Friday, February 09, 2024

प्रेम


पुरे झाले चंद्र-सूर्य, पुरे झाल्या तारा,

पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा राहा,
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा.

शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,
जास्तीत-जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं

शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस,
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं!


कवी - कुसुमाग्रज

Friday, June 02, 2023

अत्तर


सांज थांबता दारात
तुझे आठवती बोल

शब्द शब्द सुगंधित
काय अत्तराचे मोल?

दरवळे दरवळ
माझी लवते पापणी
हुरहुर अनिवार
झुरे शुक्राची चांदणी

सांज ढळता ढळता
रात्र उलगडे अशी
होते कावरी बावरी
प्रीत जागते उशाशी

घेते मिटून पापणी
तुझी लागते चाहूल
जरा जडावता डोळे
पांघरते प्रीतभूल

तुझ्या भेटीचे अत्तर
रोज परिमळे इथे
नको विचारुस कधी
"माझी आठवण येते??"

Monday, February 20, 2023

एस. डी. - लताची सर्वोत्कृष्ट पाच गाणी

 

. तुम जाने किस जहाँ में खो गये

लताचा एकविशीतला, कोवळा दुःखाने ओथंबलेला आवाज केवळ ऐकत रहावा असा. विशेषतः 'लूट कर मेरा जहाँ' च्या वरच्या पट्टीनंतर येणारा 'छुप' चा होतोय- होतोय असा हळुवार उच्चार आणि तीनवेळा वाढत्या उत्कटतेने येणारा 'तुम कहाँ?' चा सवाल.

फैली हुई है सपनोंकी बाहें

'तुम जाने...' गायलेल्या गायिकेनंच हे गाणं म्हटलंय का, असा प्रश्न पडावा इतका यात लताबाईंचा आवाज वेगळा लागलाय. रॉबर्ट ब्राऊनिंगची 'पिपाज साँग' म्हणून एक प्रसिद्ध कविता आहे. या गाण्याच्या एकंदर आनंदी आणि (भरपेट पुरणपोळीच्या जेवणानंतर यावा तशा) निवांत मूडमुळे त्या कवितेतल्या 'गॉड इज इन हेवन, ऑल्ज राईट विथ वर्ल्ड' [आठवाः चितळे मास्तर] या ओळींची आठवण आल्यावाचून राहत नाही.

साहिरचे शब्द, लताचा केवळ 'स्वर्गीय' म्हणावा असा आवाज आणि त्याला साथ देणारं, गाण्यावर कुठेही अतिक्रमण करणारं एस. डीं. चं संगीत. आजा चल दे कहीं दूर म्हणताना 'आजा' वरचा गोड हेलकावा काय किंवा गाण्यात सुरुवातीला केवळ चारच सेकंद (००:१६ ते ००:२०) वाजणारा सतारीचा सुंदर तुकडा काय, केवळ अप्रतिम. [फक्त कल्पना कार्तिक ऐवजी या गाण्यात मधुबाला असती तर किती बहार आली असती :)].

वैताग, कंटाळा आला असताना डोळे मिटून हे गाणं ऐकावं आणि 'और सभी गम भूलें' चा प्रत्यय घ्यावा.

जायें तो जायें कहाँ

'टॅक्सी ड्रायव्हर' मध्ये तलतने म्हटलेल्या या गाण्याची लताने म्हटलेली आवृत्ती मला तितकीच आवडते. दर्दभरी, दुःखी मूडची गाणी म्हणण्याचा प्रत्येक गायकाचा एक वेगळा ढंग असतो, आणि त्यात त्या त्या गायकाचे व्यक्तिमत्वही डोकावत असतं असं मला वाटतं. बंदिनीमधलं 'अब के बरस भेज भय्या को बाबुल' हे आशाचं बावनकशी, काळजाला हात घालणाऱ्या दुःखाचं गाणं आणि लताची या गाण्यासारखीच दुःखी पण संयत हतबलता व्यक्त करणारी 'उठाये जा उनके सितम' किंवा अगदी पूर्वीचं 'साजन की गलियाँ छोड चले' सारखी गाणी यात हा फरक जाणवतो.

एकीचं दुःख, तिच्या व्यक्तिमत्वासारखंच थेट, हृदयाला पिळवटून टाकणारं तर दुसरीचं बहुधा लहानपणीच अंगावर पडलेल्या जबाबदारीतून आलेल्या अकाली प्रौढत्वामुळे गंभीर, संयत आणि 'समझेगा कौन यहाँ' म्हणणारं. लता आणि आशात श्रेष्ठ कोण, हा वाद बराच जुना आहे. त्यावर काही भाष्य करण्याचा या लेखाचा उद्देशही नाही. पण या वादात आशाकडे अधिक वैविध्य आहे असं सरसकट विधान करताना या शैलीतल्या फरकाकडे बऱ्याचदा लोकांचं दुर्लक्ष होतं, असं खुद्द आशाच एका कार्यक्रमात म्हणाली होती. (पांडुरंग कांती हे गाणं जर दीदीने गायलं, तर ती त्यातले आलाप/ताना कमीत कमी ठेवून कसं म्हणेल हे प्रात्यक्षिक म्हणून गाऊन दाखवल्यानंतर.)

असो. थोडं अवांतर म्हणजे, माझ्या आजोबांच्या वेळची मुंबई कशी होती हेही या गाण्यातून दिसतं हा हे गाणं आवडण्यामागचा अजून एक छोटासा भाग :).

मोरा गोरा अंग लई ले

बिमल रॉय यांच्या बंदिनी चित्रपटातली इतर गाणी जरी शैलेंद्रने लिहिली असली, तरी हे एकच गाणं गुलझारने लिहून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. काही वर्षांपूर्वी लोकसत्तेत गुरुवारी रंग-तरंग म्हणून पुरवणी यायची. त्यात एकदा गुलजारला नायिका आपल्याला त्रास देणाऱ्या चंद्राला राहूचे भय दाखवते ही कल्पना खूप दिवसांनी, गाण्याची दोन कडवी मनाजोगती होऊनही गाण्याची पूर्तता कशी करावी या विवंचनेत काही दिवस घालवल्यावर कशी सुचली याचं वर्णन केलं होतं. दुर्दैवाने त्याचे तपशील आता आठवत नाहीत. परंतु, गीतांतून बऱ्याचदा डोकावणारा चंद्र आणि 'कुछ खो दिया है पाईके, कुछ पा दिया गँवाई के' सारख्या ओळी म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसण्यासारखंच असावं.

'पुत्रवती बभूव' झाल्यानंतर (मोहनीश बहल) नूतनचा हा पहिलाच चित्रपट. मर्ढेकरांची उपमा उसनी घेऊन सांगायचं झालं तर, तिचा चेहरा गर्भवतीच्या 'सोज्वळ मोहकतेने' पडदा उजळवून टाकतो. रात्री श्रीकृष्णाच्या भेटीच्या आसेने श्यामरंगी वस्त्रे लेवून निघालेल्या राधेसारखी अभिसारिका नायिका. तिची उत्सुकता आणि तगमग; संकोच आणि मोह यांच्यामध्ये सापडून होणारी द्विधा मनःस्थिती आणि अशावेळी अवचितपणे ढगांतून डोकावून तिचा गौरवर्ण उजळवून टाकणारा, तिला पेचात टाकणारा चंद्र. मग कृतक कोपाने 'तोहे राहू लागे बैरी' म्हणणारी 'बंदिनी' कल्याणी. तीन-चार मिनिटांच्या वेळात वेगवेगळ्या विभ्रमांनी उभी करणारी नूतन; खरंच 'समर्थ' अभिनेत्री.

या गाण्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, लता आणि एस. डी. बर्मन यांच्यात निर्माण झालेला काही काळापुरता बेबनाव मिटवून, दोघांनी पुन्हा एकत्र काम करणं सुरू केल्यानंतर आकाराला आलेलं हे पहिलंच गाणं.

पिया बिना

अभिमान हा एस. डीं. च्या शेवटच्या चित्रपटांपैकी एक. त्यातली सगळीच गाणी सुरेख आहेत, यात वादच नाही. पण हे एस. डी. - लता जोडगोळीच्या कारकीर्दीचं प्रातिनिधिक गाणं वाटतं. या चित्रपटाच्या आसपास, म्हणजे सत्तरच्या दशकात लक्ष्मीकांत-प्यारेलालनी अनेक वाद्यांचा ऑर्केस्ट्रा लोकप्रिय केला होता. त्याच्या तुलनेत, या गाण्यातली बासरी-तबल्याची साथसंगत हे एस. डीं. चे वैशिष्ट्य म्हणता येईल. किमान वाद्यांनी गाण्याचा मूड पकडण्यातले कौशल्य आणि गायकाला दिलेला पूर्ण स्कोप. कदाचित, त्यामुळेच त्यांची बरीच गाणी लताची, रफीची, आशाची म्हणून अधिक प्रसिद्ध झाली असावीत.