Thursday, March 22, 2007

वॉटर

बहुचर्चित वॉटर सिनेमा बघितला. त्यातल्या तरलते विषयी, सहज फ़ुलत जाणार्‍या, शब्दांमध्ये फ़ार अडकून न पडता प्रवाही असणार्‍या पटकथे विषयी मला काही म्हणायचे नाही...पण मूळातला विषयच जरा एकांगी पणे मांडलेला वाटतो. त्यामुळे भारतात आजही विधवांना दिल्या जाणार्‍या वागणूकी विषयी गैर समज होण्याची जास्त शक्यता आहे. (किंवा तो तसा व्हावा असाच प्रयत्न आहे.)
एखाद्या संस्कृतीच्या, तत्वाच्या, प्रणालीच्या महानते बरोबरच काही त्रुटि, कमतरता या असतातच...त्यांना किती उदात्त करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
नाहीतर अनेक प्रसंगां मध्ये हिंदू धर्माने स्त्रियांना दिलेला मान सन्मान असा डावलला गेला नसता.
आणि विधवा तरी काय सगळ्या च अशा कमनशिबी थोडीच होत्या!
महाराष्ट्रात तर किती उज्ज्वल परंपरा आहे. माधव राव पेशव्यांच्या आई गोपिका बाईंपासून अनेक कर्तबगार स्त्रिया येथे होऊन गेल्या.

मान्य आहे की मूठभर का होइना, पण स्त्रियांना असा वनवास नशिबी आला...जिथून कुठलंच बाहेरचं दार उघडत नाही असा बंदिवास आयुष्य भर... तेही न केलेल्या चुकी साठी भोगावा लागला....
पण काळोखाला असलेली उजेडाची किनार दुर्लक्षून कसं चालेल?

अर्थात चित्रपटाला असणारी सगळी परिमाणं लावली तरी हा एक सुरेख चित्रपट आहे.
शेवटचा गांधींचा स्पीच जरा irrelevant वाटतो. त्यातून काहीच अभिप्रेत होत नाही.

सरला ने छुईया फ़ार गोड रंगविली आहे. तिच्या साठी हा सिनेमा बघायलाच हवा. आणि आपण असे नाही आहोत हे जगाला ओरडून सांगण्या साठी ही बघायलाच हवा

Wednesday, March 07, 2007

महिला दिन

आज जागतिक महिला दिन.........

अनेक शुभेच्छा!..........सगळ्या स्त्रियांना, कामकरी, कष्टकरी मोलकरणीपासून ते आय सी आय सी आय बॅंकेच्या डायरेक्टर पर्यंत, आय आय टी त ल्या गायत्री पासून संगीता च्या येसाबाई पर्यंत, सर्व मानिनिंचा मी गौरव करू इच्छिते!
स्त्री च्या सर्जनशीलतेला, सहनशक्तीला, तरलतेला, ...........उत्कट,आसूसून केलेल्या प्रितीला, पिल्लांसाठी प्रसंगी चवताळून उठणार्‍या तिच्यातील वाघिणीला आणि अशाच तिच्या असंख्य गुणांना अनेक शुभेच्छा!

हे जग अधिक सुंदर करण्याचं महत्व मोलाचं काम........तिचंच तर आहे!
तिची इर्ष्या, तिची भरारी, तिची दृष्टी...आणि तिचे आसू, तिचा कमकुवत पणा, तिचे चुकीचे निर्णय.....
कधी वर कधी खाली झुलणारा भावनांचा हिंदोळा.......

स्त्रित्वाच्या अनेक विलोभनीय पैलूंना झळाळी मिळो.........तिच्याच अंगभूत तेजाने ती अधिकाधिक तळपो या मनापासून सदिच्छा!

Monday, March 05, 2007

धारा

मध्ये एक चांगलं पुस्तक वाचनात आलं.........इंदिरा रायसम गोस्वामी चं....आधालेखा दस्तावेज - त्याचं भाषांतर - "अर्धिमुर्धी कहाणी".......
वृंदावन मध्ये असतांना तिला आलेले विलक्षण अनुभव आणि विशेषतः श्रीकृष्णाबद्दल तिचं चिंतन वाचण्यासारखं आहे. तिचं म्हणणं अस आहे की आपण सर्वच जण श्रीकृष्णाच्या त्याच त्या राजस, लडिवाळ रुपावर प्रेम करीत राह्तो, गोकुळातला रास खेळणारा, लोणी चोरणारा श्याम.............पण त्याचं पूर्ण रुप आपण कितीसं अभ्यासतो? तिला कायम श्रीकृष्ण एक व्यक्ती म्हणून बघावासा वाटतो!
देवत्वा पेक्षाही श्रीकृष्णाला आपल्यातलाच एक समजण्याची ही संकल्पना जरा जास्त 'आपली' वाटते.
.......भारतीय भक्तीच्या सुद्धा किती तरी धारा आहेत.....चैतन्य महाप्रभूंच्या मधुरा भक्ती पासून दत्तात्रेयांच्या कर्मठ साधनेपर्यंत.......
कदाचित हाही एक भक्तीचाच मार्ग असेल.........

Sunday, March 04, 2007

पाककृती

मी आज तुम्हाला एक नवीन डिश सांगणार आहे..........

साबुदाणा - वाटली डाळ यांचा उपमा

एक वाटी साबुदाणा व एक वाटी हरभरा डाळ रात्री भिजत घालून ठेवावे. दुसर्‍या दिवशी सकाळी डाळ उपसून वाटून घ्यावी. कढईत तेलाची फ़ोडणी करुन त्यात मिरचीचे तुकडे, कढी पत्ता, हिंग वगैरे घालून, त्यावर डाळ घालावी व एक वाफ़ आल्यावर, साबुदाणा घालून पुन्हा चांगले परतावे व वाफ़ आणावी. चवीला मीठ, साखर, लिंबू पिळून व कोथिंबीर -खोबरे घालून गरम गरम सर्व्ह करावे.