Saturday, September 19, 2020

भाग्यरेखा....

:
कोणाच्या भाग्यरेखा कोणाला कुठे घेऊन जातील.. काही सांगता येत नाही! निसर्गात बरोबर-चूक असे काही नसते. फक्त “असते”!.. त्याला बरोबर-चूक हा चांदी-वर्ख आपण चढवतो. आता पहाना, नदीने समुद्रात गेलेच पाहिजे. त्यात तिची परिपूर्ती. तसं नाही झालं तर चक्रच थांबेल. एक छोटी नदी मोठ्या समुद्राला नाही मिळाली म्हणजे एक लांब साखळी तुटली की खळकन.... पण अशाही काही आहेत ज्या नाहीच मिळत समुद्राला.. Okavango नदी...Angola, Namibia आणि Botswana तून वाहणारी.. संपन्न ...१५०० किमी पेक्षा लांब..आणि ती बोत्स्वानात पोचल्यावर नुसतीच धावधाव करून पसरते.. पूर्वी, म्हणजे हजारो वर्षापूर्वी तिथे एक सरोवर होते, मग ते आटले पण तरी ही तिच्या जुन्या डगरीने तिथेच जाऊन पोहोचते आणि मग सगळ्या पाण्याची वाफ होते... जगभर अशा खूप नद्या आहेत , ज्यांचा डेल्टा नाहीच मिळत समुद्राला. समुद्राला नाही मिळाली तर नदी "धराशायी" होते... किती सुंदर शब्द आहे, धराशायी...पृथ्वीवर निजणारी.. आफ्रिकेतली सगळ्यात लांब नदी नायगर..हिची बहिण बनी..ती सहारा वाळवंटाकडे अगदी आपली वाट वाकडी करून जाते... आणि बनवते "मसिना"!.. वाळवंटाजवळ एक हिरवा, पूर येणारा, भात वाढवणारा आणि मासेमारी करणारा प्रदेश! बनी नाही मिळत समुद्राला ! आपल्याकडे तर रेलचेल आहे . कच्छ चे रण .. इथे पूर्वी अरबी समुद्रच होता...खूप पावसाळ्यात आजदेखील सगळं वाळवंट पाण्याने भरून जातं. इथे एक नदी येते लगबगीने, पण मग तिची गोची होते... समुद्र कुठेय? शोधताना तिचे पाणी अनेक दिशांनी धावते आणि पसरते इथेच.. ही लुणी नदी..कच्छच्या रणात विरघळणारी.. तशीच रुपेन, सरस्वती आणि बनास..या लिटल रणमध्ये अदृश्य होतात...प्रत्येकीची आपल वेगळी कथा. प्रत्येक जण झंजावाती पूर घेऊन येते..वाळवंट फुलतं नुसतं.... असो. सांगायचं काय होत ते विसरलेच.... खरं तर सांगायचं फारसं काही नसतं, एक-दोन तारा जोडायच्या असतात कधी, कधी चुकार प्रतिबिंब बघायचं असतं, चाफ्याचं एखादं फुल उचलून केसात खोचायचं असतं, ओंजळभर हसायचं, पापणीभर पाणी साठवायचं असतं, एखादी अर्थहीन-absurd गोष्ट सांगायची-ऐकायची असते. मुद्दा असा नसतोच बहुतेक... पुढे खूप दिवस पुरतं हे..पण कशाला हे सगळं?...... धराशायी होणं वाईट नाहीये.. जीव तोडून चाललेल्या प्रत्येक वाटेला पुढे समुद्र लागेलच असं काही नाही. ही जाण महत्वाची! कधी सरोवर लागेल, कधी माळरान, कधी अख्खं वाळवंट.. ठीक आहे ... वाळवंटात देखील पूर येतात. नदी अगदी हवेत विरली तरी आपलं कर्तव्य विसरत नाही....परत बरसतेच. प्रत्येकाच्या मनात अशी एखादी नदी असते..... . शांत रात्री तिची साद ऐकू येते का बघा.. तिला खळबळू देणं, आवर घालणं, उन्मुक्त बेभान वाहू देणं अथवा शांत मधाच्या धारेसारखं नीरवतेने ओतत राहणं...सगळं आपल्याच तर हाती असतं............ आधी छोटा अल्लड प्रवाह, मग लहान षोडषा नदी, मग उपनद्या येउन मिळत गेल्याने विस्तारलेली पोक्त नदी..आणि शेवटी समुद्रात जाऊन मिळणे....... स्त्रीचं आयुष्य असो वा नदीचं....सगळ्यांचा प्रवास एका ठरलेल्या आखलेल्या मार्गावरुनच व्हावा असा काही नियम तर नाहीये ना?

Thursday, September 17, 2020

कोरोना... कोरोना...ओ कोरोना

कोरोना.. सगळ्या जगाला व्यापून वर दशान्गुळे उरणारा प्रलयंकारी राक्शस! आई...ए आई... पार्थच्या हाका मारण्याने ईशा भानावर आली. "काय रे...?" "अगं..आज संध्याकाळी सात वाजता टाळ्या अन थाळ्या वाजवायच्या आहेत ना..... मोदीजीन्नी सांगितलंय......." "कोरोना पळून जाणारे म्हणे त्याने.........." पार्थ उत्साहाने सांगत होता... ईशाच्या डोळ्या समोरुन व्हॊट्सप चे मेसेजेस तरळून गेले.... मोदीजी यांचा मास्टरस्ट्रोक...., टाळ्या व थाळ्य़ा यांच्या एकत्र नादाने एक रेझोनेटिंग फ़्रिक्वेन्सी तयार होणारे..ज्याने वातावरणातील जंतू नष्ट होतील...... या दिवशी या वेळी अमुक तमुक ग्रह एका सरळ रेषेत येणार आहेत........त्याने फक्त भारतावरच परिणाम होणारे व आपल्याकडील विषाणू पूर्णपणे निष्प्रभ होणार.......... ती मना्शीच हसली...पार्थच्या कु्रळ्या,मऊ केसांतून हात फिरवीत त्याला म्हणाली.."अरे...एक ग्रुप ॲक्टिव्हिटी म्हणून ठीके पार्थू..फारतर जरा टीम बिल्डींग, स्फूर्तीदायी कृती म्हणू शकतो आपण तिला......या पलिकडे काही नाही.......वाजवू आपण टाळ्या थाळ्या..पण खरी जबाबदारी म्हणजे काळजी घेणे हीच आहे.......हात सतत धुणे, मास्क्स वापरणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे...हो किनई...?" "हो...अर्थातच.....आई.."पार्थ वर्गात पहिला येणारा मुलगा होता..