आपण का लिहीतो......
मेघनाने हा प्रश्न विचारल्या पासून जरा विचार केला.. तोवर तर असं काही सुचलंच नव्हतं.
खरेच, मी विचार करतेय कधीपासून! का लिहावसं वाटतं आपल्याला?
ही उर्मी तशी फार आधीपासूनचीच...कॉलेज च्या वार्षिकांकातले लेखन, त्याही आधी निबंध स्पर्धांमध्ये मिळवलेली बक्षिसं, आणि मैत्रिणींना भरभरून लिहीलेली पत्रं...
पावसाच्या धारांबरोबर लिहीलेल्या अनेक कविता..पण मग हातातून धागा सुटत जावा तशी हीही सुटत गेली कधीतरी...परवा परवा ब्लॉग सापडेपर्यंत...
काय असते ती उर्मी? मनातल्या भावना, विचार अधिकाधिक समर्पकतेने व्यक्त करता यावेत ही असोशी? की भाषेच्या लालीत्यपूर्ण अलंकारांचा साज चढविण्याचा निव्वळ अट्टाहास?
की आपल्याला जे वाटते ते इतरांपर्यंत पोहोचविण्याचा खटाटोप?
काही असो...लेखन आनंद देते मात्र. निखळ. काही सुचत नसते तेव्हा थोडी हूरहूरही! कुणाचे उद्देश निरनिराळे असू शकतात, पण मला तर ते फक्त माझ्या स्वतः च्या आनंदासाठी मीच लावलले एक झाड आहे असे वाटते. आणि लेखन म्हणजे तरी काय...वाचनाचे पडलेले प्रतिबिंबच ना? खूपदा तर मला सुंदर काही वाचायला मिळालं की त्याची दाद देण्यासाठी लिहावसं वाटतं! लोक इतकं देखणं, लोभावणारं कसं काय लिहू शकतात?
इतकी समृद्ध आपली मराठी, तिचे इतके झळाळते पैलू आणि तिला लाभलेले अनेक गुणवंत लेखक व कवी..किती आनंद आहे आयुष्यात!
अंतःप्रेरणा म्हणतात नं तशी. मनातून लडी उलगडत जातात..एकावर एक..शब्दांचे साज लेवून कविता पुढ्यात ठाकते, निर्मीतीचा आनंद याहून काय वेगळा असतो?
3 comments:
अतिशय गहिरं, खोल, आर्द्र लिखाण! कैक दिवसांची तहान भागल्या सारखं वाटलं....
-माधव
khup chhan lihile aahe !! mi blog lihite te mala aanand milnyasathi, purvi kadhi kahi lihile nahi, kahi patre lihili hoti, pan ithe US madhe aalyavar bolayla kuni nahi, mag aapanach aaplyashi bolayche aani te vahit utarun kadhayche, blog hi aapli diary aste nahi ka? aani ti kuni vachli aani protsahan dile ki utsah yeto aani aanandhi milto, kadhitari aaple likhan aapanach vachle tarihi chhan vatate na? pustake tar aaplyala eka navin vishwatach gheoon jatat.
tumcha blog aavadala mala ! chhan aahe !
रोहिणी ताई.....
थॅंक यू
Post a Comment