Thursday, March 22, 2007

वॉटर

बहुचर्चित वॉटर सिनेमा बघितला. त्यातल्या तरलते विषयी, सहज फ़ुलत जाणार्‍या, शब्दांमध्ये फ़ार अडकून न पडता प्रवाही असणार्‍या पटकथे विषयी मला काही म्हणायचे नाही...पण मूळातला विषयच जरा एकांगी पणे मांडलेला वाटतो. त्यामुळे भारतात आजही विधवांना दिल्या जाणार्‍या वागणूकी विषयी गैर समज होण्याची जास्त शक्यता आहे. (किंवा तो तसा व्हावा असाच प्रयत्न आहे.)
एखाद्या संस्कृतीच्या, तत्वाच्या, प्रणालीच्या महानते बरोबरच काही त्रुटि, कमतरता या असतातच...त्यांना किती उदात्त करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
नाहीतर अनेक प्रसंगां मध्ये हिंदू धर्माने स्त्रियांना दिलेला मान सन्मान असा डावलला गेला नसता.
आणि विधवा तरी काय सगळ्या च अशा कमनशिबी थोडीच होत्या!
महाराष्ट्रात तर किती उज्ज्वल परंपरा आहे. माधव राव पेशव्यांच्या आई गोपिका बाईंपासून अनेक कर्तबगार स्त्रिया येथे होऊन गेल्या.

मान्य आहे की मूठभर का होइना, पण स्त्रियांना असा वनवास नशिबी आला...जिथून कुठलंच बाहेरचं दार उघडत नाही असा बंदिवास आयुष्य भर... तेही न केलेल्या चुकी साठी भोगावा लागला....
पण काळोखाला असलेली उजेडाची किनार दुर्लक्षून कसं चालेल?

अर्थात चित्रपटाला असणारी सगळी परिमाणं लावली तरी हा एक सुरेख चित्रपट आहे.
शेवटचा गांधींचा स्पीच जरा irrelevant वाटतो. त्यातून काहीच अभिप्रेत होत नाही.

सरला ने छुईया फ़ार गोड रंगविली आहे. तिच्या साठी हा सिनेमा बघायलाच हवा. आणि आपण असे नाही आहोत हे जगाला ओरडून सांगण्या साठी ही बघायलाच हवा

6 comments:

HAREKRISHNAJI said...

जे आहे ते आहे

मन कस्तुरी रे.. said...

हरेक्रिश्नाजी,

ते तर झालंच!
इतक्या कमी शब्दां मध्ये इतकी समर्पक प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार.
पण आता असं नाही हे तरी कळायला हवं ना?
चित्रपटाच्या शेवटी एक नोट येते - According to 2001 census, there are still thousands of widows in India who are living such life - असं काहीसं सांगणारी....त्याबद्दल काय?

Tulip said...

पण आता असं नाही हे तरी कळायला हवं ना?>>>

अश्विनी मला निटंस कळलं नाही तुला काय म्हणायचय. चित्रपटाच्या शेवटी दाखवलेली नोट खोटी आहे असं म्हणायचं आहे का तुला? २/३ वर्षांपूर्वीच्या एका दिवाळी अंकामधे युनिक फ़िचर्सनी वृंदावनमधल्या नातेवाईकांनी सोडून दिलेल्या खरंतर टाकून दिलेल्याच म्हणायचं, आजारी, वृद्ध, निराधार विधवांची अजुनही कशी पांजरपोळातल्याप्रमाणे ’व्यवस्था’ ठेवली जाते त्याचं भयानक वर्णन केलं होतं. वॉटर मी अजुन पाहिला नाही. पण मला वाटतं हरेकृष्ण्जी म्हणाले ते खरंच समर्पक आहे. ’जे आहे ते आहे’. आता ते अशा तर्हेने चित्रपटाच्या, कलेच्या माध्यमातून जगाच्या पुढे आणण्याची खरंच काही आवश्यकता असते का हा कायमच वादाचा मुद्दा राहिलेला आहे.
अगदी मदर ईंडिया आणि सत्यजित रेंच्या फ़िल्म्सवर सुद्धा कायम अशी टीका होत आलेली होती की भारतातील फक्त अशी दारिद्र्य आणि हलाखीच मिळते का ह्यांना जगासमोर आणायला? खासदार पदावर असताना नरगिसनेही असे चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवांमधून दाखवले जातात ह्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
माझं व्यक्तिगत मत आहे की कां दाखवू नये? जर आभासी, चकचकीत जोहर चोप्रा चित्रपटांतला भारत सुद्धा जर जेमतेम १० टक्के लोकांच्या नशिबात असेल आणि तरीही तो चित्रपटांतून दिसणे सर्वमान्य असेल तर जे खरं आहे, वास्तव आहे ते कलेच्या माध्यमातून मांडले तर का खुपावे? जखमेवर जेव्हा बोट ठेवले जाते तेव्हाच ती चरचरुन झोंबते आणि निदान चार बघ्यांच्या नजरेत येऊन तिच्यावर उपाय होण्याची शक्यता वाढते . नाहीतर ’मला काय त्याचे’ म्हणून अशी वास्तवे नजरेआडच करण्याचाच आपल्या सर्वांचाच कल असतो.

A woman from India said...

आता असं नाही. सांगू या जगाला ओरडून. होय, आता परिस्थिती फार बदलली आहे - विज्ञानाची फार प्रगती झाल्यामुळे आपण या समस्येवर चांगलाच उपाय शोधून काढला आहे.
मुलींना जन्मालाच घातलं नाही तर त्या विधवाच होणार नाहीत, हो की नाही?
http://kasakaay.blogspot.com/2006/01/blog-post.html#links

HAREKRISHNAJI said...

भ्रुणहत्त्या हे खरच किती कटु सत्य आहे. मला मुलगा झाला तेव्हा मला व माझ्या बायकोला वाइट वाटले आम्हाला मुलगी हवी होती. पुतणी झाली तेव्हातर आनंदने नाचलो.

HAREKRISHNAJI said...

nothing new ?