हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ
भालचंद्र नेमाडे यांचे गाजलेले एक अतिशय प्रभावी पुस्तक वाचनात आले. हिंदू.
आपली जगण्याची, धर्माकडे बघण्याची व्याख्या बदलून टाकण्याचे सामर्थ्य असणारे, अतिशय महत्वाचे पुस्तक. विशेषतः आजच्या पिढीला निदान मनातली गुंतागुंत कुठेतरी शब्दबद्ध केल्याचे समाधान देणारे, कुठलाही अभिनिवेश न बाळगता नेमके वर्मावर बोट ठेवणारे, हिंदू धर्मातल्या अनेक फोल समजुती, रुढी, परंपरा यांचे विच्छेदन करणारे आणि थेट भिडणारे पुस्तक !
कोसला वाचल्यानंतर नेमाडें बद्दल एक ’थोर’ आदर मनात भरुन राहीला होता. इतकी आरस्पानी भाषा, जणू समोर घडतंय असं चित्रदर्शी वर्णन, रेशमाच्या लडींप्रमाणे एकातून एक उलगडत जाणार्या घटना व प्रसंग, आणि कुठल्याही पानावरुन पुस्तक वाचायला सुरु केलं तरी लागत जाणारी संगती...
हिंदू ही कुणा एका खंडेरावाची – एकेकाळच्या तालेवार पाटील घराण्यातल्या मुलाची कथा आहे.
नदीच्या प्रवाहाप्रमाणे खालीवर वाहत कथा पुढे जाते. काळाची चौकटीची फारशी पर्वा न करता तो त्याला आलेले घरचे-दारचे अनुभव अतिशय ओघवत्या, ग्रामिण बोलीत सांगत जातो...त्यात काही स्वगतं असतात, काही आयाबायांचे पारंपारीक उद्गार असतात आणि काही उप कथानकं...कथेला पुढे नेणारी. या विस्कळीत तुकड्य़ा तुकड्यांच्या जोडणीतूनच पूर्ण कथानक आकाराला येते.
आर्यांच्या आगमनाने सिंधुतीरावर एक नवीन संस्कृती उदयास आली. अनेक शतकांपूर्वी विकसित झालेल्या या हिंदू संस्कृतीने जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करीत संपूर्ण भारतीय उपखंडात आपली पाळेमुळे रुजवली. तिने सतत प्रवाही राहून वेगवेगळ्या सामाजिक स्तरांना आपलंसं करुन घेतलं व नवनवीन संकल्पनांचा अंगीकार केला. मूळ तत्व तेच राहीले तरी नवीन विचारांचा स्वीकार केल्याने तिला एक बहुआयामी, दाट -समृद्ध पोत मिळाला ज्याचा परिणाम सामाजिक प्रथा व व्यक्तीगत नाते संबंधांवर होत राहीला.
आर्यांच्या आगमनाने सिंधुतीरावर एक नवीन संस्कृती उदयास आली. अनेक शतकांपूर्वी विकसित झालेल्या या हिंदू संस्कृतीने जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करीत संपूर्ण भारतीय उपखंडात आपली पाळेमुळे रुजवली. तिने सतत प्रवाही राहून वेगवेगळ्या सामाजिक स्तरांना आपलंसं करुन घेतलं व नवनवीन संकल्पनांचा अंगीकार केला. मूळ तत्व तेच राहीले तरी नवीन विचारांचा स्वीकार केल्याने तिला एक बहुआयामी, दाट -समृद्ध पोत मिळाला ज्याचा परिणाम सामाजिक प्रथा व व्यक्तीगत नाते संबंधांवर होत राहीला.
आजही या संस्कृतीचा सार्वत्रिक परिणाम, तिच्या जमेच्या व दुबळ्या बाजूंसकट आपल्यावर होत असतो.
आपण समाजात राहतांना सतत बर्या वाईटाला पारखत, ’अपग्रेड’ होण्याची लढाई लढत असतो. ही
समृद्ध करणारी लढाई हा ’हिंदू’ चा गाभा आहे. ही कादंबरी जीवनातील भव्यता आणि अनेकविधता
एखाद्या महाकाव्याच्या धर्तीवर साकारते. वाचनाचा अतिशय आनंद देणारे हे पुस्तक तुम्हाला
स्वतःचाच नव्याने धांडोळा घ्यायला उद्युक्त करते.
समाजात वावरताना ’धार्मिकता’ अनेक अंगांनी सामोरी येते. स्त्रिया धार्मिक असतात, पुरूष धार्मिक असतात, लहान मुले-मुलीही धार्मिक असतात. श्रद्धा फक्त गरीब आणि ग्रामीण भागातल्याच लोकांच्या असतात असे नाही. नावाजलेल्या संस्थेत शिकलेल्या आणि सामाजिक परिवर्तनाच्या कामात रमणा-या लोकांच्याही श्रद्धा असतात. श्रद्धाच नाही तर देव भोळेपण . काही पुराणातील देवांना भजतात तर काही ऐतिहासिक माणसांना देवासमान मानतात. काहींनी माणसांना जिवंतपणीच देवत्व बहाल केलेले असते. प्रत्येकाची देवता वेगळी, प्रत्येकाचे श्रद्धास्थान वेगळे आणि प्रत्येकाची आपल्याकडून असणारी अपेक्षाही वेगळीच!
काहींची धार्मिकता सहिष्णू असते, तर अनेकांची आक्रमक; काहींची सौम्य असते, तर काहींची धगधगती; काहींची भयातून आलेली असते तर काहींची समजण्यातून. शिवाय व्यक्तीची धार्मिकता आणि सामूहिक धार्मिकता यांतही एक सूक्ष्म पण सतत जाणवणारा भेद असतो.
काहींची धार्मिकता सहिष्णू असते, तर अनेकांची आक्रमक; काहींची सौम्य असते, तर काहींची धगधगती; काहींची भयातून आलेली असते तर काहींची समजण्यातून. शिवाय व्यक्तीची धार्मिकता आणि सामूहिक धार्मिकता यांतही एक सूक्ष्म पण सतत जाणवणारा भेद असतो.
हिंदू हा धर्म नाही ती एक जीवन शैली आहे; असे संघ वारंवार सांगत असतो. हिंदू धर्माला कर्मकांडांचे, स्पृष्यास्पृष्यतेचे लांछन नेहमीच लागलेले आहे. गुंतागुंतीचा , अनेक ताणतणाव व वाद- प्रतिवाद असणारा विषय म्हणाजे धर्म व धार्मिकता.
हिंदू या सर्व पैलूंवर झक्क प्रकाश टाकत पुढे पुढे जाते.
हिंदू या सर्व पैलूंवर झक्क प्रकाश टाकत पुढे पुढे जाते.
कादंबरीची सुरुवात होते ती खंडेराव या पाकिस्तानात हडप्पा- मोहेंजोदारो अथवा तत्सम संस्कृतीच्या उत्खनन - अभ्यासासाठी आलेल्या आर्किऑलोजिस्ट च्या स्वगताने. तो मूळचा खान्देशातील मोरगाव या आडगावच्या पाटलाचा मुलगा. शिकलेला, शहरात राहून सुधारलेला व घरच्या मोठ्या गोतावळ्याचा लाडका.
सगळ्यांच्या आशा अपेक्षा याच्या भोवती. अडाणी स्त्रिया, बहिणी व आई- आजी यांच्यात मोठा झालेला खंडेराव. बहिणींना दिली जाणारी दुय्यम वागणूक, माहेरी आलेल्या आत्याची घालमेल, बहिणीकडे कायमच आश्रयाला आलेली याची मावशी व तिची मुलगी, आजी –आईचे झगडे, सासुरवाशिणी, गावकरी, शेती, पाणी- दुष्काळ........
---आयुष्याशीच असे झटके घेत आयुष्य पुढे जात राहतं.
याची त्रिवेणी आत्या लहानपणीच देवाला वाहिलेली. मूल जगत नाही म्हणून नवस बोललेला. ती कुठेतरी अफगाणिस्तानात असल्याचा खंडूला पत्ता लागतो. तिचा शोध घेत घेत तो पाकिस्तानातील अनेक हिंदू मंदिरं व महानुभावी आश्रम पालथे घालतो. ती काही भेटत नाही. जोगीण होण्यापूर्वीचा तिचा सुंदर कोवळा चेहेरा त्याच्या डोळ्यासमोर येत राहतो.
स्त्रिया या भावनिक असतात तशाच खमक्याही. प्रथा, परंपरा पुढे नेण्यात, किंबहुना धर्म जगविण्यात मुख्य सहभाग हा स्त्रियांचाच असतो. हिंदू मधेही आपल्याला अशा अनेक खमक्या, पक्क्या स्त्रिया भेटतात. स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधणार्या, कृती करणार्या व त्याच्या परिणामांना सामोरं जाणार्या!
कादंबरीला एक साच्याची अशी बांधीव कहाणी नाही. ती कधी खंडेरावाच्या मनातील स्वगतं, तर कधी निवेदनात्मक रुपात पुढे जाते. घटनांना काळाची चौकट नाही...आठवणी कशा ओघवत्या येतात...तसा काहीसा आकृतीबंध आहे.
पण कादंबरी वाचतांना प्रत्येक क्षणी आतून आतून जोडल्या गेल्याची जाणीव होत राहते. अरे! हे तर आपल्या आजूबाजूला घडलेलं...किंवा आपल्याच बाबतीत घडलेलं आहे...असं वाटत राहतं. भारतात राहतांना हिंदू धर्म असा तुमच्या अंगावर चहुबाजूंनी येतच असतो.....तुम्ही त्यातून अलिप्त राहूच शकत नाही. रक्ताच्या थेंबाथेंबात, मनाच्या जडण घडणीत, सवयींमधे, विचारांत, समोरच्या व्यक्तीच्या विचारांत......तो आपल्या सोबत असतोच...अविभाज्यपणे.
नेमाडे एक विशाल असा काळाचा , संस्कृतीचा व भौगोलीक पट आपल्यासमोर उघडतात. ते इस्लामिक, बुद्धिस्ट, जैन, वारकरी, महानुभावी, शहरी, ग्रामीण, पाकिस्तानी, सीख, स्त्रीवादी, पितृसत्ताक, धार्मिक, ज्ञान, शेतीवर आधारीत संस्कृती...अशा विविध अंगांना स्पर्श करीत पुढे जातात. त्यांचा पुरातत्ववाद हा जीवनातील सर्व पैलू जसे जाती, व्यक्ती, जागा व घटना यांचा सुरेख मेळ घालत भारतीय उपखंडातील प्राचीन संस्कृतींचे पापुद्रे उलगडत जातो.
खंडेराव विट्ठल हा आपल्या दहा हजार वर्षे जुन्या असलेल्या शेतीच्या परंपरेचा पाईक आहे. तो आपल्या आजूबाजूच्या विश्वाला आपल्या ’देशी’ वास्तव- भानाने जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. या सर्व गोष्टी-घटना जाणून घेता घेता त्याच्या डोक्यात जी गुंतागुंत निर्माण होते, तिचा तो त्याच्या परीने अन्वयार्थ काढतो आणि ही ’अडगळच’ त्याला बहुसांस्कृतिक अशा बाह्य जगाशी कनेक्ट व्हायला सहायभूत ठरते.
तुम्ही धार्मिक असा अथवा नसा...किंवा आस्तिक असा अथवा नास्तिक... मोठी सेलेब्रिटी असा अथवा सामान्य गृहिणी, स्कॉलर विद्यार्थी असा अथवा मंदिरातला सेवेकरी.......हिंदुत्वाची ही घट्ट वीण तुमच्या भोवती पीळ पाडत जातेच.
लेखक कुठेही काय वाईट अथवा चांगले...काय चूक काय बरोबर....असा निकाल देतच नाही...तो फक्त हिंदुत्वाचे अनेकानेक विलोभनीय पैलू आपल्यासमोर मांडत जातो.....रंगीत, कॅलिडोस्कोपिक......आणि बेरंग झालेले, निर्दय, दुःखी..सुद्धा.
तुम्ही काय घ्यायचे, त्यातून काय अन्वय साधायचा व त्याचा आपले आयुष्य अधिक समृद्ध व अर्थपूर्ण होण्यासाठी कसा वापर करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न!