट्रीयन मेनूच ठेवावा लागणार बहुतेक. आणि बायका तरी काय...दागिने आणि पदार्थ आणि रिलेशन्स ...यावरच बोलतात. हिर्‍यांचे मंगळ सूत्र आणि कानातले ...मी नाही आणत म्हणे..नवराच माझा आणतो... काय काय.....त्यालाच आवड आहे! (?!) .... इतका हौशी नवरा आणि इतकी अरसिक बायको...?हॅलो...! काही लोकांचं संभाषण ऐकत होते...जर बायको काही दिवस कुठे गावाला गेली...” तर त्याचं काय...तो काय हाताने करुन खाईल काय...?” अरे!.....? हाताने करुन खाणे म्हणजे काय कमी पणा आहे? ती नाही खात ते रोज? मला असे बायकांना डॉमिनेट करणारे, कोत्या विचारांचे , कधीही कुणालाही चांगलं न म्हणणारे, सदैव स्वतःच्याच विचारात मग्न राहणारे लोक आवडत नाहीत अजिबात...... मानाचे भुकेले पण कर्तृत्वशून्य, कपबशी साधी उचलून सुद्धा न ठेवणारे, स्वयंपाक हा सर्वस्वी बायकांचाच प्रांत असे मानणारे पण टीका करण्यास पुढे असणारे, शिळं अजिबात न खाणारे, सदैव ही भाजी कशाची, काय , त्याने काय अपाय होतो, त्यात काय आहे....असा चुकीचा विचार करणारे, कुठलाही नवा पदार्थ चिवडत चिवडत संशयी वृत्तीने खाणारे, कर्मकांड करणारे, स्वप्ने पडल्यावर उठून तसे तसे कर्मकांड करणारे, भीत.......मला का अशा लोकांच्या सहवासात रहावे लागते......! देवा! कधी वाटते की मी निश्चित पणे याहून अधिक वर्थ होते ! कशा यांच्या समजुती! मुलांना काही काम सांगायला नको...मुलींनी केलेले चाले्ल. सतत सूचना, निगेटिव्हीटी, ....

Tuesday, April 01, 2014

नित्यक्रम - ३


सध्या मीना प्रभुंचं ’चिनी माती’ वाचते आहे. अफाटच सुंदर पुस्तक आहे. तसंही चीन बद्दल मला पहिलेपासूनच विलक्षण आकर्षण,ओढ आणि कुतूहल आहे. आणि मीनाताईंनी अगदी बारिक सारीक वर्णनांनी चीन आपल्या डोळ्यांपुढे साकारला आहे. चीन...भरताला जरबेत ठेवणारा आपल्यासारखाच आपला प्राचीन शेजारी...काही बाबतीत आपल्या सारखाच...लोकसंख्या, भूगोल आणि संस्कृतीच्या विपुल छायेत. पण बर्यााच बाबतीत आपल्या पेक्षा भिन्न....स्वयंशिस्त, देशप्रेम, काटेकोरपणा, स्वच्छता....किती दाखले द्यावेत! इतक्या मोठ्या भौगोलीक विस्ताराला आव्हान न मानता संधी मानून विकास करणारा, कठोर कम्युनिस्ट तत्वांची कास धरुन प्रगती करणारा एक फोकस्ड देश! मला एकदा जायचंच आहे चायना ला. कनक रजत ची नुसती धम्माल चालली आहे. मनसोक्त टीव्ही, नेट आणि गेम्स....आईसक्रीम्स (एकाला बटरस्कॉच व एकाला चॉकलेट.....आपापली वगळून दुसर्‍या कुठल्याही फ्लेवर ला हात लावणार नाहीत...अगदी व्रतस्थ असल्यासारखी ! द्वाड कार्टी! एकाला चायनीज प्रिय आणि एकाला पिझा, बर्गर. एकाला बटाट्याची रस्सा भाजी तर एकाला काचर्‍या. एकाला साबुदाणा खिचडी आणि एकाला थालिपीठ.....घर म्हणजे काय हॉटेल आहे का? ऑर्डर द्यायला? आणि मी कोण? वेटर? मला वाटतं मी कोण हा आदी प्रश्न अगदी सहजतेने सुटला आहे माझ्या बाबतीत!