Friday, June 27, 2008

साहित्य संमेलन

"मराठी साहित्य संमेलन सन फ़्रान्सिस्कोमध्ये"

ही बातमी आनंददायी आहेच. मायमराठी साता समुद्रापार, देशांच्या सीमा ओलांडून नवे ध्वज रोवायला जाते आहे, याहून अभिमानाची गोष्ट काय असू शकते?

आणि आता तर ब्लॉग्जच्या, ई दळणवळणाच्या माध्यमातून जग एव्हढे जवळ आले आहे की इथे राहूनही आपल्याला संमेलनात सहभागी होता येईल. किंबहुना दर वेळेचे साचेबद्ध स्वरुप बदलून नवीन आयाम काय देता येतील याचा विचार व्हावयास हवा.

मराठी सोडून बाकी कुठल्या भाषेचे संमेलन इतक्या दूरदेशी साजरे झालेले आपण ऐकले आहे का? मग हा आपला सन्माननीय अपवाद नाही का?

माराठी सारस्वतावर प्रेम करणार्‍या आपणा सर्वांनाच मराठीला एक नवीन पैलू देण्याची ही एक सुवर्ण संधी मानावयास हवी. भाषेची समृद्धी ही तिच्या सुपुत्रांच्या कर्तबगारीवर देखिल ठरत असते.
म्हणून वेबिनार, ई कॉन्फरंसिंग, ब्लॉगर्स झोन, वेबकास्ट, नेट्वर्किंग अशा विविध माध्यमांतून हे संमेलन आगळेवेगळे ठरेल असे प्रयत्न करावयास हवे.

एखादे संमेलन परदेशी गेले तर बिघडले कोठे?
“उत्तर धृवावर संमेलन घ्या” म्हणणे केवळ हास्यास्पद आहे. दूर राहील्याने मराठी बद्दलचे प्रेम काकणभर अधिकच असेल असा विश्वास बाळगावयास हवा.

मराठी संमेलन फक्त महाराष्ट्रातच व्हायला हवे असा काही कायदा नाही!

कृपया आपली मते नोंदवा. मुख्यतः ते अधिक लोकाभिमुख आणि हाय टेक कसं हॊईल यावर आपली मते स्वागतार्ह आहेत!
(म्हणजे कुणी ते विचारात घेतील अथवा नाही हा वेगळा प्रश्न आहे!)....पण आपण विचार करायला काय हरकत आहे?