Tuesday, April 29, 2008

शाळा - मिलींद बोकील

नुकतंच मिलिंद बोकील यांचं 'शाळा' पुस्तक वाचलं...काय सुरेख वर्णन आहे! त्यांच्या भाषेत सांगायचं तर...सरस!

नववीतील काही मुलं,जी एका जणाच्या शाळेच्या वाटेवर असलेल्या बांधकाम सुरू असलेल्या अर्धवट इमारतीत जमून येणार्‍या जाणार्‍यांची छेड काढत असतात, त्यांचे संवाद, भाषा, भिती....
शिरोडकर ला भेटायसाठी त्याने टाकलेली पावलं...तिचं बारकाईने केलेलं वर्णन...
घरची कडक शिस्त, आणि 'सु‍र्‍या' चे भानगडबाज, बेफ़िकीर विश्व यात चाललेली त्याची ओढाताण..त्यातून 'शिरोड्कर' विषयी वाटणारे प्रेम-आकर्षण....खूप तरलतेने, प्रवाहीपणे, मार्दवाने लिहीले आहे.


१२ ते १५ या पौगंडावस्थेतिल मुलांचे विश्व, त्यांचे भावनिक चढ उतार, त्यांची भाषा, समजूती...अतिशय सुरेख रितीने चित्रीत केले आहे.

"मी थोड्यावेळ तसाच सुममध्ये बसून राहीलो....सुममध्ये बसलं की मुलींना कुणी पाहतंय हे कळत नाही...".....अशी भारी वाक्यं...

खरंच शाळेत गेलेल्या प्रत्येकाने वाचायला हवे असे पुस्तक आहे. म्हणजे बरंच नॉस्टॅलजिक व्हायला होतं! खूप साधर्म्य स्थळे आढळतात.
विशेषतः कॅंप चे वर्णन तर अगदी सरस उतरले आहे. आणि भाषेचा फ़्लो तर किती उत्तम! कुठे म्हणून अडखळायला होत नाही.


आता मिलींद बोकील यांना 'शिरोडकर' च्या बाजूने पुस्तक लिहा अशी विनंती करायला हवी.

Friday, April 18, 2008

लेखना मागची प्रेरणा

आपण का लिहीतो......
मेघनाने हा प्रश्न विचारला तिच्या खो खो च्या खेळात, तेव्हा पासून विचार करतेय... का लिहावसं वाटतं आपल्याला?
ही ऊर्मी तशी फार आधीपासूनचीच...कॉलेज च्या वार्षिकांकातले लेखन, त्याही आधी निबंध स्पर्धांमध्ये मिळवलेली बक्षिसं, गझलांची विश्लेषणं आणि मैत्रिणींना भरभरून लिहीलेली पत्रं...पावसाच्या धारांबरोबर लिहीलेल्या अनेक कविता..पण मग हातातून धागा सुटत जावा तशी हीही सुटत गेली कधीतरी...परवा परवा ब्लॉग सापडेपर्यंत...

काय असते ती ऊर्मी? मनातल्या भावना, विचार अधिकाधिक समर्पकतेने व्यक्त करता यावेत ही असोशी? की भाषेच्या लालीत्यपूर्ण अलंकारांचा साज चढविण्याचा निव्वळ अट्टाहास? की आपल्याला जे वाटते ते इतरांपर्यंत पोहोचविण्याचा खटाटोप?

काही असो...लेखन आनंद देते मात्र. निखळ. काही सुचत नसते तेव्हा थोडी हूरहूरही! कुणाचे उद्देश निरनिराळे असू शकतात, पण मला तर ते फक्त माझ्या स्वतः च्या आनंदासाठी मीच लावलले एक झाड आहे असे वाटते. आणि लेखन म्हणजे तरी काय...वाचनाचे पडलेले प्रतिबिंबच ना? खूपदा तर मला सुंदर काही वाचायला मिळालं की त्याची दाद देण्यासाठी लिहावसं वाटतं! लोक इतकं देखणं लोभावणारं कसं काय लिहू शकतात?

इतकी समृद्ध आपली मराठी, तिचे इतके झळाळते पैलू आणि तिला लाभलेले अनेक गुणवंत लेखक व कवी..किती आनंद आहे आयुष्यात!

मनातून लडी उलगडत जातात.. एकावर एक.., शब्दांचा साज लेवून कविता पुढ्यात ठाकते... निर्मीतीचा आनंद तरी याहून वेगळा काय असतो?

कुणासाठी म्हणून नसतेच ती अनिवार ऊर्मी ... ते फक्त जीवनाच्या एखाद्या भावलेल्या रंगाचे व्यक्त रुप असते...रंग कोणताही असो...दुःखाचा, आनंदाचा, उल्हासाचा...लिहून झाल्यावर मिळणार्‍या तृप्तीतच तिचे सार्थक असते.

Wednesday, April 09, 2008

जी ए - प्रतिभेचे दुसरे नाव

आत्ता जी एं चं "हिरवे रावे" पुन्हा एकदा वाचलं. किती अप्रतिम शब्दकळा, किती पॉवर आहे त्यांच्या लेखनात हे पुन्हा एकदा पटलं...स्वतःलाच!

छोटीशीच वाक्यं...पण सारा संदर्भ सामावलेला...अतिशय अर्थगर्भ, पूर्ण!

मला सगळ्यात आवडते ती कथा म्हणजे "बाधा"...मन सुन्न करणारा अनुभव...विषण्णता अशी दाटत जाते मनभर...

फक्त जाणीवेच्या अलवार पातळीवर असणारी प्रेमाची एक अबोध, हुरहुरती भावना मनाशी जपणारी त्यातली रमा, तिचे भाबडे विश्व, मनातून कधी ओठांवरही न आलेल्या तिच्या इच्छा, मनाची अनाकलनीय आंदोलनं आणि त्यातून तिचा डोहाच्या खोल पात्रात निसटत गेलेला प्रवास..
सगळेच विलक्षण सामर्थ्याने, सुंदरतेने पाकळी पाकळी विस्तारावी तसे फुलवत नेणारे जी एंचे लेखन...अहा!

साहित्यातले नोबेल मिळावे अशा त्यांच्या कथा आहेत... इतकी सजग, तरल अनुभूती असणारा आणि वाचकांनाही स्वतः बरोबर ती देणारा लेखक ..विरळा आणि म्हणूनच श्रेष्ठही.

त्यांच्या प्रतिभेला त्रिवार कुर्निसात!