Thursday, June 28, 2007

अद्न्यानातलं सुख

आत्ता 'मराठी चित्रपटातील गाणी' वर ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी' वाचलं!
मलाच नवल वाटलं...गेली कित्येक वर्षं मी हे गाणं ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तुच्छता मोठी....असंच म्हणत होते....मला असं वाटायचं देखिल की भेटीत 'तुच्छता' कशी काय असू शकेल बुवा..? पण म्हटलं की असेल काही...
तर आज तो फंडा क्लिअर झाला....


आपण किती गाढ अनभिद्न्यता बाळगत असतो!

Thursday, June 07, 2007

अभिरुची

स्वयंशिस्त, नीट्नेटकेपणा आणि एकूणच 'अभिजातता' ही अनुवंशिक असते असे मला वाटू लागले आहे.
म्हणजे काही लोकांची सामान्यतः बोलण्याची स्टाईल, एकूण व्यक्तिमत्व, आवडी, प्रतिक्रिया...सारंच कसं अगदी तोलून, पारखून, 'रिच' असतं........लूज टॉक्स नाहीत, फ़ालतू हसणे नाही, बोजड अपेक्षाही नाहीत.

आणि मला हेही पटलं आहे की आपण कितीही आव आणला तरी मूळ आडातच नाही तर पोहोर्‍यात येणार कुठून?
पण जेव्हा जमेल तेव्हा, अशा उच्च अभिरुचीच्या माणसांच्या सहवासात वेळ घालवून आपले आयुष्य थोडे समृद्ध तर करता येईल!

खरंच! आयुष्य जगण्याच्याही किती तर्‍हा असू शकतात नाही?
असं चाखत चाखत, रुचीने, सवडीने जगता यायला हवं. नव्हे, ते तसं जाणिवपूर्वक जगायला हवं...पण रोजच्या लढाईत आपण ती कोवळीक कधी हरवून बसतो तेही समजत नाही.

आणि दर वेळी सुखा आनंदाच्या, खर्च- खरेदीच्या क्षणी डोकं वर काढणारी ती खास मध्यमवर्गीय अपराधीपणाची जाणिव!
मूल्यं आणि तत्वं यांच्या कोषात लपेटलेली.....


पारंपारिकतेच्या अश्या विळख्यांमधून सुटणं किती अवघड आहे.

Wednesday, June 06, 2007

बंद झाली कवाडं...मन खुलता खुलेना

मला सद्ध्या राईटर्स ब्लॉक का काहिसं म्हणतात नं.....तो आलाय असं वाटू लागलं आहे.
त्यामुळे प्रतिभेचा प्रवाह काही केल्या खुलाच होत नाहिये.
ट्युलिप ने हे अगदी छान पणे मांडलं आहे.......कशावर लिहावं ....
......
जगजित चित्रा च्या हळुवार गझला, गुलाम अलिंचा आर्त पिळवटून टाकणारा सूर आणि बरंच काय काय आवडायचं.........
आता पडणारा पाऊस, गवतावरचे दवबिंदू किंवा पानगळीनंतरच्या पाचोळ्याचा चुर चूर आवाज...काही म्हणता काहीच मनाला भावत कसं नाही?

आयुष्य असं विरामचिन्हं विरहीत, प्लेन टेक्स्ट कसं काय झालं?

ग्रेस च्या कवितांचे अर्थ, जी एंच्या निर्व्याज गाभ्याच्या खोलवर भिडणार्‍या आर्त कथा, कायम आवडणारा चित्रपट 'सिलसिला', गौरी ची मुक्त अनिर्बंध स्त्री, सारं जग पिऊ पिऊ म्हणणारी कांक्शा........मनाचे हे सवंगडी आता पिंगा घालत नाहीत भोवती.......दुसरीच कसली तरी अपरिचीत जाणिव व्यापत जाते मन आताशा....
समर्पित केल्याची, (की आवाज हरविल्याची?)