Tuesday, March 25, 2014

रोजनिशी २


हं..माझा ‘नियमितपणा’ म्हणजे जर महिनाभरात एकदा असेल तर कठीण आहे...पण नसल्या पेक्षा हे बरे नाही का?  कनक - रजत च्या एक्झाम्स आटोपल्या नं आज! हुश्श...! पेपर्स तर यांचे ’भारीच’ जातात....डोकं आपलं ’हलकं’ होतं ना पण! आदिही आला परवा परत...येतांना काय काय आणलंन...मी कितीदा सांगते की नको रे ते टॉब्लेरॊन, गॅजेट्स, बेल्जियम चोकोलेट्स, पर्फ्युम्स , शांपूज, झुळझुळीत टी शर्ट्स असलं आणूस...मुलं जाम मिस्युज करतात..पण ऐकत नाहीच! आणि आल्यावर फर्माईश काय तर थालिपीठ, दही, मिरचीचं लोणचं आणि साईडला तळलेला पापड.....मुलांना नकोच हे...त्यांना बर्गर आणि पिझा! आईंना खिचडी-तूप आणि मला...सर्व! मला असं हे टिपीकल गृहिणी स्वगत इथे लिहायचंच नाही खरे तर ! माझ्यातल्या सर्जनशील, प्रातिभ ..(वगैरे वगैरे...)...स्व ला उमलवायचं आहे ना! तसे मला रंग खूप आवडतात..सगळे...प्रसन्न हिरवा, (मोरपंखी रंगाचं तर मला नाव सुद्धा खूप आवडतं) भडक लाल, सौम्य गुलाबी, झळाळता सोनेरी आणि सदाबहार जांभळा......पण होळी खेळायला मात्र आवडत नाही....रंग असे ओबडधोबड पणे माखल्यावर नाही चांगले दिसत माणसांच्या चेहेर्यारवर ..आणि विशेषतः बेभानपणे खिदळणार्याा, उन्मत्त, अनुचित तरुणाईवर... .त्याला चित्रकाराच्या कुंचल्यातून उतरणारी हळुवार भावुकताच पाहीजे....किंवा निसर्गाच्या ’डिफॉल्ट’ चित्र चौकटीची उत्कटता..फुलापानांची, डोंगर-दर्यां्ची आणि पाण्याच्या लहरी लहरींची..!

Sunday, March 02, 2014

लेखना मागची प्रेरणा......

आपण का लिहीतो......


मेघनाने हा प्रश्न विचारल्या पासून जरा विचार केला.. तोवर तर असं काही सुचलंच नव्हतं.

खरेच, मी विचार करतेय कधीपासून! का लिहावसं वाटतं आपल्याला?

ही उर्मी तशी फार आधीपासूनचीच...कॉलेज च्या वार्षिकांकातले लेखन, त्याही आधी निबंध स्पर्धांमध्ये मिळवलेली बक्षिसं, आणि मैत्रिणींना भरभरून लिहीलेली पत्रं...
पावसाच्या धारांबरोबर लिहीलेल्या अनेक कविता..पण मग हातातून धागा सुटत जावा तशी हीही सुटत गेली कधीतरी...परवा परवा ब्लॉग सापडेपर्यंत...

काय असते ती उर्मी? मनातल्या भावना, विचार अधिकाधिक समर्पकतेने व्यक्त करता यावेत ही असोशी? की भाषेच्या लालीत्यपूर्ण अलंकारांचा साज चढविण्याचा निव्वळ अट्टाहास?
की आपल्याला जे वाटते ते इतरांपर्यंत पोहोचविण्याचा खटाटोप?

काही असो...लेखन आनंद देते मात्र. निखळ. काही सुचत नसते तेव्हा थोडी हूरहूरही! कुणाचे उद्देश निरनिराळे असू शकतात, पण मला तर ते फक्त माझ्या स्वतः च्या आनंदासाठी मीच लावलले एक झाड आहे असे वाटते. आणि लेखन म्हणजे तरी काय...वाचनाचे पडलेले प्रतिबिंबच ना? खूपदा तर मला सुंदर काही वाचायला मिळालं की त्याची दाद देण्यासाठी लिहावसं वाटतं! लोक इतकं देखणं, लोभावणारं कसं काय लिहू शकतात?
इतकी समृद्ध आपली मराठी, तिचे इतके झळाळते पैलू आणि तिला लाभलेले अनेक गुणवंत लेखक व कवी..किती आनंद आहे आयुष्यात!


अंतःप्रेरणा म्हणतात नं तशी. मनातून लडी उलगडत जातात..एकावर एक..शब्दांचे साज लेवून कविता पुढ्यात ठाकते, निर्मीतीचा आनंद याहून काय वेगळा असतो?

Saturday, March 01, 2014

Memories...

२७-फेब्रु-१४ आजपासून नियमित पणे रोजनिशी लिहायचा विचार आहे. अर्थात विचार असला तरी तो अंमलात येईलच असे नाही...तरी पण बघूया. घरी कनक-रजत ची नेमचीच दाणादाण! जुळे असले तरी एक गुण काही सारखा नाही दोघांच्यात. एक मस्तीखोर, दांडगट आणि दुसरा शांत, गंभीर. एक सारखा आपला क्रिकेट नाहीतर गेम्स च्या विश्वात आणि एक म्युझिक, वाचन आणि आवराआवरी करणार! आणि आदित्य तर काय......मुलांहून मूल होणार त्यांच्यात. मीच आपली ओरडणारी आणि चिडणारी....! परवा विश्वास आला तर दोघेही त्यालाच चिकटून..मामा मामा करीत..... आतात दहावीतली ही पोरं...परीक्षा वगैरेचा अजिबातच काही विचार का नाही करावासा वाटत ह्यांना कोण जाणे! आदित्यचा यू एस टूर पण आताच यायचा होता....फायनल डील आहे म्हणे! गौरी च्या एका पुस्तकामधून (बहुतेक चंद्रिके गं सारीके गं) ह्यांची नावं ठेवली कनक आणि रजत! आई म्हणाल्या देखिल...हिंदी साईडर वाटतात म्हणून! तर...बंगाली शिकायचं मी फारच मनावर घेतलंय! शरद बाबूंची पुस्तके मोह घालतात...त्या आत्मसमर्पित नायिकांबद्दल असोशी वाटते....त्यांची प्यारी, चंद्रमुखी, राजलक्ष्मी...सगळ्याच उत्कट, सक्त, कणखर! आदि म्हणतो की तुझं एकेक वेगळंच चालतं. पण आपण तसे तर सगळेच असतो , नाही का...? प्रत्येकालाच वाटतं की दुसयाचं काहीतरी वेगळंच चालतं! कनक-रजत एकदाचे चांगले शिकून मार्गी लागू देत बाबा...म्हणजे मी तरी सुटले. विश्वास म्हणतो की त्यांना दादाकडे जपान ला पाठव. म्हणजे मंजूवहिनी च्या डोक्यावर ही दोघं...आणिक कशाला! तशीही ती संजिताने परस्पर जाऊन लग्न केल्याने आधीच डिस्टर्ब्ड आहे! दादाचं पण एक विचित्रच हं. आता आईला वाटणारच की तर म्हणे की त्यात काय....तिचा मार्ग तिने शोधला हे चांगलं की वाईट..? मंजूवहिनी आधीच जरा भावनाशील, आणि संजू म्हणजे तर तिचा अगदी ठेवा होता...मी पाहिलंय नं लहान पणा पासून. आय मीन संजिताच्या लहान पणा पासून! “कन SSS क..!! खालून अर्पितची नेहमीची आरोळी! आणि उत्तर देणार रजत! ..“आलो रे!”.....’आता कशाला जाताय रे बाहेर....?..जरा उघडा की पुस्तकं..!’ माझा केविलवाणा प्रयत्न! या सावित्री बाई पण अगदी वेळेवर गैरहजर राहणार... “वैनी, आता मामाच्या मयतीला नाय गेल तर लोक त्वांड तरी बघतील का ?” करा आता पोळ्या, यांचं ’पनीर चिली’, माझं सूप-सॅलड आणि आईंचं भरीत, वरण भात.....सगळा स्वयंपाक उरका, भाज्या आणा, क्लासेस मॅनेज करा, सिलिंडर वाल्याला सुट्टे द्या, कपडे धुवा, ब्रेकफास्ट ला रोज काय करावे यावर डोके खर्च करा, धोब्याकडे कपडे द्या-आणा, गाड्यांमध्ये पेट्रोल भरुन आणा....एक ना दोन! या सगळ्या गडबडीत मुलं गेलीच बाहेर. हं! जाऊदे..मी तरी काय मरमर करु यांच्या मागे! संध्याकाळी डोसे करायचे आहेत. आदित्यचा फोन नाही कालपासून. इथे असतांना कितीही हिडीस फिडीस केली तरी तो दूर गेला की उगीचच अपराधी वाटतं.....इतर नवर्यांाच्या मानाने बराच बराय तो! जुळ्यांच्या बाळंत पणात मी अगदी खचलेच होते....तेव्हा खरा मायेचा आधार होता तो आईंचा, आणि आदिचा पण! काय खस्ता काढल्याय त्याने....कनक जरा जास्तीच चिडचिडा, रडका होता. रजत खेळकर. तर कनक ला रात्र रात्र हातांवर फिरवायचा, रजत ला सिपर ने दूध पाजायचा आणि अंघोळ तर दोघांनाही ..एकदम! रादर, त्यात त्याचीही अंघोळ होऊन जायची आपोआप. मुलांना बाबा म्हणजे एकदम प्रिय! आई आहेच आपली...ओरडायला, ब्रेकफास्ट बनवायला, शाळेत पॅरेंटस मीट ला यायला, को ऑर्डिनेट करायला, हातात चहाचा कप द्यायला... पण हे असंच आहे...मला अजिबातच खोटं बोललेलं सहन नाही होत आणि यांना ते जनरल, कॅज्युअल वाटतं..म्हणजे असतात गोष्टी लहान सहानच..पण तरीही...का? मन एकदम मिटून जातं...वाटतं आपण काहीतरी चुकतो का?