Saturday, September 19, 2020

भाग्यरेखा....

:
कोणाच्या भाग्यरेखा कोणाला कुठे घेऊन जातील.. काही सांगता येत नाही! निसर्गात बरोबर-चूक असे काही नसते. फक्त “असते”!.. त्याला बरोबर-चूक हा चांदी-वर्ख आपण चढवतो. आता पहाना, नदीने समुद्रात गेलेच पाहिजे. त्यात तिची परिपूर्ती. तसं नाही झालं तर चक्रच थांबेल. एक छोटी नदी मोठ्या समुद्राला नाही मिळाली म्हणजे एक लांब साखळी तुटली की खळकन.... पण अशाही काही आहेत ज्या नाहीच मिळत समुद्राला.. Okavango नदी...Angola, Namibia आणि Botswana तून वाहणारी.. संपन्न ...१५०० किमी पेक्षा लांब..आणि ती बोत्स्वानात पोचल्यावर नुसतीच धावधाव करून पसरते.. पूर्वी, म्हणजे हजारो वर्षापूर्वी तिथे एक सरोवर होते, मग ते आटले पण तरी ही तिच्या जुन्या डगरीने तिथेच जाऊन पोहोचते आणि मग सगळ्या पाण्याची वाफ होते... जगभर अशा खूप नद्या आहेत , ज्यांचा डेल्टा नाहीच मिळत समुद्राला. समुद्राला नाही मिळाली तर नदी "धराशायी" होते... किती सुंदर शब्द आहे, धराशायी...पृथ्वीवर निजणारी.. आफ्रिकेतली सगळ्यात लांब नदी नायगर..हिची बहिण बनी..ती सहारा वाळवंटाकडे अगदी आपली वाट वाकडी करून जाते... आणि बनवते "मसिना"!.. वाळवंटाजवळ एक हिरवा, पूर येणारा, भात वाढवणारा आणि मासेमारी करणारा प्रदेश! बनी नाही मिळत समुद्राला ! आपल्याकडे तर रेलचेल आहे . कच्छ चे रण .. इथे पूर्वी अरबी समुद्रच होता...खूप पावसाळ्यात आजदेखील सगळं वाळवंट पाण्याने भरून जातं. इथे एक नदी येते लगबगीने, पण मग तिची गोची होते... समुद्र कुठेय? शोधताना तिचे पाणी अनेक दिशांनी धावते आणि पसरते इथेच.. ही लुणी नदी..कच्छच्या रणात विरघळणारी.. तशीच रुपेन, सरस्वती आणि बनास..या लिटल रणमध्ये अदृश्य होतात...प्रत्येकीची आपल वेगळी कथा. प्रत्येक जण झंजावाती पूर घेऊन येते..वाळवंट फुलतं नुसतं.... असो. सांगायचं काय होत ते विसरलेच.... खरं तर सांगायचं फारसं काही नसतं, एक-दोन तारा जोडायच्या असतात कधी, कधी चुकार प्रतिबिंब बघायचं असतं, चाफ्याचं एखादं फुल उचलून केसात खोचायचं असतं, ओंजळभर हसायचं, पापणीभर पाणी साठवायचं असतं, एखादी अर्थहीन-absurd गोष्ट सांगायची-ऐकायची असते. मुद्दा असा नसतोच बहुतेक... पुढे खूप दिवस पुरतं हे..पण कशाला हे सगळं?...... धराशायी होणं वाईट नाहीये.. जीव तोडून चाललेल्या प्रत्येक वाटेला पुढे समुद्र लागेलच असं काही नाही. ही जाण महत्वाची! कधी सरोवर लागेल, कधी माळरान, कधी अख्खं वाळवंट.. ठीक आहे ... वाळवंटात देखील पूर येतात. नदी अगदी हवेत विरली तरी आपलं कर्तव्य विसरत नाही....परत बरसतेच. प्रत्येकाच्या मनात अशी एखादी नदी असते..... . शांत रात्री तिची साद ऐकू येते का बघा.. तिला खळबळू देणं, आवर घालणं, उन्मुक्त बेभान वाहू देणं अथवा शांत मधाच्या धारेसारखं नीरवतेने ओतत राहणं...सगळं आपल्याच तर हाती असतं............ आधी छोटा अल्लड प्रवाह, मग लहान षोडषा नदी, मग उपनद्या येउन मिळत गेल्याने विस्तारलेली पोक्त नदी..आणि शेवटी समुद्रात जाऊन मिळणे....... स्त्रीचं आयुष्य असो वा नदीचं....सगळ्यांचा प्रवास एका ठरलेल्या आखलेल्या मार्गावरुनच व्हावा असा काही नियम तर नाहीये ना?

3 comments:

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.
मन कस्तुरी रे.. said...

Hi .. :-) Yes.. Off Course I remember you.....
Kasa ahes?

Hope...all well!

I could not find your blog..... So could not see your YouTube channel too.....


मन कस्तुरी रे.. said...

Please send the link of your blog again.....