आणि तो दिवस उजाडला! सगळ्यांच्या मनात एक विचित्र हुरहुर होती. प्रयोगाच्या यशस्वितेविषयी सगळ्यांच्याच मनात थोडीफार साशंकता होती.
निवडक १०,००० जणांना या चांचणी साठी निवडण्यात आले होते. त्यात सर्व थरातील लोक होते. शास्त्रज्ञ, कवी, डॉक्टर, चित्रकार, विद्यार्थी..
एकेक करुन सर्वजण शांतपणे निती डोम च्या पायर्या उतरत होते. पृथ्वी वर एकाच वेळी तीन ठिकाणी हा प्रयोग सुरू होणार होता.
त्यासाठी येणार्या संभाव्य धोक्याची चाचपणी करून भव्य डोम समुद्र तळाशी बांधण्यात आले होते. आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात आली होती..पृथ्वीच्या या भावी नागरिकांना बाहेर असलेल्या सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
विरीता ने केवल ला जवळ घेवून म्हटले , " केवल, असं जाणीव पूर्वक आणि समजून आई मुलाचं वेगळं होणं किती कष्टप्रद आहे...किती कठीण! आपण पुन्हा भेटणार नाही केवल...कधीही.. पण त्या उज्ज्वल दिवसासाठी केलेले प्रयत्न - परिश्रम, घेतलेला ध्यास आणि पाहिलेली स्वप्नं तर चिरंतन आहेत...
मृत्यू म्हणजे वियोगाचंच दुसरं नाव आहे नं...पण हा वियोग किती उभारी देणारा, भारणारा आहे! पुढल्या अनेक पिढ्यांच्या भवितव्याची शाश्वती देणारा, पृथ्वीच्या पुनरुत्थानाची ग्वाही देणारा, सकारात्मक वियोग!...तिला पुढे बोलवेना. तिने चेहेरा हाताने झाकून घेतला.
केवल ने आजूबाजूला नजर टाकली. धुरकट आकाशातून दिसणार्या फिक्या पण विलोभनीय बुडत्या सूर्यबिंबाकडे नजर भरून पाहिले व तो डोमच्या पायर्या उतरु लागला.
केवल हा या प्रयोगात सहभागी होणारा शेवटचाच उमेदवार होता. त्यानंतर डोम चा भव्य दरवाजा बंद करण्यात आला.
जरुर ती सर्व कागद्पत्रं, आयडेंटिटी मार्क्स, खुणा, हिस्टरी प्रत्येकाच्या हिल्चिप मध्ये स्टोअर करुन ठेवण्यात आली होती. तसेच इतक्या दीर्घ निद्रेतून उठल्या नंतर, जर कुणाची पूर्णच स्मृती हरपली तर त्याची सर्व फाईल ही जवळ ठेवण्यात आली होती.
डॉ लेक्शॉ यांनी त्यांच्या २ मदतनिसांद्वारे प्रत्येकाला चीर निद्रेचं इंजेक्शन टोचायला सुरुवात केली तेव्हा रात्रीचे ९ वाजले होते.
काम पूर्ण होवून ते बाहेर आले तेव्हा जवळ जवळ १२ तास उलटून गेले होते. मिसेस लेकशॉंनी त्यांचा हात घट्ट धरुन ठेवला ..त्यांच्या नजरेत अनेक उदास प्रश्नं होते. शेखरने आईला थोपटून धीर देण्याचा प्रयत्न केला.
काम पूर्ण झाल्याची खात्री पटताच निदांनी अतीव समाधानाने दार लॉक केलं आणि ते आपल्या अभ्यासिकेत परतले. आता पुढची कृती अधिक महत्त्वाची आणि जिकीरीची होती.........